जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात विविध क्षेत्रांत प्रभावी योगदान देणाऱ्या महिलांचा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासमवेत (डावीकडून) अश्विनी दानीगोंड, डॉ. रेश्मा पवार, विजयमाला देसाई, प्रभाताई कुलकर्णी, मीना शेषू, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. भारती पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, सुचेता कोरगावकर, शैलजा सूर्यवंशी, साधना घाटगे, डॉ. सपना आवाडे आणि डॉ. आर.व्ही. गुरव.
जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात विशेष कार्यक्रम:
‘महिला उद्योजकांची यशोगाथा आणि स्त्री
सबलीकरणापुढील आव्हाने’ विषयावर एकदिवसीय परिसंवाद
कोल्हापूर, दि. ८
मार्च: विविध क्षेत्रांत यशस्वी असलेल्या महिलांच्या
यशोगाथांमागे असलेला त्यांचा अनेक वर्षांचा संघर्ष आणि कष्ट अखिल समाजासाठी प्रेरणादायी
ठरणारा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी
आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग आणि संग्राम संस्था, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला
दिनानिमित्त 'महिला
उद्योजकांची यशोगाथा आणि स्त्री सबलीकरणापुढील आव्हाने' या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आणि महिला उद्योजकांचा सत्कार असा संयुक्त समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत
होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाच्या व्यासपीठावर शैक्षणिक, राजकीय,
माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, सामाजिक, आर्थिक इत्यादी विविध क्षेत्रांत योगदान
देणाऱ्या महिलांचा सत्कार होतो आहे, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यांचे यश हे
काही एका दिवसात मिळालेले नाही. येथील प्रत्येक महिलेने त्यासाठी मोठा संघर्ष
केलेला आहे. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी
विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये उद्योजकता विकास तसेच कौशल्य विकास या दृष्टीने
उपयुक्त अशा सूचना कराव्यात, त्यांच्या मनात काही योजना असल्यास त्याही
विद्यापीठाला सांगाव्यात, जेणे करून त्याचा विद्यार्थीहितासाठी उपयोग करता येईल.
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुरू झालेला हा सुसंवाद येथून पुढे कायम
राहावा तसेच वृद्धिंगत व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ.
शिर्के यांनी आपल्या भाषणात शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीत व प्रगतीमध्ये योगदान
देत असलेल्या शिक्षिकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही गौरवपूर्ण नामोल्लेख केला.
या कार्यक्रमात प्रभाताई कुलकर्णी, विजयमाला देसाई, सुचेता कोरगावकर, शैलजा सूर्यवंशी, साधना घाटगे, डॉ. रेश्मा पवार, अश्विनी दानीगोंड आणि प्रा. (डॉ.) सपना आवाडे या विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी बजावणाऱ्या
महिलांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल, सन्मानपत्र
व स्मृतिचिन्ह असे सत्काराचे स्वरुप होते.
यावेळी डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. प्रतिभा देसाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मीना शेषू यांच्यासह शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व परिचय डॉ. भारती पाटील यांनी केले, तर कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.
उद्घाटन सत्रानंतर झालेल्या पहिल्या सत्रात उपस्थित सत्कारमूर्तींसमवेत
डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. नीलांबरी जगताप आणि अमृता मांजरेकर यांनी संवाद साधला. त्यानंतर
दुसऱ्या सत्रात ‘स्त्री सबलीकरणापुढील आव्हाने’ या विषयावर खुली चर्चा झाली. या चर्चेत डॉ. भारती पाटील, मीना शेषू आणि डॉ.
मेघा पानसरे यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment