Monday 14 March 2022

केंद्र सरकारकडून शिवाजी विद्यापीठास ४.२७ कोटींचा निधी मंजूर

नॅनो-जैवतंत्रज्ञान व कर्करोगविषयक संशोधन प्रकल्पाला चालना

डॉ. पी.एस. पाटील

डॉ. के.डी. सोनवणे

डॉ. एम.एस. निंबाळकर

डॉ. के.डी. पवार


कोल्हापूर, दि. १४ मार्च: शिवाजी विद्यापीठात नॅनोजैवतंत्रज्ञान कॅन्सर वरील संशोधनास लागणाऱ्या सुविधांसाठी भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या बिल्डर (डीएसटी-बिल्डर) योजनेअंतर्गत ४.२७ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठास २.८५ कोटी रूपयांचा निधी मंजू अनुदानातून नुकताच प्राप्तही झाला आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या चार विविध विज्ञान अधिविभागातील संशोधकांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागास न२नो-जैवतंत्रज्ञान व कर्करोगावरील संशोधनविषयक प्रस्ताव सादर केला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत प्राप्त निधीतून नॅनो जैवतंत्रज्ञान कर्करोगावरील संशोधनासाठी लागणारी आधुनिक आणि सुसज्ज प्रयोगशाळा शिवाजी विद्यापीठात उभारण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. एस. पाटील हे या पंचवार्षिक प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. या प्रकल्पाअंतर्गत सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे डॉ. के. डी. सोनवणे, नॅनोसायन्स आणि तंत्रज्ञान विभागाचे डॉ. के. डी. पवार वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. एम.एस. निंबाळकर प्रमुख अन्वेषक (Principal Investigator) म्हणून काम पाहणार आहेत. सदर प्रकल्पांतर्गत विविध धातूंचे, विविध आकाराचे नॅनोपार्टीकल्स तयार करणे त्यांचे भौतिक गुणधर्म तपासणे याविषयी संशोधन केले जाईल. तसेच, जीवाणू, विषाणू, वनस्पती कवक यांच्यामधील नॅनोतंत्रज्ञानाला उपयुक्ततेबाबत संशोधनदेखील केले जाईल. पश्चिम घाटातील विविध वनस्पतींचा नॅनोपार्टीकल्स तयार करण्यासाठी आणि त्यांच्या औषधी शेतीपूरक वापराबाबतही संशोधन करण्यात येईल. त्याचप्रमाणे बायोइन्फॉर्मेटिक्स तंत्रज्ञानाच्या साह्याने नॅनोकण नॅनो मटेरिअल यांची प्रक्रिया करून नॅनोपार्टीकल्सचा सजीव पेशींवर होणाऱ्या परिणामांविषयी चाचण्या करून निष्कर्ष पडताळणी करण्यात येईल.

 

संशोधनाचे महत्त्व

सदर संशोधनामुळे विविध सजीवांचा उपयुक्त नॅनोकण निर्मिती करण्यासाठीच्या उपयोजनाबाबत भरीव माहिती मिळेल. नॅनोकण बनविणाऱ्या जीवाणूंचा शोध, नॅनोकण नॅनोमटेरिअलचा कर्करोग, न्यूरोसायन्स, अल्झायमर (स्मृतिभ्रंश), टारगेटेड ड्रग डिलीव्हरी रिलीज, कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त नॅनोमटेरिअल, नॅनो पेस्टीसाईड आदी अनुषंगानेही संशोधन केंद्रित असेल. याबरोबरच नॅनो तंत्रज्ञानाला पूरक स्वरूपाचे अध्ययन, अध्यापन आणि त्यासंदर्भातील संशोधनासाठी लागणारे प्रशिक्षण, कार्यशाळा, वेबिनार, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन यांचाही या प्रकल्पात अंतर्भाव आहे.

No comments:

Post a Comment