Saturday 19 March 2022

शिवाजी विद्यापीठात ‘बीएआरसी’च्या ‘रेडॉन जिओ-स्टेशन’ची स्थापना

 

मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्रामार्फत शिवाजी विद्यापीठात स्थापित करण्यात आलेल्या रेडॉन जिओ-स्टेशन यंत्रणेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. आर. के. कामत, डॉ. एम.एस. देशमुख, अभय जायभाये, डॉ. एस. एस. महाजन, डॉ. आर. जी. सोनकवडे, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा संचालक जी.आर. पळसे, बीएआरसीचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप कंसल, डॉ. आर.जी. कुलकर्णी, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. डी.के. मोरे, डॉ. विजय फुलारी, डॉ. के.वाय. राजपुरे.

शिवाजी विद्यापीठात स्थापित 'बीएआरसी'चे रेडॉन जिओ-स्टेशन


भूकंपसदृ हालचालींवर लक्ष ठेवणे होणार शक्य; सुविधा असणारे एकमेव अकृषी विद्यापीठ

कोल्हापूर, दि. १९ मार्च: येथील शिवाजी विद्यापीठामध्ये भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी) यांच्याकडून रेडॉन जिओ-स्टेशनची स्थापना करण्यात आली असून या यंत्रणेद्वारे भूगर्भातील भूकंपसदृश हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. अशी सुविधा स्थापित करण्यात आलेले शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ ठरले आहे. ही माहिती डीएसटी-सैफ केंद्राचे समन्वयक डॉ. आर.जी. सोनकवडे यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्राने इंद्रा (INDRA- lndian Network for Detection of Radon Anomaly)  नावाचा प्रकल्प चालू केला आहे. त्यासाठी स्वतंत्र, सौर उर्जेवर चालणारे रेडॉन जिओ-स्टेशन विकसित केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत रेडॉन जिओ-स्टेशनची देशाच्या वेगवेगळ्या भागांत स्थापना करण्यात येत आहे. त्याच्या स्थापनेपासून देखभालीपर्यंतचा सर्व खर्च भाभा अणू संशोधन केंद्राकडून करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठा या स्टेशनची उभारणी भौतिकशास्त्र विभागातर्फे सैफ- डीएसटी केंद्राच्या आवारामध्ये केली आहे. हे स्टेशन सौर र्जा आणि डेटा कम्युनिकेशनद्वारे चालवले जाणारे स्वतंत्र युनिट आहे. त्यामध्ये बीएसएनएल सिमचा वापर केला आहे. सुमारे शंभर किलो वजनाचे हे स्टेशन दोन मीटर जागेत स्थापित केले आहे. कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील भूकंपसदृ हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने रेडॉन जिओ-स्टेशन खूपच महत्त्वपूर्ण ठरेल. हे जिओ-स्‍टेशन परिसरातील भूकंपीय हालचालींचे निरीक्षण करून भूकंपशास्त्रीय संशोधनासाठी डेटाबेस तयार करेल. हे स्टँडअलोन जिओ-स्टेशन रेडॉन डेटा थेट बीएआरसीमधील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाकडे पाठविणार आहे.

यापूर्वीही भाभा अणू संशोधन केंद्रच्या सहकार्याने पर्यावरणातील किरणोत्साराचे मापण करणाऱ्या IERMON (Indian Environmental Radiation Monitoring Network) या यंत्रणेची विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात जुलै २०१९ मध्ये स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या सुविधा प्रस्थापित असणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. भाभा अणू संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या मदतीने केलेल्या या जिओ-स्‍टेशन स्थापनेमुळे या क्षेत्रातील संशोधन उपक्रमांना चालना मिळेल. तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी पुढील संशोधन करू शकतील.

या स्टेशनचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे,  परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.जी.कुलकर्णी, आंतरविद्याशाखा विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. एम.व्ही. गुळवणी आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. विजय फुलारी, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. निलेश तरवाळ आणि भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप कंसल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment