Friday, 2 September 2022

विज्ञान साहित्यिक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना

प्रा. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार जाहीर

 

कोल्हापूर, दि. २ सप्टेंबर: इंडियन फिजिक्स असोसिएशन या संस्थेच्या पुणे विभागाच्या वतीने मराठीतून विज्ञान प्रसाराच्या कार्यासाठी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्रा. मो.वा. चिपळोणकर पुरस्कार-२०२२ शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा विज्ञान साहित्यिक डॉ. व्ही.एन. तथा विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे.

येत्या ५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. इंडियन फिजिक्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय ढोले आणि सचिव डॉ. विकास मठे यांनी ही माहिती पत्राद्वारे कळविली आहे.

डॉ. विलास शिंदे यांनी विज्ञान साहित्य, कार्यशाळा आणि ललित लेखनाद्वारे केलेले विज्ञानप्रसाराचे कार्य विशेष उल्लेखनीय असल्याचे यात नमूद करण्यात आले असून त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. अनिल लचके, डॉ. सुनील विभुते यांना देण्यात आला आहे.

डॉ. शिंदे यांची एककांचे मानकरी, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, हिरव्या बोटांचे किमयागार आणि आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा विज्ञान साहित्यासाठीचा महात्मा जोतिराव फुले पुरस्कार-२०१९, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कृ.गो. सूर्यवंशी पुरस्कार, मिरजेच्या चैतन्य शब्दांगण साहित्य सभेचा कै. अशोक कोरे पुरस्कार आणि निमशिरगाव साहित्य सुधा विचार मंचचा पी. बी. पाटील साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या पुरस्काराबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील डॉ. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment