Monday 28 February 2022

‘मी कवितेपायी खाक जळाया आलो,

जगण्याच्या वाटा अन् उजळाया आलो...’

शिवाजी विद्यापीठात इंद्रजीत भालेराव, गोविंद पाटील यांच्या काव्यधारांत रसिक चिंब

शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात कविता सादर करताना ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव. छायाचित्रात (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. व्ही.एन. शिंदे, गोविंद पाटील, डॉ. नमिता खोत.
 

कवी इंद्रजित भालेराव


कवी गोविंद पाटील

कवी गोविंद पाटील. समोर उपस्थित काव्यरसिक


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो, कष्टतो, माझा शेतकरी बाप..., गावाकडं चल माझ्या दोस्ता... आणि मी कवितेपायी जळाया आलो, जगण्याच्या वाटा अन् उजळाया आलो... या आणि अशासारख्या कवितांच्या धारांमध्ये शिवाजी विद्यापीठातील काव्यरसिक विद्यार्थी-विद्यार्थिनी आज चिंब झाले.

या धारा बरसवणारे होते ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव आणि गोविंद पाटील. निमित्त होते विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष काव्यवाचन समारंभाचे! विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि हिंदी अधिविभागाच्या सहकार्याने ग्रंथालयामोरील उद्यानात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.

या प्रसंगी ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी कबीर ही आपली दीर्घकविता सादर करून कार्यक्रमास प्रारंभ केला.

देवाशिवाय धर्म, धर्माशिवाय आध्यात्म, म्हणजे तुझी कविता,

आध्यात्माने ओली केल्याशिवाय जमीन,

कसे अंकुरतील कोंब कवितेचे?

शेवटी कविता ही आध्यात्मच असतं ना,

म्हणून फकिरीतच रमतात खरे कवी...

अशा प्रकारे कबीराच्या साक्षीने समकाळावर टोकदार भाष्य करणाऱ्या या कवितेने सुरवातीलाच उपस्थितांना अंतर्मुख केले. त्यानंतर कवी भालेराव यांनी विद्यार्थ्यांत लोकप्रिय असणाऱ्या बाप आणि गावाकडं चल... या दोन कवितांचे गेयतापूर्ण सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.

कवी गोविंद पाटील यांच्या वैविध्यपूर्ण काव्य सादरीकरणाने रसिक नादावले. कवीवर्य सुरेश भट यांच्या लाभले अम्हास भाग्य... हे उपस्थितांना सामूहिकरित्या म्हणावयास लावून त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाची उत्तम वातावरणनिर्मिती केली. त्यानंतर,

कवितेशीच जन्माचा मनापासून याराना,

जन्मता फोडला टाहो, तवापासून याराना...

ही कविता त्यांनी सादर केली. पन्नाशीतल्या नेटपार गुरुजींची प्रतिक्रिया या कवितेच्या माध्यमातून इंटरनेटच्या आभासी जगताच्या पलिकडे आपल्या विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यावरण आणि भोवतालाशी, वास्तविक जीवनाशी जोडू पाहणाऱ्या गुरूजी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे नितांतसुंदर वर्णन केले. अशाच वास्तवाला भिडणाऱ्या कर्जात जन्मलो आम्ही... आणि माझा बाप... या कविताही सादर केल्या. तुझ्यासारखीने बघावे कशाला, सुचेना जगावे कसे आरशाला ही प्रेमकविता आणि एक विडंबनकाव्यही सादर केले.

मी कवितेपायी खाक जळाया आलो,

जगण्याच्या वाटा अन् उजळाया आलो

या कवितेने त्यांनी पुन्हा रसिकांना अंतर्मुख केले. कवीवर्य शंकर वैद्य यांच्या वाळवंटातून भीषण चालले जीवन ही कविता सादर करून त्यांनी या काव्यमैफिलीचा समारोप केला. रसिकांच्या आग्रहाखातर गोविंद पाटील यांनी लता मंगेशकर यांचे ऐ मेरे वतन के लोगों... हे गीत शीळेवर वाजवून उपस्थितांची वाहवा मिळविली.

या प्रसंगी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजेश पाटील यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. आलोक जत्राटकर, ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील, रविंद्र जोशी, धनाजी घोरपडे, सुजाता चोपडे, संध्या पाटील, कवी मंदार पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment