शिवाजी विद्यापीठाच्या ५८व्या दीक्षान्त समारंभात स्नातकांना ऑनलाईन संबोधित करताना महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती श्री. भगत सिंह कोश्यारी |
शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षान्त समारंभाची मिरवणूक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे यांच्या नेतृत्वाखाली निघाली. |
शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षान्त समारंभाची मिरवणूक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे यांच्या नेतृत्वाखाली निघाली. |
शिवाजी विद्यापीठाच्या ५८व्या दीक्षान्त समारंभात ऑनलाईन मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंखे. |
कोल्हापूर, दि. ५ मार्च: नवभारताच्या उभारणीत विद्यार्थ्यांची अत्यंत कळीची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने आपल्या वैज्ञानिक व तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषाच्या अभिव्यक्तीमध्ये कालसुसंगत संयुक्तिकता व मूल्य असले पाहिजे, याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी, कारण या बाबी जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी आणि शाश्वत उपाय प्रदान करतात, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक डॉ. दिनकर एम. साळुंके यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा ५८व्या दीक्षान्त समारंभ आज
मोठ्या उत्साहाच्या वातावरणात, पण कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन स्वरुपात
साजरा झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नातकांना संबोधित करताना डॉ.
साळुंके बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा
विद्यापीठाचे कुलपती श्री. भगत सिंह कोश्यारी होते. विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित
झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ३५०० जण ऑनलाईन सहभागी झाले. या कार्यक्रमाद्वारे ६२,३६० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.
यशासाठी कोणतेही जादूचे सूत्र नसल्याचे सांगून डॉ. साळुंके म्हणाले,
नवस्नातकांनी आता आयुष्याच्या आणि उच्चशिक्षणाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत असताना बौद्धिक चपळता
वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जेव्हा एखादी नवीन संधी येते, तेव्हा ती
मिळवण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहता आणि तुमच्या
स्वतःच्या संधी निर्माण करण्यासाठीही तयार असता. विद्यार्थी म्हणून मिळवलेले शिक्षण
आणि ज्ञान यावर आधारित तुमचा स्वतःचा मार्ग तयार केला पाहिजे. तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल, तेथे प्रामाणिकपणा आणि बांधिलकी या दोन
गुणांच्या बळावर सर्वोत्कृष्टतेच्या साध्यतेचा ध्यास घेऊन कार्यरत राहावे, असे
आवाहन त्यांनी केले.
३४ वर्षानंतर प्रथमच आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये सर्वसमावेशकता असून
शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी आवश्यक लवचिकता त्यात अंतर्भूत आहे. विद्यार्थ्यांच्या
सर्वांगीण प्रगतीसाठी हे धोरण उपयुक्त ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
‘राष्ट्र
उभारणीत शिवाजी विद्यापीठाचा मोलाचा वाटा’
डॉ. साळुंके म्हणाले, शिवाजी विद्यापीठ
आपल्या स्थापनेपासून गेल्या ६० वर्षांपासून राष्ट्र
उभारणीच्या कार्यात आपला मोलाचा वाटा उचलत असून सर्वच क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देत आहे. भारताच्या
वैज्ञानिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक
धोरणाच्या झोतात विद्यापीठ आपल्या प्रयत्नांच्या व क्षमतेच्या बळावर सर्व क्षेत्रांत आघाडी घेईल आणि एक दिवस देशातील उच्चशिक्षणाच्या सर्वोत्तम संस्थांमध्ये गणले
जाण्याइतकी मोठी झेप लवकरच घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या विविध संशोधन आणि विकास क्षेत्रांत शिवाजी विद्यापीठाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र कृषी आणि लघुद्योगांसाठी
सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे आपल्या
परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना
स्वावलंबी तथा आत्मनिर्भर बनवण्यात विद्यापीठाने बजावलेली भूमिका निश्चितपणे स्पृहणीय आहे, असे
गौरवोद्गारही त्यांनी काढले.
‘शास्त्रज्ञ,
तंत्रज्ञांच्या मजबूत फळीच्या जोरावर ज्ञान-महासत्ता होण्यास
भारत सक्षम’
डॉ. साळुंके यांनी आपल्या भाषणात भारताच्या वैज्ञानिक
प्रगतीचा सर्वंकष वेध घेतला. ते म्हणाले, ज्ञान महासत्ता (Knowledge Superpower) होण्यासाठी भारतामध्ये
सुप्रशिक्षित शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व तज्ज्ञांची एक मजबूत फळी साकार होण्याची गरज
आहे. ती क्षमता भारतामध्ये निश्चितपणे आहे. त्यासाठी देशाचा वैज्ञानिक स्वभाव निर्माण करण्यावर भर देणे आवश्यक आहे. भारतातील खूप मोठ्या महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गाला कमी खर्चात चांगले शिक्षण देऊन त्यांच्यात दर्जेदार कार्यशक्ती विकसित करता येईल. त्यांना आवश्यक तांत्रिक कौशल्ये प्रदान करून सक्षम बनविता येईल. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे आणि त्यांचे विविध विभाग विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये
गुंतलेले आहेत.
१९४७मध्ये भारत हे आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित असणारे नवे उदयोन्मुख
राष्ट्र होते. त्यावेळी त्याची वैज्ञानिक प्रगती अल्पच, पण दर्जेदार होती, असे सांगून
डॉ. साळुंके म्हणाले, आज जागतिक विज्ञानात
भारताचे योगदान उल्लेखनीय आहे. भारताने गेल्या सात दशकांत लक्षणीय प्रगती साधली असून वैज्ञानिक संशोधनासाठी अव्वल दर्जाच्या देशांत आज त्याची गणना केली जाते. जैवतंत्रज्ञान, फार्मास्युटिकल्स, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण विकास, आरोग्यसेवा आणि कृषी
या क्षेत्रांतील भारताच्या कर्तृत्वाचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी झाला आहे. हरितक्रांती, श्वेतक्रांती आणि अंतराळ संशोधन आणि तत्सम क्षेत्रांतील आपल्या कामगिरीने भारताने अन्य अल्प-संपन्न देशांना दिशा दाखविण्याचे काम केले.
डॉ. साळुंके पुढे म्हणाले, भारत सध्या जगातील
टॉप १२ बायोटेक्नॉलॉजी डेस्टिनेशन्समध्ये असून आशिया-पॅसिफिक विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील बायोटेक उद्योगांमध्ये आठ हजारांहून अधिक बायोटेक स्टार्ट-अप आणि बायोटेक कंपन्यांचा समावेश
आहे. अमेरिकेबाहेर अमेरिकेकडून सर्वाधिक परदेशी थेट गुंतवणूक प्राप्त करणाऱ्या
उत्पादकांचा हा देश आहे. लस निर्मिती
क्षेत्रातही भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला आहे. युनिसेफला पुरविल्या
जाणाऱ्या एकूण लसींमध्ये सुमारे ६०% वाटा एकट्या भारताचा आहे.
विशेषत:, अलीकडील कोविड-१९ साथीच्या कालखंडात स्थानिक पातळीवर आणि
जलद गतीने लस निर्माण करण्याच्या आपल्या क्षमतेमुळेच आपण साथीच्या आजाराचे योग्य व्यवस्थापन करू शकलो.
जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचा भारत सर्वात मोठा प्रदाता असल्याचे सांगून ते म्हणाले, औषध निर्मितीच्या क्षेत्रात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वैद्यकीय वस्तू निर्यातीत भारत जगातील बाराव्या क्रमांकाचा देश आहे. जेनेरिक औषधांसाठीची प्रेरणा ही आमच्या संशोधन व विकासासाठी येणारा अल्प खर्च, अभिनव विज्ञान व तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ यांच्या मुबलकतेमुळे झाली आहे. अंतराळ संशोधन
क्षेत्रातही भारताने अव्वल पाच राष्ट्रांमध्ये स्थान मिळविले आहे. आजघडीला लोकसंख्येच्या
बाबतीत जगातला प्रत्येक सहावा नागरिक भारतीय आहे, तसाच अंतराळातला प्रत्येक दहावा उपग्रह भारतीय आहे, ही आपली अंतराळ क्षेत्रातली लक्षणीय कामगिरी
आहे. माहिती तंत्रज्ञान आणि आयटी-आधारित क्षेत्रांतील उच्च गुणवत्तेच्या भारतीय
तंत्रज्ञ व तज्ज्ञांच्या उपस्थितीने जागतिक माहिती व्यवस्थापनाचे क्षेत्र व्यापले
असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक घटकाच्या
योगदानातूनच देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
कुलपती श्री. भगत सिंह कोश्यारी |
भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.
कुलपती श्री. कोश्यारी म्हणाले, सध्या
जग विविध समस्यांनी ग्रस्त आहे. त्यावर उपाय योजण्याचे काम युवा पिढीच सक्षमपणे
करु शकते. नवोन्मेष, नवविचार आणि दर्जा या बळावर आपल्याला
आत्मनिर्भर व्हायचे आहे, ही बाब नवपदवीधर विद्यार्थ्यांनी
सदैव लक्षात ठेवावी. पदवीची प्राप्ती ही या नवीन प्रवासाची खरी सुरुवात आहे.
त्यामुळे आयुष्यात कोणतेही काम करताना सर्वोत्तमतेचा ध्यास घेऊन करा आणि उच्च
ध्येय ठेवून वाटचाल करा. हाती घेतलेले उपक्रम पूर्ण करताना उत्तम दर्जासाठी आग्रही
राहावे. जेणेकरुन त्याची फलनिष्पत्तीही उत्तम राहील. विद्यापीठाचे कुलगुरु आणि
येथे कार्यरत सर्वांचे काम उत्कृष्टपणे सुरु असल्यामुळे शिवाजी विद्यापीठाची
वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे, असे ते म्हणाले.
इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे विशेष स्थान आहे, तसेच स्थान शैक्षणिक क्षेत्रात शिवाजी
विद्यापीठाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा श्री.
कोश्यारी यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य योग्य दिशेने
सुरु असून ते देशातील प्रगतीशील विद्यापीठांपैकी एक म्हणून नावाजलेले आहे. यापुढील
काळातही विद्यापीठाने आपली कामगिरी उंचावत अधिकाधिक लौकिक प्राप्त करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विद्यापीठाची संशोधकीय कामगिरी
अव्वल दर्जाची: कुलगुरू डॉ. शिर्के
शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करीत असताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी उच्चशिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, संशोधनातून उद्योगनिर्मिती, नाविन्यपूर्ण व अभिनव संशोधन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि भविष्यवेधी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम या पंचसूत्रीच्या बळावर विद्यापीठाने आपली वाटचाल चालविली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील संशोधनाबाबत भारतातील विद्यापीठांचे जे मूल्यांकन झाले, त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा 'एच' इंडेक्स १२० इतका असून एकूण ६२७६ प्रकाशित शोधनिबंधांना १,२०,९३३ इतकी सायटेशन्स आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे संशोधकीय मानांकन देशात उंचावले आहे. विविध विषयांतील सुमारे ३२ बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) शिवाजी विद्यापीठाने आजवर प्राप्त केले आहेत. ही आपल्या संशोधनाची मोठी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाच्या ‘शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास
फौंडेशन’ला सेक्शन-८ कंपनी
म्हणून मान्यता मिळाल्याचे पत्र ऑगस्ट २०२१मध्ये केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडून
प्राप्त झालेले आहे, ही या वर्षातील एक महत्त्वाची घडामोड आहे. ऑनलाईन शिक्षण
पद्धतीमध्ये सकारात्मक पाऊल पुढे टाकताना विद्यापीठ ऑनलाईन एमबीए, ऑनलाईन एम.कॉम., ऑनलाईन एम.एस्सी.
(गणित) आणि एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) हे चार नवे अभ्यासक्रम सुरू करीत आहे. विद्यापीठाच्या
विद्यार्थी विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी पालक कल्याण निधी
योजनेअंतर्गत एकूण १७८ प्रस्ताव मंजूर केले असून विद्यार्थी-पालकांना एकूण १ कोटी
६६ लाख ५० हजार रुपयांचा निधी प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिर्के पुढे म्हणाले, विद्यापीठाच्या
विकासासाठी, संशोधन
कार्यात विविध अधिविभागातील शिक्षक सतत प्रयत्नशील असल्याने संशोधन व विकासासाठी
भारतातील डीएसटी-फिस्ट, डीएसटी-सर्ब, डीएसटी-इन्स्पायर, डीएसटी-स्तुती, इरॅस्मस प्लस या
वित्तीय शिखर संस्थांसह महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामशिक्षण मंडळ, अर्थ व सांख्यिकी
संचालनालय आणि जिल्हा नियोजन समिती, कोल्हापूर यांचेकडून विद्यापीठास या वर्षभरात एकूण ८ कोटी २८ लाख ८९ हजार ३०४
रुपये इतका निधी प्राप्त झाला. विद्यापीठाने स्वनिधीतून सुरू केलेल्या ‘रिसर्च इनिशिएशन स्कीम’अंतर्गत वर्षभरात एकूण ५२
शिक्षकांचे प्रकल्प मंजूर केले असून त्यांना रु. ४६ लाख, ४३ हजार ५०० इतका निधी मंजूर
करण्यात आला. विद्यापीठाच्या 'सेंटर
फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन
अँड लिंकेजिस'ला
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून 'उदयोन्मुख' केंद्राचा दर्जा प्राप्त झाला असून
याअंतर्गत दोन टप्प्यात मिळून एकूण ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या
टप्प्यात ३५ लाखांचा निधी प्राप्त आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण
विभागाने शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन स्थापन करण्यासाठी ३
कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असल्याचेही त्यांनी
सांगितले.
शिवाजी विद्यापीठात स्थापित नॅशनल अॅकॅडेमिक
डिपॉझिटरी (NAD) कक्षामार्फत
सन २००२ ते २०२१ या १९ वर्षांच्या कालावधीतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ७ लाख
८५ हजार ४९४ इतकी प्रमाणपत्रे डिजीलॉकरमध्ये अपलोड करण्यात आली आहेत. तसेच ‘अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ (ABC) साठी सदर पोर्टलवर
विद्यापीठामार्फत नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती कुलगुरूंनी यावेळी दिली. शिवाजी
विद्यापीठाच्या हीरकमहोत्सवी वर्षातील कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्याचे काम
प्रगतीपथावर असून लवकरच त्याचा सर्वंकष आराखडा सादर करण्यात येणार असल्याचेही
त्यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे तांत्रिक अडचणीमुळे समारंभात सहभागी
होऊ शकले नसून त्यांनी स्नातकांना शुभेच्छा दिल्याचे कुलगुरु डॉ. शिर्के यांनी
सांगितले.
तत्पूर्वी, कुलगुरू कार्यालयापासून ते राजर्षी शाहू
सभागृहापर्यंत दीक्षान्त मिरवणुकीने समारंभास प्रारंभ झाला. परीक्षा व मूल्यमापन
मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे यांनी हाती ज्ञानदंड घेऊन मिरवणुकीचे नेतृत्व
केले. मिरवणुकीत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील
यांच्यासह विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.जी. कुलकर्णी आणि आंतरविद्या विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) एम.व्ही. गुळवणी सहभागी झाले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र
अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी पसायदान सादर केले. समारंभाची सुरुवात व शेवट
राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत कुलगुरू डॉ. शिर्के यांनी
केले, तर प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
परीक्षा संचालक श्री. पळसे यांनी दीक्षान्त समारंभात प्रदान करावयाच्या पदव्या,
पदविका आणि प्रमाणपत्रांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तृप्ती
करेकट्टी व धैर्यशील यादव यांनी केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे
यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment