Tuesday 22 March 2022

कॉ. दत्ता देशमुख बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे लोकशिक्षक: प्रा. विठ्ठल शेवाळे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा. विठ्ठल शेवाळे. व्यासपीठावर (डावीकडून) कॉ. अतुल दिघे, डॉ. भारती पाटील, डॉ. किशोर खिलारे आणि कॉ. बाबुराव तराळी.


 

कोल्हापूर, दि. २२ मार्च: कॉ. दत्ता देशमुख यांचे जीवन म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा इतिहास आहे. समोरच्या व्यक्तीचे प्रथम ऐकून घेऊन मग आपले मत मांडणारे बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे ते लोकशिक्षक होते,’ असे प्रतिपादन प्रा. विठ्ठल शेवाळे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कॉ. दत्ता देशमुख अध्यासनातर्फे आयोजित ‘कॉ. दत्ता देशमुख: नेतृत्व आणि कर्तृत्व’ या विषयावर आयोजित व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. अतुल दिघे होते.

प्रा. शेवाळे म्हणाले, ‘दत्ता देशमुख केवळ निवडणूक प्रसंगी नव्हे, तर प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर मतदारसंघाचा दौरा करीत असत. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबत विधानसभेत आवाज उठवत असत. त्यामुळे लोकांचे वास्तव व खरेखुरे प्रश्न मांडले जात होते. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात कधीच विरोधासाठी विरोध केला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यसभेवर निवडून देण्यामध्ये त्यांनी आणि व्ही. एन. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.’

अध्यक्षीय मनोगतात कॉ. अतुल दिघे म्हणाले, दत्ता देशमुख हे बहुजनांच्या संघर्ष प्रक्रियेतून तयार झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे कार्य आणि कर्तृत्व पुस्तक रूपाने लोकांसमोर येणे आवश्यक आहे.’

विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. किशोर खिलारे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

याप्रसंगी कॉ. बाबुराव तराळी, डॉ. रवींद्र भणगे, प्रा. अनिल मोहिते, डॉ. अश्विनी पाटील, प्रा. मिलिंद सावंत, प्रा. साक्षी गावडे यांच्यासह विविध अधिविभागातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण शिंदे, शोभा पाटील, वैष्णवी कुंभार, भाग्यश्री मर्दाने, विद्या कांबळे आदींनी इत्यादींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

No comments:

Post a Comment