शिवाजी विद्यापीठात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. ए.एम. गुरव, डॉ. एम.एस. देशमुख आणि डॉ. सुशीला ओडियार. |
'मनोहारी मनोयुवा' या फेस्कॉमच्या महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन करताना मान्यवर व ज्येष्ठ नागरिक. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित महिला उद्योजकता मेळावा व प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व मान्यवर. |
शिवाजी
विद्यापीठात महिला दिनानिमित्त महिला मेळावा आणि उद्योग प्रदर्शन उत्साहात
कोल्हापूर, दि. ७ मार्च: देशाच्या शाश्वत प्रगतीमध्ये महिला उद्योजकांचे योगदान महत्त्वाचे
असणार आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज
येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)- फेस्कॉम मनोयुवा कौन्सिल फेस्कॉम प्रादेशिक विभाग, सांगली आणि
कोल्हापूर व सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला नागरिक सेवा संघ
यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त महिला
मेळावा आणि महिला उद्योजकांसाठी उद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते
झाले. उद्घाटनानंतर मानवशास्त्र
सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते
बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आजच्या युगात
महिलांनी साधलेली प्रगती अभिमानास्पद आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेतही विद्यार्थिनींचा सहभाग होता. आज विद्यापीठात
विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींचे प्रमाण अधिक आहे, ही विशेष बाब आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यांत महिलांच्या प्रगतीचा आलेख
उल्लेखनीय आहे. कौटुंबिक संस्काराचे केंद्र स्त्रीकडे असल्यामुळे भावी समाज घडविण्याची शक्ती महिलांमध्ये असते. महात्मा गांधी यांना अभिप्रेत देशाच्या शाश्वत
विकासामध्ये मोलाचे योगदान देण्याची क्षमता महिलांकडे आहे. त्या दृष्टीने त्यांनी
संघटनात्मक स्तरावर प्रयत्न करीत राहायला हवे. विद्यापीठ त्यांना सर्वोतोपरी
मार्गदर्शन करण्यास तत्पर आहे. हा संवाद होत राहण्यासाठी असे मेळावे सातत्याने
घेणे आवश्यक आहे.
यावेळी 'महिला सबलीकरण' या विषयावर निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला जोशी यांचे व्याख्यान
झाले. त्या म्हणाल्या, इतर देशांच्या
तुलनेत भारतीय महिलांना त्यांचे हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करावा
लागला नाही कारण भारतीय राज्यघटनेनेच महिलांना त्यांचे सर्व अधिकार प्रदान केले आहेत. सर्व महिलांना कायद्यांचे जुजबी ज्ञान आवश्यक
आहे, ज्यामुळे त्यांना स्वतःसाठी लढा देता येईल. त्यांनी महिलांना त्यांच्या मूलभूत हक्कांसह मालमत्ता मालकी हक्क,
स्त्रीधन वारसा कायदा, वडिलोपार्जित संपत्ती
हक्क आदी कायद्यांची माहिती
दिली.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
महिलांचा जोशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात चेतनादेवी कुरपे,
सुलोचना माने, वासंती मेरु, सुमन वड्डीकर, दीपाली पवार, तनुजा शिपुरकर,
प्रिया पाटील, स्वरदा काळे, ललिता नाखे, गीतांजली ठोंबे, आक्काताई लाड यांचा समावेश आहे.
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. ए.एम.गुरव म्हणाले, महिला दिनाचे औचित्य
साधून उद्योगासंदर्भात महिलांना योग्य मार्गदर्शन आणि उद्योग क्षेत्रामध्ये
पुढाकार घेण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ज्यामुळे महिलांची आर्थिक उन्नती
कौशल्यांमध्ये वाढ होण्यासाठी यासंदर्भातील प्रशिक्षणाची गरज आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते फेस्कॉमच्या ‘मनोहारी मनोयुवा’ महिला दिन विशेषांकाचे प्रकाशन झाले. यात ८० महिलांनी लेख लिहिलेले आहेत. तत्पूर्वी, रोपास पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुशीला ओडियार यांनी केले. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले, तर सविता मोरे यांनी आभार मानले.
उद्योग प्रदर्शनात २९ स्टॉल
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उद्योग प्रदर्शनात एकूण २९ स्टॉल मांडण्यात आले. महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू, उत्पादनांची माहिती व विक्री असा दुहेरी
उपक्रम होता. विद्यापीठातील सेवकांसह उपस्थितांनी या स्टॉलना भेट देऊन विविध वस्तूंची खरेदी केली.
No comments:
Post a Comment