Saturday, 1 October 2016

अस्थिर जातींच्या अभ्यासाकडे समाजशास्त्रज्ञांनी वळणे गरजेचे: उत्तम कांबळे





कोल्हापूर, दि. १ ऑक्टोबर: समाजशास्त्र हे अद्यापही स्थिर जातींभोवती फिरते आहे. आता अस्थिर जातींच्या अभ्यासाकडे समाजशास्त्रज्ञांनी वळणे नितांत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातर्फे फिरस्ती: एक समाजशास्त्र या विषयावर श्री. कांबळे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.
श्री. कांबळे म्हणाले, दहा वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या फिरस्तीच्या माध्यमातून शोषित व वंचित घटकांना मराठी साहित्यामध्ये स्थान देता आले. या घटकांना कोणत्याही क्रमिक पुस्तकात कधीही स्थान मिळालेले नव्हते. त्यांच्या अस्तित्वाची दखल अथवा जाणीवही कोणाला नव्हती. हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या प्रगती नामक बाबींपासून तो कोसो दूर होता. समाजामध्ये स्थिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारच्या जाती आहेत. अस्थिर जाती भटक्या असतात. त्यांना ना घर, ना शेती, ना ठिकाणा अशी परिस्थिती आहे. त्यांचे नाव ना सातबाऱ्यावर आहे, ना रेशन कार्डावर, ना मतदार यादीमध्ये. तथापि, आपले समाजशास्त्र मात्र अद्यापही स्थिर जातींभोवतीच केंद्रित झाले आहे. या समाजशास्त्राच्या परीघात अस्थिर जातींचा समावेश होणे गरजेचे आहे. फिरस्तीदरम्यान सापडलेल्या या अस्थिर जाती-जमातींनी मला इतके हरविले आहे की विजयाची शक्यता दूरवर दिसत नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या व्यवस्थेकडे नाहीत. जाती कशा टिकवायच्या, यापेक्षा त्या मोडायला शिकविणाऱ्या पुस्तकांची आजच्या समाजाला मोठी गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
श्री. कांबळे म्हणाले, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये उदयास आलेल्या अर्थव्यवस्थेने गुलामांची नवी व्यवस्था निर्माण केली आहे. पूर्वीच्या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव तरी होती; मात्र या नवीन गुलामांना गुलामीची जाणीवच होऊ न देण्याची दक्षता व्यवस्थेने घेतली आहे. त्यामुळे माणसाचे रुपांतर यंत्रात आणि यंत्रमानवामध्ये होते आहे. या सायबरयुगात आपल्यातला माणूस जिवंत ठेवणे हेच आपल्यासमोरचे खरे मोठे आव्हान आहे. जागतिकीकरणामुळेच ग्राहक आणि अ-ग्राहक अशी फळी आणि त्यांच्यातील संघर्ष उद्भवला आहे. भौतिक आणि शारीर गोष्टींचे भांडवल करून त्या प्रत्येक अवयवाचं मार्केटिंग हा या नव्या ग्राहक युगाचा फंडा आहे. याला अगदी गर्भाशय सुद्धा अपवाद राहिलेले नाही. अशा परिस्थितीत नवा समाज, नव्या संस्कृती आणि त्या संस्कृतींमधील संघर्ष आकाराला येतो आहे. संस्कृतीकरणाचे हे नवे प्रवाह जर आपण वेळीच ओळखू आणि रोखू शकलो नाही, तर मानवी मूल्यांच्या ऱ्हासाला आपण कारणीभूत ठरू, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, जेव्हा समाजात निर्मितीची, उत्पादनाची साधने बदलतात, तेव्हा नवनिर्मितीची शक्यता निर्माण होते. सध्याही आपण एका अशाच टप्प्यावर उभे आहोत. शेषनागाच्या फण्यावरुन श्रमिकांच्या तळहातावर सरकलेल्या दुनियेचं नवं शिफ्टिंग आता संगणकाच्या पडद्यावर, मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत झालेलं आहे. यामुळं ग्लोबलायझेशन ऑफ लिंग्विस्टीक्सही बदलून गेलं. भाषा बदलली, भाषेची प्रतीके, चिन्हे बदलली. भाषेतून आणि भाषेपलिकडेही जीवन बदलत गेले. भाषेची उपयुक्तता जोपर्यंत असते, तोपर्यंतच ती टिकते. कोणाच्याही भाषणावर नव्हे, तर उपयुक्ततेवर भाषेचे जीवन-मरण अवलंबून असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, उत्तम कांबळे यांनी फिरस्तीमधून समाजातील शोषित, वंचितांचे जगणे मांडले, त्यातील भीषणता मांडली. या सदराच्या माध्यमातून अखंडित समाजसेवेचेव्रतच त्यांनी सांभाळले. समाजाच्या भावनांना हात घालून जनमानसामध्ये दातृत्वाची भावना जागृत करण्याचे काम त्यांनी केले. त्यातून अनेक वंचितांना मदतीचा हात तर मिळवून दिलाच, त्याचबरोबरच समाजाची संवेदनशीलता जागृत असल्याचा प्रत्ययही दिला. ही फिरस्ती अशीच अखंडित सुरू राहो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन श्री. कांबळे यांचे स्वागत केले. डॉ. प्रल्हाद माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिमा पवार यांनी परिचय करून दिला. डॉ. श्रीमती पी.बी. देसाई यांनी आभार मानले. यावेळी प्रा. विजय मारुलकर, प्रा. आर.बी. पाटील, डॉ. शशिकांत चौधरी, डॉ. एस.एस. महाजन यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment