Saturday, 19 February 2022

छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वार्थाने भारतीय आरमाराचे जनक: डॉ. सुरेश शिखरे

 

डॉ. सुरेश शिखरे


('छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार निती' व्याख्यानाचा व्हिडिओ)


शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात विशेष व्याख्यान

कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या राष्ट्रीय जाणिवेतून आणि गांभीर्यपूर्वक आरमाराची उभारणी केली, ती पाहता ते सर्वार्थाने भारतीय आरमाराचे जनक आहेत, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. सुरेश शिखरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार निती या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी विषयतज्ज्ञ व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' या युट्यूब वाहिनीवरुन व्याख्यान प्रसारित करण्यात आले.

डॉ. शिखरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमार नितीच्या प्रेरणा, कारणे आणि परिणाम या अनुषंगाने तपशीलवार चर्चा केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सागरी शक्तींना शह देऊन व्यापारी नियंत्रण प्राप्त करण्यासाठी सुरवातीपासूनच पश्चिम किनारपट्टीवर बारीक लक्ष होते. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच आदी सागरी संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या सत्ताधीशांना शह देऊन सागरी व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित करावयाचे असेल, तर स्वतःचे सक्षम आरमार असले पाहिजे, ही जाणीव त्यांना होती. त्या दिशेने त्यांनी सातत्याने मोहिमांचे नियोजन केले. आरमाराच्या बळावर गब्बर झालेल्या सिद्दी, पोर्तुगीज या सागरी सत्तांच्या गुलामगिरीतून स्थानिकांची मुक्तता करणे, हाही एक प्रमुख उद्देश त्यांच्या आरमार निर्मितीमागे होता. जहाजबांधणी तंत्रज्ञान आणि आरमारी युद्धाचे कौशल्यज्ञान हे भारतातून लुप्त झाले होते. त्याचा शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना पुनःपरिचय करून दिला. आरमार निर्मितीच्या माध्यमातून त्यांच्यात आत्मविश्वास पेरण्याचे कार्यही महाराजांनी केले. उसळलेल्या समुद्रात टिकणाऱ्या नौकांची निर्मिती करण्यासाठी महाराजांनी पोर्तुगीज आणि इंग्रजांचीही मदत घेतली. त्यासाठी आवश्यक अर्थउभारणीही केली. महत्त्वाचे म्हणजे समाजात सिंधुबंदीची मानसिकता खोलवर रुजलेली असतानाही त्यावर मात करीत महाराजांनी नेटकेपणाने आरमारनिर्मितीचे कार्य हाती घेतले आणि त्यामध्ये सर्व समाजघटकांचे सहकार्यही घेतले. हे करीत असताना आपला आश्वासक आणि लोककल्याणकारी राज्याचा मूलमंत्रही वृद्धिंगत केला. नाविकज्ञान सहजासहजी निर्माण होत नाही. त्यासाठी पिढ्यान्-पिढ्या जाव्या लागतात. असे असतानाही अत्यंत विपरित परिस्थितीतून महाराजांनी युरोपियनांच्या तोडीचे स्वतःचे आरमार निर्माण केले, ही प्रचंड कौतुकास्पद बाब आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी संस्कृतीच्या व्यापाऱ्यांची साम्राज्यशाही मानसिकता प्रकर्षाने ओळखलेली होती, हे महाराजांच्या एका आज्ञापत्राचा दाखला देऊन सांगताना डॉ. शिखरे म्हणाले, शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आदी टोपेकरांशी कसे वागावे, हे एका आज्ञापत्रातूनच अत्यंत बारकाईने स्पष्ट केले होते. यात त्यांनी विविध सूचना केल्या होत्या. टोपेकरांना कोणीही व्यापारासाठी म्हणून सुद्धा कायमस्वरुपी जागा देऊ नये. जलदुर्गांच्या आसपासही त्यांना फिरकू देऊ नये. जागा द्यायचीच झाल्यास समुद्राच्या, दुर्गाच्या आसपास न देता आत खोलवर खाडीप्रदेशात द्यावी. त्यातही दोन शहरांच्या मधोमध निकृष्ट जागी द्यावी. त्यांना कायमस्वरुपी बांधकामास परवानगी देऊ नये. मोठी जागा देऊ नये. या सूचनांचे पालन झाले नाही, तर त्यांच्या आरमार आणि दारुगोळ्याला तुम्ही निश्चितपणे बळी ठराल, असा इशारा महाराजांनी दिला होता. आरमार हे राज्याचे स्वतंत्र अंगच आहे. ज्याचे आरमार, त्याचा समुद्र या भू-राजनैतिक धोरणाची जाणीव महाराजांच्या ठायी तीव्र होती. या दृष्टीकोनामुळेच महाराजांनी केलेल्या या सूचना पाहता या व्यापारी परकीयांना त्यांनी किती सूक्ष्मपणाने ओळखले होते, हे लक्षात येते. त्यांना या देशात पाय रोवू न देण्याची खबरदारी त्यांनी कटाक्षाने घेतलेली होती. ती खबरदारी पुढील राज्यकर्त्यांनीही घेतली असती, तर कदाचित हा देश इंग्रजांच्या ताब्यातही गेला नसता. त्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याचा पहिला हुंकार देणारे पहिले राज्यकर्ते म्हणूनही आपल्याला छत्रपती शिवरायांकडे पाहावे लागते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

शिवरायांनी किल्ले व दुर्गबांधणी करताना बाळगलेला शास्त्रीय दृष्टीकोन, त्यांचे स्थापत्यविषयक ज्ञान, स्वच्छतागृहे व शौचालयांच्या बांधणी करताना घेतलेली दक्षता पाहता महाराज हे एक थोर शास्त्रज्ञच होते. त्यांच्या या पैलूचा अधिक तपशीलाने अभ्यास करण्याची गरज डॉ. शिखरे यांनी अधोरेखित केली.

महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य आणि धार्मिक सहिष्णुता

शिवाजी महाराज जेव्हा बसरुरच्या मोहीमेवर आरमार घेऊन गेले होते, तेव्हा परतीच्या प्रवासात कारवारची बाजारपेठ लुटण्याचा त्यांचा मानस होता. नेमकी त्याचवेळी आदिलशहाची आई बडी बेगम ही मक्केला जाण्यासाठी काही खरेदी करण्यासाठी कारवार येथे आलेली होती. तेव्हा तिच्या संरक्षणासाठी सोबत आलेल्या शेरखान याने शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना कारवारवर स्वारी न करण्याविषयी विनंती केली. तेव्हा तेथील व्यापाऱ्यांकडून खंडणी देण्याच्या मोबदल्यात महाराजांनी आपल्या स्वारीचा बेत रद्द केला. शत्रूच्या आईला देखील अभय देण्याच्या या प्रसंगातून महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य तसेच धार्मिक सहिष्णुताही दिसून येते, असे डॉ. शिखरे यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी बार्देश येथे स्थानिक नागरिकांना सक्तीने धर्मांतर करावयास लावणाऱ्या आणि धर्मांतर न करणाऱ्या नागरिकांचा शिरच्छेद करणाऱ्या जुलमी पोर्तुगीज पाद्र्यांचा शिरच्छेद करायलाही महाराजांनी कमी केले नाही, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, भय हा शब्द शिवाजी महाराजांच्या कोषात नव्हता. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाण्याचा महाराजांचा गुण अत्यंत अनुकरणीय व आदर्शवत असा आहे. समुद्रावर स्वामित्व प्राप्त करून स्वराज्याचा व्यापार विस्तार आणि संरक्षण करण्याचे ध्येय बाळगून ते सिद्धीस नेणाऱ्या महाराजांचे द्रष्टेपणच त्यातून अधोरेखित होते. महाराजांचे हे द्रष्टेपण आणि गुण आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील यांनी स्वागत व परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment