Wednesday, 23 February 2022

विशेष वृत्त:

गुळापासून साठहून अधिक पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण


 

गुळाच्या विविध उपपदार्थ उत्पादनांसमवेत डॉ. ए.एम. गुरव

विद्यापीठाच्या उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्राची कामगिरी

 

कोल्हापूर, दि. ३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्रामार्फत गुळापासून एक-दोन नव्हे, तर तब्बल साठपेक्षा अधिक प्रकारचे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन गूळ उद्योजकांना दिले जाते आहे. गूळ कँडी, गूळ पावडर, काकवी, गुळाचा चहा, गुळाची चॉकलेट अशा पदार्थांचा यात समावेश आहे.

शिवाजी विद्यापीठातील उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव सातत्याने गुळवे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. स्वतः डॉ. गुरव वीस वर्षांहून अधिक काळ गुळावर संशोधन करीत आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठासह अन्यत्रही २५ गुळवे प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सहा गूळ प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये सांगली, मजले, रहिमतपूर, पंचतारांकित एम.आय. डी.सी, नेज आणि कणेरी मठ येथील गूळ-उत्पादन प्रकल्पांचा समावेश आहे.

केंद्रामार्फत कोल्हापूरबरोबरच नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शंभरहून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. सध्या कोविड काळात कार्यशाळांचे प्रमाण कमी झाले असले तरी शक्य तिथे ऑनलाईन मार्गदर्शनही करण्यात येते.   

या संदर्भात बोलताना डॉ. गुरव म्हणाले, सध्याच्या आधुनिक युगात युवकांचा ओढा उद्योजकतेच्या दिशेने वाढतो आहे. त्यामध्ये नवनवीन उद्योगांचा समावेश आहे. त्यामध्येच शरीरासाठी अत्यंत लाभदायक असणाऱ्या गुळापासून विविध पदार्थ बनवण्याचा व्यवसाय वाढत आहे. या व्यवसायातून रोजगार निर्मितीही होत आहे. शिवाजी विद्यापीठाचे उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्र गेली अनेक वर्षे गूळ उद्योगासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहे. सध्या कोल्हापूरजवळील ५ ते १० गुऱ्हाळघरांवर कार्यशाळा घेण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. गुरव म्हणाले की, खरेदी विक्रीतील पारदर्शकता हेच कोणत्याही व्यवसायाच्या यशाचे गमक असते. गुळात साखरेची भेसळ करून गोडवा वाढवण्याचे प्रकार काही ठिकाणी घडतात. अशा भेसळीच्या प्रकारांपासून शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक दूर राहायला हवे. उत्पादनातील गुणवत्ता सांभाळली की आपोआप त्याची उत्तम विक्री होऊ शकते.

गुळापासून बनणाऱ्या पदार्थांचे उत्पादन घेण्यासाठी तरुण उद्योजक, बँका आणि शासनाची सकारात्मक भूमिका या तिन्हीची सांगड आवश्यक आहे. हा व्यवसाय सुरू करणे सुरवातीला थोडे खर्चिक असले तरी तरुणांनी एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. काही तरुणांनी या व्यवसायात कमी कालावधीत उत्तम यश संपादन केल्याचीही उदाहरणे आहेत. योग्य नियोजन आणि मार्गदर्शन यांच्या आधारे हा व्यवसाय यशस्वी होतो. गुळापासून बनवलेल्या उत्पादनांचा उपयोग सणा-सुदीला भेट देण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर होतो आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागात अशा आरोग्यदायी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. गुरव २०१३ साली गुळापासून बनवलेल्या पदार्थांचे मार्केटिंग करण्यासाठी दुबईला गेले होते, त्यावेळी या उत्पादनांना उत्तम प्रतिसाद लाभल्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.

या पदार्थांचा समावेश आहे गूळ उत्पादनांत...

गुळापासून बनविण्यात येणाऱ्या या पदार्थांमध्ये गुळाची ढेप, गूळ पावडर, गुळाचे वेगवेगळ्या आकाराचे क्यूब (घन), काकवी, मोदक, गुळाचे ग्रॅन्युल्स, गुळाचे कॅडबरीसदृश चॉकलेट्स, गुळाचे सरबत, गुळाची बिस्किटे, नाचणी-गुळाची बिस्किटे, गूळ चहा प्रि-मिक्स, गूळ कॉफी प्रि-मिक्स, गूळ लिंबूपाणी, चिक्की- शेंगदाणे, चणा डाळ, गूळ सुजी, डार्क चॉकलेट, गूळ कँडी ज्यात इलायचीसह नऊ वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध आहेत. गुळाचा वापर करून बनाना आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम तयार केले आहे. चिरमुरा लाडू, राजगिरा लाडू, बुंदीचे लाडू, नाचणीचे लाडू, गुळाची रेवडी बनवले जातात. हळद आणि गुळ पावडर एकत्र करून त्यापासून कॅप्सूल तयार केली आहे, जी चेहऱ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मिकी माऊस, ससा, बैल, हत्ती आदी खेळणी आणि भेटवस्तूही गुळापासून बनविता येतात. मऊ खारकेतील बी काढून त्यामध्ये उत्तम प्रतीचा गुळ भरून तुपाचे दोन थेंब घालून ते बंद केले जाते. ते आठ दिवस ठेवल्यानंतर अत्यंत चविष्ट पदार्थ तयार होतो. अशा प्रकारे गुळापासून विविध पदार्थ तयार केले जातात, ज्यामुळे गुळाला मागणी वाढून शेतकऱ्यांना त्यापासून नफा मिळू शकेल, असे डॉ. गुरव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment