Friday, 25 March 2022

यशवंतराव चव्हाण यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा तरुणांनी वेध घ्यावा: डॉ. राजन गवस

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. उमेश गडेकर संपादित पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. राजन गवस व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. संतोष सुतार, डॉ. गडेकर, डॉ. प्रकाश पवार व गजानन साळुंखे.

डॉ. राजन गवस


डॉ. उमेश गडेकर संपादित पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर, दि. २५ मार्च: आजच्या तरुण पिढीने यशवंतराव चव्हाण यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा सर्वंकष वेध घेण्याचा प्रयत्न करीत राहायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने “कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण व हमीद अली” या डॉ. उमेश गडेकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील होते.

डॉ. गवस म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तीमत्त्व सामाजिक, राजकीय या पलिकडे साहित्यिक व सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत सजग व प्रगल्भ होते. आजही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू अप्रकाशित आहेत. सर्वसामान्य लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामध्ये त्यांनी केलेले सामाजिक परिवर्तनाचे कार्य, देशबांधणीच्या कार्यातील त्यांचे योगदान आणि सर्वसमावेशक विकासासाठीची तळमळ या बाबींचा साकल्याने अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.

डॉ. गवस पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाणांच्या ३२ (ग) या कायद्याने कसणाऱ्याला दिलेल्या जमिनीच्या मालकी हक्कामुळे समाजातील शोषित आणि प्रस्थापित अशी समाज रचना बदलून नवीन समाज रचना आकारास आली. त्यांनी घेतलेला नादारीचा निर्णय खेड्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सशक्तीकरण करणारा ठरला आणि त्यामुळेच स्त्री साक्षरता शक्य झाली, ही बाब आपण अभिमानपूर्वक स्वीकारायला हवी. डॉ. गडेकर यांनी संपादित पुस्तकात यशवंतरावांच्या अशा काही पैलूंवर चांगला प्रकाश टाकला आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण व हमीद अली यांच्या कार्यात ग्रामीण विकास हा समान दुवा आढळतो. ज्या प्रकारे कर्मवीर अण्णांनी ग्रामीण भागात शैक्षणिक संकुलाचे जाळे निर्माण केले, त्याच प्रकारे यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण विकासाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. हमीद अली यांनी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेला मोठे सहकार्य केले. ही ग्रामीण आस्था हा तिघांच्याही कार्याचा समान धागा आहे.

कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण अध्यासन व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश पवार, पुस्तकाचे संपादक डॉ. उमेश गडेकर, संयोजक प्रा. गजानन साळुंखे, डॉ. नितीन माळी, चेतन गळगे, सुधीर देसाई, डॉ. संतोष सुतार, अमोल मिणचेकर, डॉ. वैशाली भोसले, डॉ. कविता वड्राळे, डॉ. उर्मिला दशवंत, डॉ. नीलम जाधव, मृणालिनी जगताप, परशुराम वडार, सागर वाळवेकर, डॉ. विशाल ओहाळ, डॉ. दादा ननवरे यांच्यासह विविध महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

पुस्तकाविषयी थोडक्यात...

“कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण व हमीद अली” या पुस्तकात कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांचे नातू श्री. सुभाष आप्पासाहेब देसाई यांनी कर्मवीरांच्या तत्त्वनिष्ठपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिलेल्या श्री. यशवंतराव चव्हाण: आदर्शाच्या प्रकाशात विकसित झालेले व्यक्तिमत्त्व या लेखात यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली आहे. डॉ. अरुण भोसले यांच्या “राष्ट्रीय मनोवृत्तीचे सनदी अधिकारी हमीद अली” या लेखातून प्रकाश झोतात न आलेल्या हमीद अली यांच्या व्यक्तिमत्त्वाची व कार्याची ओळख करून दिलेली आहे.


No comments:

Post a Comment