कोल्हापूर, दि. ३
ऑक्टोबर: शिक्षण आणि जगणे यांची तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांगड घालण्याची शिकवण
देणाऱ्या शिक्षकांची मोठी गरज आजच्या आणि उद्याच्या विद्यार्थ्यांना आहे, असे
प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वरुण साहनी यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे ‘नवीन शैक्षणिक धोरण-२०१६: उच्च शिक्षण क्षेत्रातील
शिक्षक विकास’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात बीजभाषण करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
प्रा. साहनी
म्हणाले, माहिती संवाद तंत्रज्ञानामध्ये (आय.सी.टी.) प्रत्येक समाजघटकापर्यंत
शिक्षण नेण्याची क्षमता आहे. बदलत्या शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणजे माहिती संवाद
तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना हवे ते
शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. कोणतेही तंत्रज्ञान
शिक्षकाला कधीही पर्यायी ठरू शकत नाही, मात्र तंत्रज्ञानामुळे शिक्षकांना आपली
शिकविण्याची मूलभूत पद्धती बदलणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी
तंत्रज्ञान हेच उत्तर नसले तरी त्याला मानवी संवेदनांचा स्पर्श असणेही अत्यंत
आवश्यक आहे.
आता सन २०२५ नव्हे,
तर २०३५मधील आव्हानांचा व बदलांचा वेध घेऊन शैक्षणिक धोरणे आखण्याची गरज असल्याचे
सांगून प्रा. साहनी म्हणाले, सन २०३५पर्यंत सध्याची शिक्षण व्यवस्था पूर्णतः
नव्याने बदलली नाही, तर ती कुचकामाची ठरुन जाईल. भविष्यातील रोजगाराच्या संधींचाच
विचार केला, तर जीवनभर शिक्षण (लाइफलाँग लर्निंग) हा भावी जीवनाचा नित्याचा भाग
बनलेला असेल. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक विद्यार्थ्याला २४X७ शिक्षण देणारी
ॲप्लीकेशन्स आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. पूर्वनिर्धारित अभ्यासक्रम
हा सुद्धा या नवीन व्यवस्थेत भूतकाळ बनून जाईल. विद्यार्थीच त्यांना काय शिकायचे
हवे ते ठरवतील आणि शिकतील. शैक्षणिक आणि पूरक अशा दोन्ही बाबतीत विद्यार्थ्यांच्या
व्यक्तीमत्त्व विकासाला आणि भावी आयुष्यासाठी उपयुक्त अशा गोष्टी ते स्वतःच निर्धारित
करतील. पुढील काळात विद्यार्थी विविध ऑनलाइन साधनांच्या सहाय्याने अध्ययन करून
वर्गात येतील आणि त्यातून निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्याची जबाबदारी
शिक्षकांची असेल. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याबरोबर दिशादर्शन करण्याची महत्त्वाची
भूमिका त्यांना पार पाडावी लागेल.
ते म्हणाले,
तंत्रज्ञानामुळे होत जाणारे बदल, आव्हाने शिक्षक म्हणून आपल्याला स्वीकारावीच
लागतील. तंत्रज्ञानाच्या आधारे दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार अभ्यासक्रम यांची
निर्मिती करण्याबरोबरच ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमधील दरी सांधण्याची संधीही
शिक्षकांना आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक उन्नतीसाठी आवश्यक असणारी ॲप्लीकेशन
आणि साधनांची निर्मिती करण्याची जबाबदारी त्यांनी उचलायला हवी. व्यावसायिक
शिक्षणाला मुख्य प्रवाहातील शिक्षण बनविण्याचे आणि गुरू-शिष्य परंपरा जपण्याचे आणि
जोपासण्याचे आव्हानही आपल्यासमोर असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, तंत्रज्ञानासह आजच्या शिक्षण प्रणालीच्या संदर्भात
निर्माण होणारी नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता शिक्षकांनी स्वतःमध्ये विकसित
करावी. नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि अंगिकार करून त्या साधनांचा अध्यापन
प्रक्रियेमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. त्याचप्रमाणे
विद्यार्थ्यांसमवेत सुसंवाद प्रस्थापित करण्याला त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असले
पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चर्चासत्रात
सुरवातीला समन्वयक व शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. श्रीमती प्रतिभा पाटणकर
यांनी स्वागत केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. आर.के. कामत यांनी पाहुण्यांचा
परिचय करून दिला. बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक केले तर,
विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य,
शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment