कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित जाहीर व्याख्यानात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के. सोबत डॉ. सोमनाथ पवार, डॉ. एस. बी. महाडिक. |
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या जाहीर व्याख्यानास उपस्थित महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी |
कोल्हापूर, दि. १६ मार्च: संख्याशास्त्राचा उपयोग समाजाला प्रत्येक टप्प्यावर होत असतो. संख्याशास्त्राच्या अभ्यासक, संशोधकांनी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा जाणीवपूर्वक वापर करावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्राचे दैनंदिन सामाजिक जीवनातील उपयोजन समजून घ्यायला हवे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा संख्याशास्त्रज्ञ डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा
संख्याशास्त्र अधिविभाग आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे विज्ञान व
अभियांत्रिकी संशोधन मंडळ (डीएसटी-सर्ब) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दसरा
चौकातील शाहू स्मारक भवनात संख्याशास्त्राच्या पदवीस्तरीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
‘संख्याशास्त्राचे सामाजिक उपयोजन’ या विषयावर कुलगुरू डॉ. शिर्के यांचे जाहीर व्याख्यान
आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत
होते.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या
भाषणात संख्याशास्त्रीय बोजड संकल्पनांना पूर्णतः फाटा देऊन दैनंदिन जीवनातील
छोटीमोठी उदाहरणे देत संख्याशास्त्राने मानवी जीवन कसे व्यापले आहे, ते
विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ते म्हणाले, १९ व्या
शतकापासून ते अगदी समकाळापर्यंत
संख्याशास्त्राच्या आधारे सामाजिक प्रश्न सोडविले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. एकोणीसाव्या शतकात आपल्या
सेवाभावासाठी प्रसिद्धी पावलेल्या महान व आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांची शुश्रुषा करता करता
युद्धभूमीपेक्षाही रुग्णालयातील अस्वच्छता व असुविधांमुळे अधिक सैनिकांना प्राण
गमवावे लागत आहेत, हे संख्याशास्त्रीय वर्तुळाकार आलेखाच्या आधारे दाखवून दिले.
त्यानंतरच्या कालखंडात पी. व्ही. सुखात्मे, सी. आर. राव, एडवर्ड डेमिंग आदींनी
संख्याशास्त्राच्या आधारे जगाला
भरीव योगदान दिले आहे.
गरीबी कमी करण्यापासून ते दर्जा नियंत्रण, सुधारणा अशा विविध क्षेत्रांमध्ये
संख्याशास्त्राचा प्रभावी उपयोग या तमाम शास्त्रज्ञांनी दाखवून दिला. अशा सामाजिक भावनेतून संख्याशास्त्र विषयाच्या उपयोजनाचा विचार केला जाणे आवश्यक आहे. व्यवस्थेतील 'टॉप टू बॉटम' अशा पद्धतीने सर्वच घटकांनी या कामी सहभाग
नोंदवल्यास व्यवस्था उत्तम प्रकारे चालण्याची शाश्वती देता येईल. कोणतीही व्यवस्था सकारात्मक पद्धतीने बदलण्यासाठी
व्यवस्थापन महत्वाचे असते. विद्यार्थ्यांनी आपले शास्त्रीय विचार साधार व आत्मविश्वासाने मांडले, तर व्यवस्था सुधारणेसाठी त्याचा उपयोग होईलच,
शिवाय, आपण केलेल्या कामाचे समाधानही लाभेल. केलेल्या कार्याचा योग्य मोबदला मिळेल, तो वेगळाच. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी
संख्याशास्त्राकडे सजगपणे पाहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानही केले.
यावेळी डॉ. सोमनाथ पवार यांनी स्वागत
केले. डॉ. एस. बी. महाडीक यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संतोष सुतार
यांनी आभार मानले. कार्यक्रमास
विविध महाविद्यालयांचे शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment