Tuesday, 4 October 2016

औषध निर्मितीवरील खर्च व कालावधी कमी करण्याचे संशोधकांसमोर आव्हान: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे






कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर: औषध निर्मितीच्या क्षेत्रात लागणारा पैसा व कालावधी कमी करण्याचे मोठे आव्हान संशोधकांसमोर आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
आंतरविद्याशाखीय संशोधनाची सर्व शाखांतील शिक्षक व विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या रिसर्च कॉलोक्वियमचे आज कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या ड्रग डिस्कव्हरी या विषयावरील व्याख्यानाने उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सुमारे दीड तासांहून अधिक काळ आपल्या संशोधनाचे क्षेत्र असलेल्या औषध निर्माण शास्त्राच्या अनुषंगाने संशोधनाचे महत्त्व त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मानवी जीवनातील औषधांचे, त्याच्या शास्त्राचे आणि त्याविषयीच्या संशोधनाचे महत्त्वही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विविध उदाहरणांसह स्पष्ट केले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, एक औषध बाजारात येईपर्यंत त्याच्या विविध चाचण्यांवर सुमारे १ अब्ज डॉलर इतका खर्च आणि सर्वसाधारण १५ वर्षांचा कालावधी लागतो. अथक संशोधनानंतर एक लाख रेणूंमधून हाती आलेल्या दहा हजार रेणूंच्या चाचण्या केल्यानंतर त्यातील दहा औषधाच्या निर्मितीसाठी पात्र ठरतात. त्यानंतर आणखी काटेकोर चाचण्यांमधून त्यातील एकाचे औषधामध्ये रुपांतर होते. अशा प्रकारे सुमारे लाखभर चाचण्या पार केल्यानंतर एक औषध तयार होते. त्यांच्यावर खर्चही मोठा होतो. हे चाचण्यांचे प्रमाण व त्यावरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने अधिक संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
संशोधनाच्या संदर्भात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, अत्याधुनिक साधनांच्या बळावर संशोधन करणे ही तुलनेत सोपी बाब आहे. तथापि, संशोधकांनी उपलब्ध साधनसामुग्रीच्या सहाय्याने भरीव संशोधन करून पुढे जाण्याची जिद्द बाळगून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपण प्रभावी अध्यापन प्रणालींच्या संदर्भात जितक्या गांभिर्याने विचार करतो, तितक्याच गांभिर्याने प्रभावी अध्ययन पद्धतींचा विचार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
परदेशी विद्यापीठांमधील एक अविभाज्य घटक असणारा रिसर्च कॉलोक्वियमचा उपक्रम शिवाजी विद्यापीठात सुरू होतो आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या उपक्रमाचा विद्यापीठातील सर्व शाखांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

हा उपक्रम विद्यापीठात दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी राबविण्यात येणार असल्याचे उपक्रमाचे सह-समन्वयक डॉ. एस.डी. डेळेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ. एस.बी. सादळे यांनी या उपक्रमाविषयी उपस्थितांना अवगत केले. समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment