Showing posts with label Dr. V.N. Shinde. Show all posts
Showing posts with label Dr. V.N. Shinde. Show all posts

Friday, 2 September 2022

विज्ञान साहित्यिक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना

प्रा. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार जाहीर

 

कोल्हापूर, दि. २ सप्टेंबर: इंडियन फिजिक्स असोसिएशन या संस्थेच्या पुणे विभागाच्या वतीने मराठीतून विज्ञान प्रसाराच्या कार्यासाठी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्रा. मो.वा. चिपळोणकर पुरस्कार-२०२२ शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा विज्ञान साहित्यिक डॉ. व्ही.एन. तथा विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे.

येत्या ५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. इंडियन फिजिक्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय ढोले आणि सचिव डॉ. विकास मठे यांनी ही माहिती पत्राद्वारे कळविली आहे.

डॉ. विलास शिंदे यांनी विज्ञान साहित्य, कार्यशाळा आणि ललित लेखनाद्वारे केलेले विज्ञानप्रसाराचे कार्य विशेष उल्लेखनीय असल्याचे यात नमूद करण्यात आले असून त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. अनिल लचके, डॉ. सुनील विभुते यांना देण्यात आला आहे.

डॉ. शिंदे यांची एककांचे मानकरी, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, हिरव्या बोटांचे किमयागार आणि आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा विज्ञान साहित्यासाठीचा महात्मा जोतिराव फुले पुरस्कार-२०१९, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कृ.गो. सूर्यवंशी पुरस्कार, मिरजेच्या चैतन्य शब्दांगण साहित्य सभेचा कै. अशोक कोरे पुरस्कार आणि निमशिरगाव साहित्य सुधा विचार मंचचा पी. बी. पाटील साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या पुरस्काराबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील डॉ. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

Friday, 14 October 2016

वाचनातूनच समाज परिवर्तनाची प्रेरणा: डॉ.भीमराव गस्ती



Dr. Bhimrao Gasti
कोल्हापूर, दि.14 ऑक्टोबर: समाज परिवर्तनासाठीची प्रेरणा थोर साहित्यिकांच्या पुस्तकांचे वाचन केल्यानेच मिळाली, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.भीमराव गस्ती यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रमात ते बोलत होते. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे अध्यक्षस्थानी होते.
डॉ.भीमराव गस्ती म्हणाले, मी कानडी असून मराठी माध्यमातून शिक्षण घेत गेलो.  मोठमोठ्या साहित्यिकांची पुस्तके दहावीपर्यंत वाचून काढली. मी शिकलो, म्हणून साहित्यिक झालो. माणसांमध्ये मोजल्या जात नसलेल्या लोकांसाठी करीत असलेली चळवळ पाहून मला शंकरराव खरात, नानासाहेब गोरे यांनी लिखाण करण्यासाठी प्रेरित केले. माझ्या लिखाणाला व्यापक प्रसिद्धी मिळाली. अनेक भाषा येत असल्यामुळे समाजातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्याचा उपयोग होत गेला. चळवळीमध्ये कार्य करताना ज्या- त्या ठिकाणी त्यांच्यासारखाच फाटका राहून माझे कार्य करीत गेलो. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास वाढत गेला आणि चळवळ वाढत गेली. चळवळ उभी करताना स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळवून देता आले त्यामुळे लोक एकत्र येत गेले. 
सामाजिक परिवर्तनाची चळवळ एका माणसाकडून होत नाही, त्यासाठी इतरांचे सहकार्याचे हात आवश्यक असतात, असे सांगून डॉ. गस्ती म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटका बेरड, बेडर, रामोशी समाजासह इतर जाती-जमातीमधील देवदासींसाठी कार्य करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या अत्याचारामुळे माझ्या कुटुंबातील चौदा माणसे मारली गेली. पोलीसांकडून इतर समाजातील लोकांवर लाठीमार झाला तरी मोठी बातमी होत असे. परंतु, या समाजावर गोळीबार झाला, तरी कुठे चर्चाही होत नव्हती. आज याच समाजातील लोक शिक्षणामुळे उच्चविद्याविभूषित हो डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस अधिकारी, शिक्षक, आयएएस, आयपीएस अधिकारी एकवीस आमदार झालेले आहेत.  या चळवळीने समाजातील लोकांना पुढे नेण्याचे काम केले. आमची चळवळ प्रश्नांभोवती फिरते, त्यामुळे मार्ग काढणे शक्य होते.
स्वातंत्र्यपूर्व नंतरच्या काळात बेरड, बेडर, रामोशी समाजावरील अत्याचाराबाबत डॉ.गस्ती म्हणाले, शाळे एखादी चोरी झाली, तरी शिक्षक विद्यार्थी मलाच मारत. त्याही परिस्थितीत शाळेत पहिला क्रमांक घेणे कधीही सोडले नाही. पुढे आंध्र, वारंगळ या ठिकाणी प्री-डिग्रीसाठी प्रवेश घेतला. विद्यापीठात शिक्षण घेत असताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील साहित्य वाचले. विद्यापीठामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम आल्यामुळे मला रशियामध्ये पीएच.डी.साठी जाण्याची संधी मिळाली. पुस्तकांच्या वाचनाने मन उल्हासित होवून नवे मार्ग दिसतात. वयाच्या 24-25 व्या वर्षी हिंडालचा लढा दे परकीय लोकांचा कारखाना बंद पाडला. देवदासींच्या मुलांसाठीचे देशातील पहिले वसतिगृह गडहिंग्लजमध्ये चळवळीच्या माध्यमातून निर्माण झाले. आपले दु:ख इतरांनी सोडविण्याची अपेक्षा ठेवता स्वत: त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक चळवळीमध्ये काम करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नये, त्यामुळे निराशा येत नाही, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे म्हणाले, आत्मविश्वास प्रज्वलीत ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे वाचन करणे आवश्यक आहे.  वाचन दिन साजरा कराव लागतो, ही बाब तरुण पिढीने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आपले उत्तम मत व्यक्त करण्यासाठी वाचनाची आवड असणे आवश्यक आहे.  तंत्रशिक्षणातील क्रांतीमुळे घरातील सर्वांचा संवाद तुटून गेला. तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग एकत्र आलेले आहे, अशा वेळेस मनामनामध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करण्याची गरज आहे.
ग्रंथपाल डॉ.नमिता खोत यांनी प्रास्ताविक केले. मराठी अधिविभागप्रमुख प्रा.राजन गवस यांनी परिचय करून दिला. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव यांनी आभार मानले. भाग्यश्री गुरव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिविभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.