Showing posts with label Dr. Jagan Karade. Show all posts
Showing posts with label Dr. Jagan Karade. Show all posts

Friday, 18 March 2022

प्रशासकीय सेवा अभ्यासक्रमविषयक

तज्ज्ञ समितीमध्ये डॉ.जगन कराडे

 

कोल्हापूर, दि. १८ मार्च: महाराष्ट्र राज्यातील अकृषि विद्यापीठे अधिनस्त महाविद्यालयांमध्ये प्रशासकीय सेवा व्यक्तिमत्व विकास असा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्चशिक्षण संचालनालयामार्फत एक महत्त्वपूर्ण तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. या तज्ज्ञ समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ.जगन राडे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने यांचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.

मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.खुशपत जैन समिती प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. या समितीमध्ये नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ.प्रमोद लाखे, मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रभारी संचालक डॉ.सुरेश मैंद, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर येथील संचालक डॉ.लता जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.संजीव सोनवणे यांचीही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीने महाराष्ट्रातील अकृषि विद्यापीठे महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षेसंदर्भात अभ्यासक्रमाचे स्वरूप, मूल्यांकन, गुणांकन इ. संदर्भातील सर्वसमावेशक अहवाल पंधरा दिवसां राज्य शिक्षण संचालनालयास सादर करावयाचा आहे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 


Tuesday, 15 February 2022

अधिकाधिक संपत्तीसंचयाच्या हव्यासातून

गरीब-श्रीमंत दरीत वाढ: डॉ. उत्तमराव भोईटे

‘असमानता आणि दारिद्र्य’ ग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन

 

'असमानता आणि दारिद्र्य' या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत ग्रंथाचे संपादक डॉ. जगन कराडे आणि डॉ. आर.बी. पाटील.

'असमानता आणि दारिद्र्य' या ग्रंथाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात मनोगत व्यक्त करताना माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे. सोबत सहभागी समाजशास्त्रज्ञ.

'असमानता आणि दारिद्र्य' या ग्रंथाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


 

कोल्हापूर, दि. १५ फेब्रुवारी: भांडवलशाहीच्या रेट्यात अधिकाधिक संपत्तीसंचयाच्या हव्यासातून जगात गरीब-श्रीमंत अशी दरी वाढते आहे, असमानतेला खतपाणी घालते आहे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने ‘असमानता आणि दारिद्र्य’ (Inequality and Poverty) या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते.

डॉ. भोईटे म्हणाले, दारिद्र्य आणि असमानता या अनुषंगाने प्राचीन काळापासून चर्चा होतच आली आहे. महाभारत असो की कालिदासाचे मृच्छकटिक, प्राचीन वाङ्मयातही त्यांचे दाखले आढळतात. मानवी जगण्यासमोरची ही दोन मोठी आव्हाने आणि अविभाज्य घटक आहेत. दारिद्र्याचे दशावतारही अनेक स्वरुपाचे आढळतात. आपण एकावर उपाय शोधला की त्याचा नवा प्रकार सामोरा येतो. असे निरंतर सुरू आहे. लोक गरीबीसह जगणे स्वीकारतात. त्यांच्याहून अधिक भौतिक स्थितीतील लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात आपल्या गरीबीच्या जाणीवा निर्माण होतात. पूर्वी धट्टीकट्टी गरीबी, लुळीपांगळी श्रीमंती या ब्रीदाचा समाजाच्या राहणीमानावर वरचष्मा होता. आता भांडवलशाहीच्या रेट्यात मात्र अधिकाधिक संपत्ती जमा करण्याचा हव्यास घातक ठरतो आहे. ही बाब सर्वांनाच साधत नाही आणि समाजातील आर्थिक दरी अधिकाधिक रुंदावतेच आहे. हे खेदजनक आहे. मात्र, या अनुषंगाने समाजशास्त्रज्ञांनी, अर्थशास्त्रज्ञांनी आपापल्या परीने उपाययोजना शोधत राहणेही समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. डॉ. कराडे आणि डॉ. पाटील यांनी सदर संपादित पुस्तकाच्या माध्यमातून त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकलेले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, जगातील दारिद्र्य आणि असमानता यांवर मात करण्याची अगर त्या अनुषंगाने संशोधन करण्याची जबाबदारी ही केवळ काही ठराविक अभ्यासक्षेत्रांची अथवा संशोधकांचीच आहे, असे नव्हे; तर, प्रत्येक समाजघटकाचे त्यासाठी काही उत्तरदायित्व आहे, याची सर्वदूर जाणीव निर्माण होणे ही आजची खरी गरज आहे. जगातील सामाजिक-आर्थिक असमानता दूर होऊन संपत्तीचे सर्व घटकांत समन्यायी वितरण होण्याच्या दृष्टीने परिवर्तन होण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. जगन कराडे आणि डॉ. राजेंद्र पाटील यांनी संपादित केलेल्या ‘असमानता आणि दारिद्र्य’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुस्तकाच्या अनुषंगाने झालेल्या परिसंवादात राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मान्यवरांनी सहभाग घेतला. यामध्ये डॉ. विद्युत जोशी (गुजरात), डॉ. आर. इंदिरा (कर्नाटक), डॉ. आनंद कुमार (गोवा), डॉ. वेन्केटेश्वरलु (आंध्रप्रदेश), डॉ. एस. गुरुस्वामी (तमिळनाडू), डॉ. अरविंदर अन्सारी (नवी दिल्ली), डॉ. बिस्वजीत घोष (पश्चिम बंगाल), डॉ. नागराजू गुंडेमेडा (हैदराबाद) यांनी आपली मते नोंदविली. यावेळी नवी दिल्ली येथील रावत प्रकाशनाच्या प्रणित रावत यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले.

Thursday, 10 February 2022

‘असमानता आणि दारिद्र्य’ ग्रंथाचे

मंगळवारी विद्यापीठात प्रकाशन


कोल्हापूर, दि. १० फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने ‘असमानता आणि दारिद्र्य’ (Inequality and Poverty) या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी (दि. १५ फेब्रुवारी) सायकांळी ४ वाजता ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. जगन कराडे आणि डॉ. राजेंद्र पाटील यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास भारती विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी असतील.

प्रकाशन सोहळ्यानंतर पुस्तकावर चर्चा होणार असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मान्यवर सहभागी होणार आहेत. यामध्ये डॉ. विद्युत जोशी (गुजरात), डॉ. आर. इंदिरा (कर्नाटक), डॉ. आनंद कुमार (गोवा), डॉ. वेन्केटेश्वरलु (आंध्रप्रदेश), डॉ. एस. गुरुस्वामी (तमिळनाडू), डॉ. अरविंदर अन्सारी (नवी दिल्ली), डॉ. बिस्वजीत घोष (पश्चिम बंगाल), डॉ. नागराजू गुंडेमेडा (हैदराबाद) यांचा समावेश आहे. हा ग्रंथ रावत पब्लिकेशन या प्रतिष्ठित प्रकाशन कंपनीमार्फत प्रकाशित होतो आहे.

 

पुस्तकाविषयी थोडक्यात-

‘असमानता’ हे भारतीय समाजासमोरील मोठे आव्हान आहे. जात, वर्ग, वंश, लिंग, स्थान, भाषा, व्यवसाय, भौतिक स्थिती आणि संसाधनांमध्ये असमानतेवर आधारित वितरण तसेच बहुसंख्य गटांचे संसाधनांचे मूलभूत मानवी हक्क नाकारल्यामुळे सत्ता, संपत्ती आणि अधिकाराचे असमान वितरण यामुळे समाजात विषमता निर्माण होत आहे. मानवी विकासासाठी सर्व मानवी हक्क महत्त्वाचे आहेत आणि स्वाभाविकपणे ते गरिबीत प्रतिबिंबित झाले आहे. उपेक्षित गटाला मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागते. या अनुषंगाने सदर ग्रंथात भारतातील असमानता आणि दारिद्र्याच्या विविध पैलूंवर भारतातील विविध राज्यांतील तज्ज्ञांनी शोधनिबंधांद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. या तज्ज्ञांमध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. विद्युत जोशी, आर. इंदिरा, डॉ. आनंदकुमार, व्यंकटेश्वरलु, डॉ. गुरुस्वामी, डॉ. एम. एच. मक्वाना, डॉ. अरविंदर अन्सारी, डॉ. आर.डी. मौर्या, डॉ. बिश्वजीत घोष, डॉ. नागराजू गुंडेमेडा यांचा समावेश आहे.

Saturday, 1 October 2016

अस्थिर जातींच्या अभ्यासाकडे समाजशास्त्रज्ञांनी वळणे गरजेचे: उत्तम कांबळे





कोल्हापूर, दि. १ ऑक्टोबर: समाजशास्त्र हे अद्यापही स्थिर जातींभोवती फिरते आहे. आता अस्थिर जातींच्या अभ्यासाकडे समाजशास्त्रज्ञांनी वळणे नितांत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातर्फे फिरस्ती: एक समाजशास्त्र या विषयावर श्री. कांबळे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.
श्री. कांबळे म्हणाले, दहा वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या फिरस्तीच्या माध्यमातून शोषित व वंचित घटकांना मराठी साहित्यामध्ये स्थान देता आले. या घटकांना कोणत्याही क्रमिक पुस्तकात कधीही स्थान मिळालेले नव्हते. त्यांच्या अस्तित्वाची दखल अथवा जाणीवही कोणाला नव्हती. हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या प्रगती नामक बाबींपासून तो कोसो दूर होता. समाजामध्ये स्थिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारच्या जाती आहेत. अस्थिर जाती भटक्या असतात. त्यांना ना घर, ना शेती, ना ठिकाणा अशी परिस्थिती आहे. त्यांचे नाव ना सातबाऱ्यावर आहे, ना रेशन कार्डावर, ना मतदार यादीमध्ये. तथापि, आपले समाजशास्त्र मात्र अद्यापही स्थिर जातींभोवतीच केंद्रित झाले आहे. या समाजशास्त्राच्या परीघात अस्थिर जातींचा समावेश होणे गरजेचे आहे. फिरस्तीदरम्यान सापडलेल्या या अस्थिर जाती-जमातींनी मला इतके हरविले आहे की विजयाची शक्यता दूरवर दिसत नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या व्यवस्थेकडे नाहीत. जाती कशा टिकवायच्या, यापेक्षा त्या मोडायला शिकविणाऱ्या पुस्तकांची आजच्या समाजाला मोठी गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
श्री. कांबळे म्हणाले, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये उदयास आलेल्या अर्थव्यवस्थेने गुलामांची नवी व्यवस्था निर्माण केली आहे. पूर्वीच्या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव तरी होती; मात्र या नवीन गुलामांना गुलामीची जाणीवच होऊ न देण्याची दक्षता व्यवस्थेने घेतली आहे. त्यामुळे माणसाचे रुपांतर यंत्रात आणि यंत्रमानवामध्ये होते आहे. या सायबरयुगात आपल्यातला माणूस जिवंत ठेवणे हेच आपल्यासमोरचे खरे मोठे आव्हान आहे. जागतिकीकरणामुळेच ग्राहक आणि अ-ग्राहक अशी फळी आणि त्यांच्यातील संघर्ष उद्भवला आहे. भौतिक आणि शारीर गोष्टींचे भांडवल करून त्या प्रत्येक अवयवाचं मार्केटिंग हा या नव्या ग्राहक युगाचा फंडा आहे. याला अगदी गर्भाशय सुद्धा अपवाद राहिलेले नाही. अशा परिस्थितीत नवा समाज, नव्या संस्कृती आणि त्या संस्कृतींमधील संघर्ष आकाराला येतो आहे. संस्कृतीकरणाचे हे नवे प्रवाह जर आपण वेळीच ओळखू आणि रोखू शकलो नाही, तर मानवी मूल्यांच्या ऱ्हासाला आपण कारणीभूत ठरू, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, जेव्हा समाजात निर्मितीची, उत्पादनाची साधने बदलतात, तेव्हा नवनिर्मितीची शक्यता निर्माण होते. सध्याही आपण एका अशाच टप्प्यावर उभे आहोत. शेषनागाच्या फण्यावरुन श्रमिकांच्या तळहातावर सरकलेल्या दुनियेचं नवं शिफ्टिंग आता संगणकाच्या पडद्यावर, मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत झालेलं आहे. यामुळं ग्लोबलायझेशन ऑफ लिंग्विस्टीक्सही बदलून गेलं. भाषा बदलली, भाषेची प्रतीके, चिन्हे बदलली. भाषेतून आणि भाषेपलिकडेही जीवन बदलत गेले. भाषेची उपयुक्तता जोपर्यंत असते, तोपर्यंतच ती टिकते. कोणाच्याही भाषणावर नव्हे, तर उपयुक्ततेवर भाषेचे जीवन-मरण अवलंबून असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, उत्तम कांबळे यांनी फिरस्तीमधून समाजातील शोषित, वंचितांचे जगणे मांडले, त्यातील भीषणता मांडली. या सदराच्या माध्यमातून अखंडित समाजसेवेचेव्रतच त्यांनी सांभाळले. समाजाच्या भावनांना हात घालून जनमानसामध्ये दातृत्वाची भावना जागृत करण्याचे काम त्यांनी केले. त्यातून अनेक वंचितांना मदतीचा हात तर मिळवून दिलाच, त्याचबरोबरच समाजाची संवेदनशीलता जागृत असल्याचा प्रत्ययही दिला. ही फिरस्ती अशीच अखंडित सुरू राहो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन श्री. कांबळे यांचे स्वागत केले. डॉ. प्रल्हाद माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिमा पवार यांनी परिचय करून दिला. डॉ. श्रीमती पी.बी. देसाई यांनी आभार मानले. यावेळी प्रा. विजय मारुलकर, प्रा. आर.बी. पाटील, डॉ. शशिकांत चौधरी, डॉ. एस.एस. महाजन यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.