Tuesday, 29 March 2022

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक जाणिवांनी परिपूर्ण: डॉ. श्रीपाल सबनीस

 

शिवाजी विद्यापीठात 'अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाचे पैलू' या ग्रंथाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस व कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. व्ही.एन. शिंदे व लेखक लक्ष्मण साठे.


डॉ. श्रीपाल सबनीस

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. व्ही.एन. शिंदे व लक्ष्मण साठे.




लक्ष्मण साठे यांच्या ग्रंथाचे विद्यापीठात प्रकाशन

कोल्हापूर, दि. २९ मार्च: अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक जाणीवांनी समृद्ध आणि परिपूर्ण आहे. त्या दृष्टीने त्यांच्या साहित्याचे मूल्य समाजासमोर ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाचे पैलू या डॉ. लक्ष्मण साठे लिखित ग्रंथाचे प्रकाशन आणि गुणवतं विद्यार्थ्यांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले, अण्णाभाऊंच्या साहित्यातील विश्वात्मक जाणीवा या फार महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या समग्र साहित्यात स्वातंत्र्याची प्रेरणा व शोषणाविरुद्धचा हुंकार आहे. समतावादी भूमिकेतून लिहीलेल्या या साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आहे. त्यांच्या साहित्यातील भाषिक सौंदर्य नादावून टाकणारे आहे. जात, धर्म, प्रांत, देशाच्या भिंती ओलांडून जागतिक समुदायाला कवेत घेणारे आहे. भारताच्या स्वातंत्र्यासह विश्वाचे मूल्यभान जीवनाच्या जाणिवेतून अभिव्यक्त करणाऱ्या अण्णाभाऊंच्या साहित्याने देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्याचे भान जागते ठेवले. त्यांच्या साहित्यात बहुसांस्कृतिक एकात्मतेचे सूत्र आपल्याला सापडते. म्हणूनच लोकशाहीर या संज्ञेच्या पलिकडे अण्णाभाऊंचे एक साहित्यिक आणि विचारवंत म्हणून एक स्वतंत्र मूल्य आहे. ते अधोरेखित करणे काळाची गरज आहे.

डॉ. सबनीस म्हणाले, लक्ष्मण साठे यांनी अत्यंत त्रयस्थपणे संशोधन करीत असताना सदर ग्रंथात अण्णाभाऊंमधील तत्त्वज्ञ अप्रत्यक्षरित्या अधोरेखित केलेला आहे, ही बाब खूप महत्त्वाची आहे. अण्णाभाऊंच्या उपेक्षित, दुर्लक्षित पैलूंना प्रकाशझोतात आणणारा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी साकारला आहे. विवेकवादी इतिहासकार सर्वच प्रवाहांमध्ये असतात. त्यांचा समन्वय अभ्यासकांनी साधायला हवा, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, मराठी अधिविभागाने विद्यार्थ्यांना लिहीते केले, ही अतीव आनंदाची बाब आहे. कोणत्याही साहित्यकृतीच्या अर्पणपत्रिकेमध्ये नतमस्तक होण्याचा भाव असतो, प्रस्तावना हे तिचे महाद्वार असते तर त्यातून आत प्रवेशल्यानंतर समग्र साहित्याची भव्यता समोर उभी ठाकते. लक्ष्मण साठे यांचा हा ग्रंथ म्हणजे एक उत्तम संशोधनपत्रिकाच झालेला आहे. अशा पद्धतीचे प्रकल्प विभागांनी सातत्याने हाती घेऊन विद्यार्थ्यांना त्याद्वारे लेखनाच्या व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात.

प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊंच्या साहित्याशी लहानपणापासून जडलेला स्पष्ट केला. त्यांच्या साहित्याने आपल्याला गावकुसाबाहेरील विश्व दाखविले आणि समन्यायासाठी आग्रही राहण्याचे धडेही दिल्याचे सांगितले.

यावेळी विद्यापीठ गुणवत्ता यादी, राज्य पात्रता परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षा यांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या अधिविभागाच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये तसलिम मुल्ला, नुतन सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी, ज्योत्स्ना भाटवडेकर, भक्ती नाईक, हणमंत नागरगोजे, जयश्री शिंदे, विनायक सरदेसाई, केवल वेटम या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

लक्ष्मण साठे यांनी आपल्या मनोगतात ग्रंथनिर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगितली. अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर राजेश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले तर सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment