डॉ. सदानंद मोरे |
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के |
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, नागरिक. |
डॉ. गोमटेश्वर पाटील यांच्या १७ संपादित ग्रंथांचे प्रकाशन
कोल्हापूर, दि. १७ मार्च: प्राचीन काळापासून मराठी
भाषा विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर जैन साहित्याने मोलाचे योगदान दिलेले आहे, असे
प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ
विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे संत तुकाराम अध्यासन आणि
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित संत तुकाराम बीज आणि ग्रंथ प्रकाशन अशा संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे
म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
होते, तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस व मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे
प्रमुख उपस्थित होते.
येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे
झालेल्या या कार्यक्रमात महावीर महाविद्यालयातील डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी संपादित केलेल्या मध्ययुगीन
मराठी जैन साहित्यातील हस्तलिखित १७ संपादित ग्रंथांच्या २४ खंडांचे मान्यवरांच्या
हस्ते प्रकाशन करण्यात आले.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, वैदिक धर्म आणि श्रमण
धर्म अर्थात जैन व बौद्ध धर्म हे तीनही धर्म भारतीय संस्कृती नामक एकाच व्यापक
परिवेशाचा भाग आहेत. त्यांनी सातत्याने एकमेकांवर प्रभाव टाकलेला आहे. त्यातून
त्या त्या धर्माचे म्हणून एक व्यक्तीमत्त्व विकसित झाले आहे. ते धर्म म्हणून
स्वतंत्र असले तरी एकभारतीयत्वाचे प्रतीक आहेत. या ऐक्यापासून आपण फारकत घेता कामा
नये. भाषेच्या अंगाने विचार करता मराठी अथवा महाराष्ट्री भाषा ही जैनांची धर्मभाषा
राहिली आहे. त्याचप्रमाणे भाषावार प्रांतरचनेपूर्वी कर्नाटक-महाराष्ट्र
यांच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व भाषिक व्यवहार हे सर्वसामान्य होते.
त्यामुळेच मराठीतील पहिला शिलालेख हा थेट श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पायी
सापडतो, याच आश्चर्य वाटून घेण्याजोगे काहीच नाही. सातवाहन काळात मराठी ही
दरबाराची, कारभाराची आणि धर्माचीही भाषा होती. त्यानंतर थेट छत्रपती शिवाजी
महाराजांनी आपल्या स्वराज्यात मराठीला तिचे हे स्थान पुन्हा प्रदान केले. राज्यव्यवहार
कोषाच्या निर्मितीतून त्यांनी पर्शियन भाषेला मराठी पर्यायी शब्द प्रदान केले. हे या
समग्र भारतीय परंपरांचा समग्र पट आपण समजून घ्यायला हवा. त्यासाठी त्यांचा तौलनिक
अभ्यास व्हायला हवा. या हस्तलिखित ग्रंथांच्या संपादनातून गोमटेश्वर पाटील यांनी
सुभाषचंद्र अक्कोळे यांच्यानंतर प्रचंड मोठे असे कार्य साकारले आहे. त्यांनी जैन
मराठी साहित्याच्या अनुषंगाने एक संपादित ग्रंथ करावा, जेणे करून त्याचा
विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश करता येईल. त्याचप्रमाणे या मध्ययुगीन भाषेच्या
अनुषंगाने एक स्वतंत्र शब्दकोषाचा प्रकल्पही हाती घेतला जाणे आवश्यक आहे, अशी
अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. मोरे यांनी आपल्या भाषणात संत तुकाराम आणि
वारकरी संप्रदाय यांच्या अनुषंगाने अत्यंत चिकित्सक मांडणी केली. ते म्हणाले, कोल्हापूर
ही संत तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई यांची साक्षात्कार भूमी आहे.
तुकारामांनी वेदांचा अर्थ महाराष्ट्री भाषेत सांगितला, असे म्हणून बहिणाबाईंनी
तुकारामांच्या अभंगांना ‘तुकाराम वेद’ असे संबोधले. थोर
इंग्रजी अभ्यासक अलेक्झांडर ग्रँट याने तुकारामांना ‘भारताचे राष्ट्रकवी’ असे संबोधले, तर
दि.पु. चित्रे यांनी तुकारामांना जगाशी जोडत असताना त्यांचा ‘जागतिक कवी’ म्हणून गौरव केला.
तुकाराम हे द्रष्टे कवी होते. तुकारामांच्या या बदलाच्या प्रतिमा आपण समूळ समजावून
घेतल्या पाहिजेत.
यावेळी डॉ. राजन गवस म्हणाले, सातत्याने
पाश्चात्य कथन परंपरांचे गुणगान करणाऱ्यांनी आपल्या अस्सल आणि अद्भुत भारतीय
कथाविश्वाकडे नजर टाकायला हवी. आपली वाङ्मयातील कथन परंपरा ही अत्यंत भक्कम असून
भाषिक आदानप्रदानातून ती काळाच्या बरोबरीने विकसित झालेली आहे. आपल्या काव्यपरंपरेतील
कथनही अत्यंत प्रभावी आहे. या वाङ्मय इतिहासाचे पुनर्लेखन जितके आवश्यक आहे,
तितकेच आपल्या पाली आणि अर्धमागधी या भाषांचा अभ्यास होत राहणेही अतिशय महत्त्वाचे
आहे. आपल्या मठा-मंदिरांमध्ये अद्यापही हजारो हस्तलिखिते अद्यापही पडून आहेत.
त्यांचे जतन, संवर्धन व संशोधन अत्यावश्यक आहे. त्यामुळे गोमटेश्वर पाटील यांनी
हाती घेतलेले संशोधनकार्य आता अव्याहतपणे सुरूच ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.
डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, डॉ. गोमटेश्वर पाटील
यांनी अत्यंत अद्भुत व भव्य स्वरुपाचा प्रकल्प साकारला आहे. सांप्रदायिक
वाङ्मयाबद्दलचा आधुनिक दृष्टीकोन बदलणारा हा प्रकल्प आहे. जैन वाङ्मय परंपरांचा
अभ्यास करताना त्यातील भारतीयत्व अधोरेखित करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले
आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
म्हणाले, केवळ विद्यापीठीय आवारांमध्येच संशोधनकार्य चालते, या समजाला छेद देणारे
भरीव स्वरुपाचे संशोधनकार्य डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी साकारले आहे. महाविद्यालयीन
प्राध्यापकांनीही संशोधनकार्याची परंपरा निर्माण करावी, असा संदेश त्यांनी आपल्या
या कृतीतून दिलेला आहे. बारावे ते अठरावे शतक अशा सहाशे वर्षांतील जैन वाङ्मयाच्या
अभ्यासातून साऱ्या प्रकारच्या भेदांच्या पलिकडे भारतीयत्वाची भावनाच अंतिमतः
दृढमूल व सर्वश्रेष्ठ आहे, असा एक महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे.
यावेळी डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी आपल्या या
व्यापक संशोधनाविषयी उपस्थितांना माहिती देतानाच मध्ययुगीन जैन साहित्यामध्ये
मराठी साहित्यिकांचे भरीव योगदान असल्याचे निरीक्षण नोंदविले. संत तुकाराम
अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजेश पाटील
यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. शरद गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास
विद्यापीठाच्या मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.जी. कुलकर्णी, इतिहास
अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, अशोक बाबर, डॉ.
राजेंद्र कुंभार, डॉ. आर.पी. लोखंडे, डॉ. प्रभंजन माने यांच्यासह शिक्षक,
विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment