Dr. Bhimrao Gasti |
कोल्हापूर, दि.14 ऑक्टोबर: समाज परिवर्तनासाठीची प्रेरणा थोर साहित्यिकांच्या पुस्तकांचे वाचन केल्यानेच मिळाली, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.भीमराव गस्ती यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित 'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रमात ते बोलत होते. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे अध्यक्षस्थानी होते.
डॉ.भीमराव गस्ती म्हणाले, मी कानडी असून मराठी माध्यमातून शिक्षण घेत गेलो. मोठमोठ्या साहित्यिकांची पुस्तके दहावीपर्यंत वाचून काढली. मी शिकलो, म्हणून साहित्यिक झालो. माणसांमध्ये मोजल्या जात नसलेल्या लोकांसाठी करीत असलेली चळवळ पाहून मला शंकरराव खरात, नानासाहेब गोरे यांनी लिखाण करण्यासाठी प्रेरित केले. माझ्या लिखाणाला व्यापक प्रसिद्धी मिळाली. अनेक भाषा येत असल्यामुळे समाजातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्याचा उपयोग होत गेला. चळवळीमध्ये कार्य करताना ज्या- त्या ठिकाणी त्यांच्यासारखाच फाटका राहून माझे कार्य करीत गेलो. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास वाढत गेला आणि चळवळ वाढत गेली. चळवळ उभी करताना स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळवून देता आले त्यामुळे लोक एकत्र येत गेले.
सामाजिक परिवर्तनाची चळवळ एका माणसाकडून होत नाही, त्यासाठी इतरांचे सहकार्याचे हात आवश्यक असतात, असे सांगून डॉ. गस्ती म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात बेरड, बेडर, रामोशी समाजासह इतर जाती-जमातींमधील देवदासींसाठी कार्य करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या अत्याचारामुळे माझ्या कुटुंबातील चौदा माणसे मारली गेली. पोलीसांकडून इतर समाजातील लोकांवर लाठीमार झाला तरी मोठी बातमी होत असे. परंतु, या समाजावर गोळीबार झाला, तरी कुठे चर्चाही होत नव्हती. आज याच समाजातील लोक शिक्षणामुळे उच्चविद्याविभूषित होऊन डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस अधिकारी, शिक्षक, आयएएस, आयपीएस अधिकारी व एकवीस आमदार झालेले आहेत. या चळवळीने समाजातील लोकांना पुढे नेण्याचे काम
केले. आमची चळवळ प्रश्नांभोवती फिरते, त्यामुळे मार्ग काढणे शक्य होते.
स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या काळात बेरड, बेडर, रामोशी समाजावरील अत्याचाराबाबत डॉ.गस्ती म्हणाले, शाळेत एखादी चोरी झाली, तरी शिक्षक व विद्यार्थी मलाच मारत. त्याही परिस्थितीत शाळेत पहिला क्रमांक घेणे कधीही सोडले नाही. पुढे आंध्र, वारंगळ या ठिकाणी प्री-डिग्रीसाठी प्रवेश घेतला. विद्यापीठात शिक्षण घेत असताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील साहित्य वाचले. विद्यापीठामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम आल्यामुळे मला रशियामध्ये पीएच.डी.साठी जाण्याची संधी मिळाली. पुस्तकांच्या वाचनाने मन उल्हासित होवून नवे मार्ग दिसतात. वयाच्या 24-25
व्या वर्षी हिंडालचा लढा देऊन परकीय लोकांचा कारखाना बंद पाडला. देवदासींच्या मुलांसाठीचे देशातील पहिले वसतिगृह गडहिंग्लजमध्ये चळवळीच्या माध्यमातून निर्माण झाले. आपले दु:ख इतरांनी सोडविण्याची अपेक्षा न ठेवता स्वत: त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सामाजिक चळवळीमध्ये काम करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नये, त्यामुळे निराशा येत नाही, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे म्हणाले, आत्मविश्वास प्रज्वलीत ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे वाचन करणे आवश्यक आहे. वाचन दिन साजरा करावा लागतो, ही बाब तरुण पिढीने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आपले उत्तम मत व्यक्त करण्यासाठी वाचनाची आवड असणे आवश्यक आहे. तंत्रशिक्षणातील क्रांतीमुळे घरातील सर्वांचा संवाद तुटून गेला. तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग एकत्र आलेले आहे, अशा वेळेस मनामनामध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करण्याची
गरज आहे.
ग्रंथपाल डॉ.नमिता खोत यांनी प्रास्ताविक केले. मराठी अधिविभागप्रमुख प्रा.राजन गवस यांनी परिचय करून दिला. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव यांनी आभार मानले. भाग्यश्री गुरव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिविभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment