Sunday 6 February 2022

भगवंताची बासरी...

गानसम्राज्ञी 'भारतरत्न' लता मंगेशकर यांना शिवाजी विद्यापीठाने १९७८ साली डी.लिट. ही सर्वोच्च सन्मानदर्शक पदवी प्रदान करून गौरविले आहे. दि. २१ नोव्हेंबर १९७८ रोजी लता मंगेशकर यांना डी.लिट. प्रदान करताना तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.एस. भणगे. शेजारी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बॅ. आप्पासाहेब पंत. (छायाचित्र सौजन्य: सेमिनार विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

गानसम्राज्ञी 'भारतरत्न' लता मंगेशकर यांना शिवाजी विद्यापीठाने १९७८ साली डी.लिट. ही सर्वोच्च सन्मानदर्शक पदवी प्रदान करून गौरविले आहे. दि. २१ नोव्हेंबर १९७८ रोजी लता मंगेशकर यांना डी.लिट. प्रदान करण्यापूर्वी मानपत्राचे वाचन करताना तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.एस. भणगे. शेजारी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बॅ. आप्पासाहेब पंत. (छायाचित्र सौजन्य: सेमिनार विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)


(गानसम्राज्ञी भारतरत्नश्रीमती लता मंगेशकर यांना शिवाजी विद्यापीठाची सन्मानदर्शक डॉक्टर ऑफ लेटर्सही पदवी दि. २१ नोव्हेंबर १९७८ रोजी प्रदान करण्यात आली. त्या प्रसंगी तत्कालीन कुलगुरू डॉ. भा.शं. भणगे यांनी वाचलेले गौरवपत्र...)


भारतातच काय, पण जगभर जिच्या सुरांचे साम्राज्य पसरले आहे, त्या ह्या अलौकिक गायिकेला- लता मंगेशकर यांना शिवाजी विद्यापीठाच्या विधिसभेने व कार्यकारिणीने एकमुखाने ठराव करून 'डॉक्टर ऑफ लेटर्स' ही सन्मानदर्शक पदवी प्रदान करावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

'संगीतसूर्य' कै. मास्टर दीनानाथ यांच्या लताबाई मंगेशकर या ज्येष्ठ कन्या. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर, १९२९ रोजी इंदूर येथे झाला. वडिलांच्या मृत्युनंतर लताबाईंना अवघड परिस्थितीशी झगडावे लागले. ह्या झगडयातूनही त्यांनी अलौकिक यश मिळविले आहे. मा. दीनानाथांचे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर बालगंधर्व म्हणाले होते, 'हा मुलगा जर माझ्या हाती लागला, तर मंगेशी ते मुंबई असा रूपयांचा गालीचा अंथरून, त्यावरून वाजत गाजत मी याला माझ्या मंडळीत आणला असता.' जे त्यांच्याबाबतीत घडू शकले नाही, ते त्यांच्या या कन्येच्या बाबतीत खरे ठरले आहे. या कन्येसाठी हे गालीचे भारतातच नव्हे, तर जगभर पसरले जात आहेत.

कथा अशी आहे की, मा. दीनानाथ मृत्यूशय्येवर असताना त्यांनी लहानग्या लताला जवळ बोलावून सांगितले, 'माझा तंबोरा, चीजांची वही आणि मंगेशाची कृपा मी तुला देत आहे. दुसरं तुला देण्यासारखं आता माझ्याजवळ काही उरलं नाही. गळ्यातला पंचम सांभाळ, तोच तुला सर्व काही देईल.' आपल्या कन्येसाठी स्वरांचा जो कल्पवृक्ष मा. दीनानाथांनी लावला, त्यातून सुवर्णाचे फलभार अखंड ओथंबू लागले आणि त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. कुमार गंधर्वांनी लताबाईंच्या संबंधी म्हटले आहे, 'भारतीय गायिकांत लताच्या तोडीची गायिका दुसरी झालीच नाही. तीन साडेतीन मिनिटांचं तिचं ध्वनिमुद्रित गीत व शास्त्रीय गायकांची साडेतीन तासांची मैफल या दोहोंचं कलात्मक मूल्य एकच आहे, असं मानता, असा कलाकार शतकाशतकांतून एखादाच निर्माण होतो. तो आपल्या डोळ्यांसमोर वावरताना दिसतो, हे आपले केवढे भाग्य!'

वडिलांची अडचण तात्पुरती दूर करण्यासाठी लताबाई प्रथम नारदाच्या भूमिकेत रंगभूमीवर आल्या व 'राधाधर मधुमिलींद' या मधुर रचनेला त्यांनी टाळ्या घेतल्या. तेव्हापासून म्हणजे जवळ जवळ १९४२ पासून अखंड त्यांच्या पार्श्वगायनाच्या अतुलनीय कालखंडाला सुरवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत देशात कितीतरी परिवर्तने झाली. राजसत्ता बदलल्या, राजवटी बदलल्या, देशाच्या जीवनात जसे गौरवाचे प्रसंग आले, तसे विषादाचेही. केव्हा आनंद, उत्साह उफाळला, तर केव्हा अमर्याद यातना वाट्याला आल्या. या सर्व परिस्थितीतून लताबाईंचा आवाज जरीच्या धाग्याप्रमाणे सतत विणला गेला आहे. वेळूच्या बनात वेडे वारे वाहात राहावे, त्याप्रमाणे त्या एकसारख्या गातच आहेत. रोज गात आहेत. वातावरणात कुठे ना कुठे त्यांचा सूर मावळत्या किंवा उगवत्या चंद्र-सूर्याच्या साक्षीने विहरत असतो. कोट्यवधी अंत:करणांच्या सुरांची भूक त्यांनी भागवता भागवता ती वाढवली आहे. संगीताच्या प्रसाराचे व वाढत्या लोकप्रियतेचे श्रेय नि:संशय त्यांचेच आहे.

भालजी पेंढारकर म्हणतात त्याप्रमाणे, लताबाई या खरोखरीच, 'भगवंताची बासरी' आहेत. या जादूगर गळ्याने किती एकाकी जीवांना आधार व आसरा दिला आहे. दूर, वैराण प्रदेशात देशाची रखवाली करणाऱ्या सैनिकांनी व सेनानींनी कबूल केले आहे की, लताबाईंच्या सुरात त्यांना आपली घरदारं दिसतात आणि ते आपले एकाकीपण विसरू शकतात.

त्यांच्या गायनकलेचे वर्णन अनेकांनी अनेक परीने केले आहे. कै. भाऊसाहेब खांडेकर अचूक बोलले.  'कोशात दुसरा सुलभ व अर्थवाहक शब्द नाही, म्हणून लतेच्या गायनाला 'गोड' हा शब्द वापरायचा.'  त्यांच्या निर्मळ, निरागस, कोवळ्या सुरांची वाखाणणी करण्यात तर स्पर्धा लागलेली असते. कुणी म्हणते की, त्यांचा 'गळा देवटाक्याच्या पाण्यासारखा आहे.' कुणी म्हणते की, 'बदकाच्या पिलाने पाण्यात पोहावे तसा त्यांचा स्वर सराईतपणे गाण्यात फिरतो.' कुणी म्हणते की, 'मोरपीस अमृतात बुडवून त्यांच्या गळ्यावर अलगद फिरविले आहे.' कुणी म्हणते की, 'त्यांच्या सादाला एक वाणासारखे टोक आहे व ते मधाने माखलेले आहे.' कुणी त्यांच्या अचूक, निर्दोष, अर्थपूर्ण शब्दोच्चाराने प्रभावित होतात व संगीत ही देवभाषा आहे, असे म्हणतात.

शेवटी सारेच शब्द थकतात व सूरच उरतो. या सुराचे गूढ उकलण्याचा प्रयत्न झालेला आहे. 'हा एक अपराजित व प्रतिभाशाली सूर आहे.' 'लता हे एक स्वरांच्या अलौकिक अनुभूतीचे लौकिक नाव आहे.'  त्यांच्या स्वराला कारूण्याची बारीक किनार आहे. करूणरसात त्यांची स्वरकौमुदी, पूर्णिमेला पोहचते आणि कारूण्याची भावना गाताना त्यांच्या स्वरांचा चमत्कार 'परतत्वा'पर्यंत झेपावतो, असेही म्हटलेले आहे. या परतत्वाची अनेक रूपे असतील. 'गम से मुहब्बत', 'वेदनेवर प्रेम' हे त्याचे एक रूप असेल. मीरेची भजने व विषपाल्याचे प्राशन हे एक रूप असेल. शुद्ध पांढरा रंग, मनाचे औदार्य अशीही काही रूपे असतील.  त्याचीच प्रतिबिंबे त्यांच्या विख्यात गाण्यांत पडली असतील,  'ऐ मेरे वतनके लोगो...’, ‘नैना बरसे' इ. इ. नव्हे, लताबाई त्याही पलीकडे जातात, असे वाटत राहाते. परतत्वाच्या पलीकडे एका परमतत्वाकडे, ह्या वेदनेच्या पलिकडचा एक शोध घेण्याकडे.  'वतनगीत' ऐकताना, पंडित नेहरूंच्या नेत्रांत अश्रू साचले, ते ह्या जाणिवेने असावे. ह्याला जोडून दुसराही एक अनुभव लताबाईंच्या गाण्यातून येतो. एका विरागीपणाचा आणि समर्पण वृत्तीचा. लताबाईंना लहानपणी सैगलच्या गाण्याचे वेड लागले होते, त्याचे येथे स्पष्टीकरण होते.

ताजमहालाच्या साक्षीने लताबाईंनी एकदा उत्स्फूर्त बैठक केल्याची रम्य आठवण कानन मेहरू यांनी सांगितली आहे. ती अतिशय अर्थपूर्ण आहे. शारदीय चांदणे पडलेले असावे. त्यात ते संगमरवरी शिल्प दिसावे. ते शिल्पही एका वेदनेचे प्रतीक. त्या सर्वांना साथ असू शकते फक्त लतेच्या सुरावटीची. दुसरी एक आठवण लताबाईंनी तुकारामाचे अभंग ध्वनिमुद्रित केले त्यावेळची आहे. 'भेटी लागी जीवा, लागलीसे आस; पाहे रात्रंदिवस वाट तुझी' हा अभंग जेव्हा लताबाई गाऊ लागल्या, तेव्हा भक्तिरसाचा शांत, गंभीर तलावच साकार झाला. त्याचा प्रत्येक साक्षीदार या रसात बुडून गेला. ध्वनिमुद्रण संपले तेव्हा सारे जण जणू काही समाधीतून भानावर आले आणि 'किती सुंदर!' असे सहजोद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. गानसमाधीचा तो उन्मनी अनुभव होता, असंख्य हृदये गुंग करणाऱ्या मायाजालाचे ते रहस्य होते, नादब्रह्माचे सगुण रूप होते.

लताबाई गाण्याच्या तंत्रात विलक्षण पारंगत आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु, अन्य पार्श्वगायिका व लताबाई यांच्या जो मोठा फरक आहे, तो तन्मयतेचा, तद्रुपतेचा. प्रत्येक गाण्याच्या अनन्य अनुभवात लताबाईंचे सर्वस्व पणाला लागलेले असते. त्याचमुळे प्रत्येक गीताचे प्रयोजन, त्याची भावना, त्याची रचना, त्याची खोली या सर्वांगाचा यथोचित आविष्कार त्यांच्या गायनात घडतो. कोणताही कृत्रिम, नाट्यमय परिणाम साधण्याचा त्या प्रयत्न करीत नाहीत. सहज, सुंदर ध्वनीवलयांतून त्यांचे गाणे उमलत जाते आणि त्या गीताचा आंतरिक सौरभ आसमंतात दरवळतो. लयदार मंद विस्ताराने नादप्रवाहाचा फक्त सुंदर संस्कार मनावर राहतो.

लताबाई शतकापूर्वी जन्मल्या असत्या, तर स्वरसाधनेने ईश्वरप्राप्ती करून घेणाऱ्या त्या मीराबाई झाल्या असत्या. आजच्या यंत्रयुगात त्या अवतरल्या, म्हणून असंख्य रसिक अंत:करणात सहजपणे झरत राहिल्या. त्यांच्या गायनात असणाऱ्या या दैवी अंशानेच त्या श्रोत्यांच्या नेत्रात आनंदाचे अश्रू जमवू शकतात. त्यांचे गायन हे एक समर्पण व शरणागती होते. त्या संगीताच्या देवाला शरण जातात व रसिक या संगीताच्या देवतेला शरण जातात.

आजवर लताबाईंच्या कलेचा सन्मान अनेक संस्थांनी केलेला आहे. १९७० साली भारत सरकारने 'पद्मभूषण' ही पदवी त्यांना अर्पण केली. आंध्रमधील तिरूपतीच्या पुरातन देवस्थानकडून ''आस्थाना विद्वान'' ही दुर्मिळ पदवी त्यांना मिळाली आहे. सर्वात अधिक गीते (२०,०००) ध्वनिमुद्रित करणारी थोर पार्श्वगायिका म्हणून इ.एम.आय. कंपनीने सुवर्ण ध्वनिमुद्रिका देऊन त्यांचा गौरव केला. अमेरिका, आफ्रिका, रशिया या देशांत त्यांनी आपले संगीत ऐकविले. लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी सादर केलेला कार्यक्रम अविस्मरणीय व ऐतिहासिक ठरलेला आहे.

चित्रपट गीतांखेरीज ज्ञानदेव, तुकाराम, गालिब, मीराबाई यांच्या रचना त्यांनी स्वरबद्ध केल्या आहेत, तसेच संस्कृत भगवद्गीतेचे अध्याय त्यांनी ध्वनिमुद्रित केले आहेत. अलिकडे शीख समाजाचा 'सबद' त्यांनी ध्वनिमुद्रित केला आहे. या प्रकारे गेल्या पस्तीस वर्षांत लताबाईंची संगीत क्षेत्रातील कामगिरी संपन्न, बहुविध व केवळ विस्मयजनक आहे.

लता मंगेशकर या युगप्रवर्तक गायिकेचा सन्मान करण्याची संधी आज आम्ही घेत आहोत. विद्यापीठाच्या विधिसभेने एकमताने ठरविल्याप्रमाणे 'डॉक्टर ऑफ लेटर्स' या सन्मानदर्शक पदवीची दीक्षा देऊन अनुग्रह करण्यासाठी त्यांना आपल्या पुढे सादर करीत आहे.


No comments:

Post a Comment