श्री. भगतसिंह कोश्यारी, मा. राज्यपाल तथा कुलपती |
श्री. उदय सामंत, मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग |
डॉ. दिनकर एम. साळुंके |
शिवाजी विद्यापीठात पत्रकार परिषदेस संबोधित करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे. |
ऐश्वर्या मोरे (राष्ट्रपती सुवर्णपदक विजेती) |
स्वाती पाटील (कुलपती सुवर्णपदक विजेती) |
कोल्हापूर, दि. ३
मार्च: शिवाजी विद्यापीठाचा
५८वा दीक्षान्त समारंभ शनिवार, दि. ५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन
पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती श्री.
भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास उच्च व तंत्र शिक्षण
मंत्री श्री. उदय सामंत विशेष अतिथी म्हणून तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर एम.
साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील,
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर.
पळसे प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर,
गतवर्षीप्रमाणे यंदा होणारा ५८वा दीक्षान्त समारंभही ऑनलाईन आयोजित केला आहे. सकाळी
११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात होणाऱ्या या समारंभास
कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह वरिष्ठ अधिकारी व सर्व अधिष्ठाता प्रत्यक्ष तर मान्यवर
अतिथी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. या समारंभात एकूण ६२,३६० स्नातकांना
पदवी प्रदान करण्यात येतील. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या ३२,५२० (५२.१५%) इतकी लक्षणीय आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय
विद्यार्थ्यांची संख्या १९ असून त्यात दोन पीएच.डी. धारक स्नातकांचाही समावेश आहे. या वर्षी महाविद्यालयीन स्तरावरील
पदवी प्रदान समारंभ होणार नसून याच मध्यवर्ती दीक्षान्त समारंभाच्या माध्यमातून
सर्व स्नातकांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही
त्यांनी सांगितले.
या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रपती
सुवर्णपदक आणि कुलपती सुवर्णपदक प्राप्त स्नातकांच्या नावांचीही घोषणा केली. सन
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात क्रीडा, बौद्धिक व कला क्षेत्र आणि एनसीसी, एनएसएस
यांमधील गुणवत्ता तसेच व्यक्तीमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण
ज्ञान, वागणूक व नेतृत्व गुण यामध्ये आदर्श ठरल्याबद्दल विद्यापीठाच्या
रसायनशास्त्र अधिविभागात द्वितिय वर्षात शिकणाऱ्या श्रीमती ऐश्वर्या आकाराम
मोरे (मु.पो. वडरगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या विद्यार्थिनीस शिवाजी
विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे एम.ए.
(हिंदी) परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल सांगली येथील कस्तुरबाई वालचंद
महाविद्यालयाच्या श्रीमती स्वाती गुंडू पाटील (मु.पो. दानोळी, ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर) या विद्यार्थिनीस कुलपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके
यांच्याविषयी...
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दीक्षान्त समारंभाचे
प्रमुख पाहुणे डॉ. साळुंके यांची माहिती दिली. डॉ. दिनकर मश्नू साळुंके हे
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इम्युनॉलॉजिस्ट आणि स्ट्रक्चरल बायोलॉजिस्ट आहेत. डॉ.
साळुंके सध्या इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB), नवी दिल्ली या संस्थेचे संचालक आहेत.
डॉ. साळुंके यांचा जन्म दि. १ जुलै १९५५ रोजी बेळगाव
(कर्नाटक, भारत) येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्र, गणित आणि सांख्यिकी या विषयांत बी.एस्सी. (१९७६) केली. धारवाड येथील कर्नाटक
विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात फर्स्ट क्लास डिस्टींक्शनसह एम.एस्सी. (१९७८)
पूर्ण केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर येथून त्यांनी मॉलेक्युलर बायोफिजिक्स या विषयात पीएच.डी. (१९८३)
पूर्ण केली. अमेरिकेतील वॉल्थम, मॅसॅच्युसेट्स येथील ब्रॅंडाईस
विद्यापीठात त्यांनी पोस्टडॉक्टरल संशोधन (सन १९८५-८८) केले.
सन १९८८मध्ये डॉ. साळुंके नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
इम्युनोलॉजी (NII), नवी दिल्ली येथे शास्त्रज्ञ म्हणून
रुजू झाले आणि २०१५ पर्यंत तेथे कार्यरत राहिले. एन.आय.आय. येथे त्यांच्या
पुढाकाराने स्ट्रक्चरल बायॉलॉजी समूहाची स्थापना झाली. सुमारे २५ वर्षे त्यांनी या
समूहाचे नेतृत्व केले. नोव्हेंयबर २०१५ पासून त्यांनी इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक
इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीचे पहिले संचालक म्हणून काम पाहण्यास सुरवात केली.
त्यापूर्वी सन २०१० ते २०१५ या कालावधीत त्यांनी प्रादेशिक जैवतंत्रज्ञान
केंद्राचे अर्थात ‘आर.सी.बी.’चे संस्थापक कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे. सन २०१०-११ मध्ये
ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (THSTI), नवी दिल्ली येथे कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तीन
दशकांहून अधिक काळ त्यांनी इम्युन रिकग्निशन, मॉलेक्युलर मिमिक्री आणि अॅलर्जीचे संरचनात्मक जीवशास्त्र समाविष्ट असलेल्या
इम्युनॉलॉजीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधनकार्य केले आहे. या विषयांवर
त्यांचे १३०हून अधिक शोधनिबंध प्रकाशित आहेत. विविध संसर्गांना शरीर कशा प्रकारे
प्रतिकार करते, यावर त्यांचे संशोधनकार्य मूलभूत
प्रकाश टाकणारे आहे.
डॉ. दिनकर साळुंके अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे
मानकरी आहेत. यामध्ये राष्ट्रीय बायोसायन्स पुरस्कार (१९९९), शांतिस्वरुप भटनागर पारितोषिक (२०००), रॅनबॅक्सी संशोधन पुरस्कार (२००२), जे.सी. बोस राष्ट्रीय फेलोशीप
(२००७) आणि जी.एन. रामचंद्रन सुवर्णपदक (२०१०) यांचा समावेश आहे. भारतातील प्रमुख तीनही विज्ञान अकादमींचे ते
निर्वाचित फेलो आहेत. (यात इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (IAS), बेंगलोर; इंडियन नॅशनल सायन्स अकादमी (INSA), नवी दिल्ली; भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (NASI), अलाहाबाद यांचा समावेश आहे.) त्याचप्रमाणे द वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (TWAS) चेही ते फेलो आहेत.
‘शिव-वार्ता’वरून थेट प्रसारण
विद्यापीठाच्या या दीक्षान्त समारंभात प्रत्यक्ष
कोणतेही पारितोषिक अथवा पदवी प्रदान करण्यात येणार नाही. त्यासंदर्भात स्वतंत्रपणे
निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे निमंत्रितांनीही कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष
उपस्थित न राहता विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ (https://www.youtube.com/c/ShivVarta) या युट्यूब वाहिनीवरच सकाळी १०.४५ वाजता ऑनलाईन उपस्थित राहून कार्यक्रमात
सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या प्रसंगी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासून पदवी घेणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण दर्शविणारा तक्ता-
वर्ष |
पदवी घेणारे एकूण विद्यार्थी |
त्यातील विद्यार्थिनींची संख्या (कंसात टक्केवारी) |
१९६४ |
१०९४ |
१९९ (१८.१९%) |
१९७४ |
१००५१ |
१६६३ (१६.५५%) |
१९८४ |
१२६२८ |
३२६८ (२५.८८%) |
१९९४ |
२४९३५ |
७८१७ (३१.३५%) |
२०१८ |
५०४४४ |
२६९३८ (५३.४०%) |
२०२२ |
६२३६० |
३२५२० (५२.१५%) |
विद्यापीठाच्या ५८व्या दीक्षान्त समारंभाच्या अनुषंगाने अधिकची सांख्यिकीय माहिती थोडक्यात पुढीलप्रमाणे-
No comments:
Post a Comment