विद्यापीठात पाचदिवसीय क्षमता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन
कोल्हापूर, दि. ८ मार्च: समाजाच्या समस्या चपखलपणे ओळखून त्यातून संशोधनाचा विषय शोधला पाहिजे. विषय ज्ञानाचा वापर करून संशोधनातून सामोरे आलेले उपाय समाजाच्या भाषेत मांडणे आवश्यक आहे. समस्यांचे उपाय बहुआयामी संशोधनातून सुचविले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या वतीने पाच दिवसीय क्षमता विकास कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन होते. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, उद्देश समजून घेऊन साधने व तंत्रे यांचा वापर संशोधनामध्ये केला पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक संशोधनामध्येही उपयुक्त ठरतो. परावलंबित्व कमी करून संशोधनाचा आनंद घेता येतो आणि समाजाला ते उपयुक्त ठरते. त्यासाठी संशोधकांचा क्षमता विकास आणि क्षमता सुधार करण्याचे कार्य अशा उपक्रमातून होते.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, संशोधनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना अवगत केले पाहिजे. संशोधनातून गुणवत्तापूर्ण शोधनिबंधांचे प्रकाशन, पेटन्टची नोंदणी, पेटंटचे वाणिज्यकरण, तंत्रज्ञान हस्तांतरण अशा प्रक्रियेतून संशोधक गेल्यास ते संशोधन गुणवत्तापूर्ण होते. त्यातूनच सृजनात्मक विचारशक्ती आणि नवोन्मेष निर्माण होऊन उद्योजकता विकसित होऊ शकते.
प्रा. महाजन म्हणाले, एखाद्या समस्येवर विविध विषयांतील संशोधकांनी एकत्रित चर्चा केल्यास ती समस्या बहुआयामी संशोधनासाठी योग्य ठरू शकते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हवामान बदल, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी, सौर ऊर्जेची किफायतशीरता अशा अनेक विषयांचा बहुआयामी संशोधनासाठी विचार करता येईल. बहुआयामी संशोधनातून समाजाच्या समस्या सोडवण्यात योगदान देता येईल, यासाठी संशोधकांच्या क्षमता विकासाचा कार्यक्रम हाती घेतला गेला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. केदार मारुलकर यांनी केले, तर श्रीमती अर्चना मानकर यांनी आभार मानले. याप्रसंगी युजीसी स्ट्राईड योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. पन्हाळकर, प्रा. डॉ. ए. एम. गुरव, डॉ. सागर वाळवेकर व डॉ. रामदास बोलके उपस्थित होते.
No comments:
Post a Comment