Monday 14 March 2022

वैश्विक व सौर किरणांमुळे वातावरणावरील परिणामांचा होणार अभ्यास


शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश संशोधन केंद्रात बसविणार आधुनिक उपकरणे

कोल्हापूर, दि. १४ मार्च: वैश्विक व सौरकिरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणाऱ्या बदलांचा व घडामोडींचा अभ्यास शिवाजी विद्यापीठामध्ये करणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसविण्यात येणार आहेत. अहमदाबाद व हैदराबादपाठोपाठ अशी सुविधा असणारे कोल्हापूर हे देशातील अवघे तिसरे केंद्र आहे. ही माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरूंनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या अंतरिक्ष विभागाअंतर्गत येणाऱ्या भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा, अहमदाबाद आणि शिवाजी  विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या २०२१ साली वातावरणातील मध्यांबर (मेसोस्फियर) -दलांबर (आयनोस्फियर) -ऊष्मांबर (थर्मोस्फियर) या जमिनीपासून ५० किमी ते ५०० किमी वढ्या अंतरामध्ये उत्सर्जित होणाऱ्या एकाधिक तरंगलांबीच्या प्रकाश किरणांचा अभ्यास करण्यासाठी सामंजस्य करार झाला होता. या सामंजस्य करारांतर्गत भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा, अहमदाबाद यांच्याकडून सुमारे १ कोटी किमतीची उपकरणे शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसवण्यात येणार आहेत. सदरची उपकरणे बसविण्यासाठी लागणाऱ्या वेधशाळेच्या निर्मितीसाठी शिवाजी विद्यापीठाकडून सुमारे २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  या उपकरणांमध्ये सीसीडी-आधारित मल्टीवेव्हलेंथ एअरग्लो फोटोमीटर आणि पीआरएल- एअरग्लो इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा समावेश आहे. भारताशा प्रकारच्या सुविधांनीयुक्त  वेधशाळा सध्या अहमदाबाद आणि हैद्राबाद येथे कार्यान्वित आहेत. येत्या काही हिन्यांत शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राचे नाव या यादीत समाविष्ट होणार आहे.

या तिन्ही केंद्रांद्वारे एकत्रितरित्या संशोधन करून वैश्विक आणि सौर किरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणाऱ्या घडामोडी आणि बदलांचा सविस्तर अभ्यास करता येणार आहे. यामुळे शिवाजी विद्यापीठात अवकाश संशोधनासाठी लागणाऱ्या मूलभूत संशोधन सुविधेमध्ये वाढ होणार असून याचा उपयोग संशोधक विद्यार्थ्यांना होणार आहे. पदार्थविज्ञान अधिविभागाचे डॉ. राजीव व्हटकर या संदर्भातील पुढील आवश्यक ती कार्यवाही करीत आहेत.

No comments:

Post a Comment