Friday, 11 February 2022

रेशीमशास्त्रज्ञ डॉ. ए.डी. जाधव यांना

क्युबा सरकारचा इनोव्हेशन पुरस्कार

क्युबाच्या विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या हस्ते डॉ. ए.डी. जाधव यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना क्युबा येथील राष्ट्रीय रेशीमशेती प्रकल्पाच्या व्यवस्थापक अदिलैदिस रुईझ बार्सेनाज.


कोल्हापूर, दि. ११ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनक्युबेशन इन सेरीकल्चरचे समन्वयक डॉ. ए.डी. जाधव यांनी क्युबा देशाच्या रेशीमविषयक विकासामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना क्युबा सरकारने इनोव्हेशन पुरस्काराने गौरविले आहे.

डॉ. ए.डी. जाधव
डॉ. जाधव हे सन २०१२ पासून क्युबा सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्रालयाच्या रेशीमशेतीच्या माध्यमातून शाश्वत विकासविषयक धोरणाचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मंत्रालयाच्या डेव्हलपमेंट ऑफ दि व्हॅल्यू चेन ऑफ सेरीकल्चर इन क्युबा ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट या प्रकल्पावर ते मार्गदर्शक वैज्ञानिक म्हणूनही काम पाहात आहेत. त्यांच्या या योगदानाच्या गौरवाप्रित्यर्थ क्युबा सरकारतर्फे इनोव्हेशन अॅवॉर्ड-२०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.

गेल्या २ फेब्रुवारी रोजी हवाना येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. क्युबाचे विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण उपमंत्री जोस फिडेल सन्ताना न्युएझ यांच्या हस्ते आणि क्युबाच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रथम सचिव लुई अँटोनिओ टोरस इरिबर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. डॉ. जाधव यांच्या वतीने क्युबा येथील राष्ट्रीय रेशीमशेती प्रकल्पाच्या व्यवस्थापक अदिलैदिस रुईझ बार्सेनाज यांनी हा पुरस्कार स्वीकारला. क्युबातील भारतीय राजदूत सर्वेसर्वन जानकीरामन यांनी डॉ. जाधव यांच्या क्युबातील प्रकल्पस्थळास सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे डॉ. जाधव यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे दूरध्वनीवरून अभिनंदनही केले.

या संदर्भात क्युबा येथील सेंटर फॉर रिसर्च इन प्रोटिन प्लँट्स अँड बायोनॅचरल प्रोडक्ट्सच्या सरसंचालक डॉ. मारिया डेल कार्मेन पेरेझ हमांडेझ यांच्याकडून डॉ. जाधव यांना प्राप्त झालेल्या पत्रात म्हटले आहे की, क्युबातील रेशीमशेती विकासाच्या मूल्य शृंखलेमध्ये झालेल्या प्रक्रिया, तांत्रिक, उत्पादन आणि संस्थात्मक नवकल्पना राबविण्यासाठी डॉ. जाधव यांनी घेतलेल्या परिश्रमाच्या परिणामस्वरुप हा पुरस्कार दिला आहे. त्यांनी राबविलेल्या प्रमुख नवसंकल्पनांमध्ये तुतीच्या उत्पादनासाठीचे तंत्रज्ञान, रेशीम कीटक वाढवण्याची पद्धती, रेशीम कीटकांची अंडी उत्पादनाची पद्धत, रोगांचे नियंत्रण आणि प्रतिबंध, कोश सुकवणे आणि रेशीमधागे मिळवणे या बाबींचा समावेश राहिला. सदर प्रकल्पाद्वारे प्राप्त होणारी सर्व उत्पादने स्थानिक विकासात योगदान देतात आणि आर्थिक सामाजिक लाभावर सकारात्मक परिणाम घडवित आहेत. या सर्व बाबींसाठी, भारतासोबतच्या आणि विशेषत: डॉ. जाधव यांच्या सहकार्याचे महत्त्व आहे. त्यासाठी त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

अभिमानास्पद योगदान: कुलगुरू डॉ. शिर्के

डॉ. ए.डी. जाधव हे गेली अनेक वर्षे क्युबा सरकारला रेशीमशेतीच्या माध्यमातून शाश्वत विकासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करीत आहेत. त्याचा लाभ तेथील शेतकऱ्यांसह स्थानिक उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर होत आहे, ही बाब महत्त्वाची आहे. त्यांच्या योगदानाचा तेथील सरकारकडून पुरस्कार देऊन झालेला गौरव हा शिवाजी विद्यापीठासाठी आणि भारतासाठीही अभिमानास्पद क्षण आहे. 

No comments:

Post a Comment