Wednesday 2 February 2022

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. औदुंबर सरवदे यांच्या

‘बोलीविज्ञान’ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

डॉ. औदुंबर सरवदे

'बोलीविज्ञान' या पुस्तकाविषयी डॉ. औदुंबर सरवदे यांची विशेष मुलाखत (व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातील प्राध्यापक डॉ. औदुंबर सरवदे यांच्या बोलीविज्ञान या पुस्तकाला यंदाचा महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. त्यामध्ये प्रौढ वाङ्मय- भाषाशास्त्र/ व्याकरण या साहित्य प्रकारासाठीचा एक लाख रुपयांचा नरहर कुरुंदकर पुरस्कार बोलीविज्ञान पुस्तकाला जाहीर झाला. कोल्हापूरच्या भाषा विकास संशोधन संस्थेतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

पुरस्कारासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. औदुंबर सरवदे म्हणाले की, पहिल्याच पुस्तकाला थेट महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभणे, ही बाब अतिशय आनंद देणारी आहे. भाषाविज्ञानासारखा गहन विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला. हे प्रयत्न यशस्वी झाल्याची पोचपावती पुरस्कारामुळे मिळाली. यापुढील काळातही अशा प्रकारे दर्जेदार संशोधन व लेखन करण्यासाठीची प्रेरणा या पुरस्काराने दिली आहे.

या पुरस्काराबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे यांनी डॉ. सरवदे यांचे अभिनंदन केले आहे.

बोलीविज्ञान या पुस्तकाविषयी...

बोली अभ्यासाला सुमारे दीडशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे. जगभरात झालेल्या बोलीअभ्यासामुळे आणि या अभ्यासातून पुढे येत गेलेल्या निष्कर्षांमुळे भाषा अभ्यासाचा विकास झालेला दिसतो. तथापि, बोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक मराठीत नव्हते. ही उणीव 'बोलीविज्ञान' या पुस्तकाने भरून काढली आहे. बोली अभ्यासाच्या प्रारंभापासून आजपर्यंतची सारी स्थित्यंतरे या पुस्तकातून सांगितलेली आहेत. काळानुसार बोलीअभ्यासात परिवर्तन झाले. हे परिवर्तन बोली अभ्यासाची बदलत गेलेली उद्दिष्टे अधोरेखित करते. या उद्दिष्टांनुसार झालेला अभ्यास प्रस्तुत पुस्तकातून वाचकांसमोर येतो.

बोलींच्या मराठीतील अभ्यासाची स्थिती पाहता, बोलीविज्ञानातील स्थित्यंतरे अभ्यासकांना अपरिचित आहेत. त्यासाठी अभ्यासकांनी 'बोलीविज्ञान' समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे समजून घेणे समग्र भाषाविज्ञानाच्या आकलनासाठीही आवश्यक आहे. कारण, भाषाविज्ञान आणि बोलीविज्ञानाचा विकास परस्पर समन्वयाने झाला असून तो एकत्रित अभ्यासणे उद्बोधक ठरेल. हा विकास या पुस्तकात नेमकेपणाने सांगितला गेला आहे. या पुस्तकाद्वारे मराठी भाषा आणि तिच्या विविध बोलींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment