Thursday, 10 February 2022

‘असमानता आणि दारिद्र्य’ ग्रंथाचे

मंगळवारी विद्यापीठात प्रकाशन


कोल्हापूर, दि. १० फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने ‘असमानता आणि दारिद्र्य’ (Inequality and Poverty) या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी (दि. १५ फेब्रुवारी) सायकांळी ४ वाजता ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. जगन कराडे आणि डॉ. राजेंद्र पाटील यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास भारती विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी असतील.

प्रकाशन सोहळ्यानंतर पुस्तकावर चर्चा होणार असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मान्यवर सहभागी होणार आहेत. यामध्ये डॉ. विद्युत जोशी (गुजरात), डॉ. आर. इंदिरा (कर्नाटक), डॉ. आनंद कुमार (गोवा), डॉ. वेन्केटेश्वरलु (आंध्रप्रदेश), डॉ. एस. गुरुस्वामी (तमिळनाडू), डॉ. अरविंदर अन्सारी (नवी दिल्ली), डॉ. बिस्वजीत घोष (पश्चिम बंगाल), डॉ. नागराजू गुंडेमेडा (हैदराबाद) यांचा समावेश आहे. हा ग्रंथ रावत पब्लिकेशन या प्रतिष्ठित प्रकाशन कंपनीमार्फत प्रकाशित होतो आहे.

 

पुस्तकाविषयी थोडक्यात-

‘असमानता’ हे भारतीय समाजासमोरील मोठे आव्हान आहे. जात, वर्ग, वंश, लिंग, स्थान, भाषा, व्यवसाय, भौतिक स्थिती आणि संसाधनांमध्ये असमानतेवर आधारित वितरण तसेच बहुसंख्य गटांचे संसाधनांचे मूलभूत मानवी हक्क नाकारल्यामुळे सत्ता, संपत्ती आणि अधिकाराचे असमान वितरण यामुळे समाजात विषमता निर्माण होत आहे. मानवी विकासासाठी सर्व मानवी हक्क महत्त्वाचे आहेत आणि स्वाभाविकपणे ते गरिबीत प्रतिबिंबित झाले आहे. उपेक्षित गटाला मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागते. या अनुषंगाने सदर ग्रंथात भारतातील असमानता आणि दारिद्र्याच्या विविध पैलूंवर भारतातील विविध राज्यांतील तज्ज्ञांनी शोधनिबंधांद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. या तज्ज्ञांमध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. विद्युत जोशी, आर. इंदिरा, डॉ. आनंदकुमार, व्यंकटेश्वरलु, डॉ. गुरुस्वामी, डॉ. एम. एच. मक्वाना, डॉ. अरविंदर अन्सारी, डॉ. आर.डी. मौर्या, डॉ. बिश्वजीत घोष, डॉ. नागराजू गुंडेमेडा यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment