Friday, 18 March 2022

प्रशासकीय सेवा अभ्यासक्रमविषयक

तज्ज्ञ समितीमध्ये डॉ.जगन कराडे

 

कोल्हापूर, दि. १८ मार्च: महाराष्ट्र राज्यातील अकृषि विद्यापीठे अधिनस्त महाविद्यालयांमध्ये प्रशासकीय सेवा व्यक्तिमत्व विकास असा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्चशिक्षण संचालनालयामार्फत एक महत्त्वपूर्ण तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. या तज्ज्ञ समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ.जगन राडे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने यांचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.

मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.खुशपत जैन समिती प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. या समितीमध्ये नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ.प्रमोद लाखे, मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रभारी संचालक डॉ.सुरेश मैंद, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर येथील संचालक डॉ.लता जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.संजीव सोनवणे यांचीही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीने महाराष्ट्रातील अकृषि विद्यापीठे महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षेसंदर्भात अभ्यासक्रमाचे स्वरूप, मूल्यांकन, गुणांकन इ. संदर्भातील सर्वसमावेशक अहवाल पंधरा दिवसां राज्य शिक्षण संचालनालयास सादर करावयाचा आहे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 


No comments:

Post a Comment