Friday 11 February 2022

‘पद्मश्री' डॉ. जी.डी. यादव यांचे

शिवाजी विद्यापीठाकडून अभिनंदन

 

कोल्हापूर, दि. ११ फेब्रुवारी: कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री डॉ. जी.डी. यादव यांना अमेरिकन नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग या जागतिक ख्यातीच्या संशोधन संस्थेची फेलोशीप जाहीर होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. कोल्हापूरसह शिवाजी विद्यापीठाला त्यांच्या या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी डॉ. यादव यांचे अभिनंदन केले आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, डॉ. यादव यांनी रासायनिक अभियांत्रिकीच्या संशोधन क्षेत्रात अमूल्य स्वरुपाचे योगदान दिले आहे. यूएस नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग या जगद्विख्यात संशोधन संस्थेची फेलोशीप त्यांना मिळणे हा कोल्हापूरच्या भूमीचा सन्मान आहे. शिवाय, डॉ. यादव हे शिवाजी विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून तसेच इतर विविध भूमिकांतून वेळोवेळी विद्यापीठाला मार्गदर्शन व सहकार्यही करीत असतात. विद्यापीठाखेरीजही कोल्हापूरच्या सार्वजनिक समस्यांच्या अनुषंगाने आपल्या संशोधनाचा लाभ मिळवून देण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्नरत असतात. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि कोल्हापूरप्रती प्रेमाची त्यांनी नेहमीच प्रचिती दिली आहे. त्यामुळेच त्यांना मिळालेला सन्मान हा आपलाही गौरव आहे, अशी कोल्हापूरसह विद्यापीठातील घटकांचीही स्वाभाविक भावना आहे. म्हणूनच डॉ. यादव यांना भविष्यातही असे सन्मान लाभावेत आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वदूर व्हावा, अशा सदिच्छा विद्यापीठातील घटकांनी व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment