पुष्पविज्ञान संशोधनातही विद्यापीठाकडून भरीव
योगदान अपेक्षित: डॉ. के.व्ही. प्रसाद
कोल्हापूर, दि. १२ मार्च: शिवाजी विद्यापीठामध्ये
वनस्पतीशास्त्रासह विविध विज्ञान शाखांत महत्त्वाचे संशोधनकार्य सुरू आहे.
पुष्पविज्ञानाच्या संशोधन क्षेत्रातही विद्यापीठ भरीव योगदान देईल, अशी अपेक्षा
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) पुष्पविज्ञान संशोधन संचालनालयाचे (डीएफआर)
संचालक डॉ. के.व्ही. प्रसाद यांनी नुकतेच येथे केले.
पुणे येथील आयसीएआरचे पुष्पविज्ञान संशोधन
संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठाचा जैवतंत्रज्ञान अधिविभाग यांच्यादरम्यान
गुरूवारी (दि. १० मार्च) सायंकाळी शैक्षणिक व संशोधकीय आदानप्रदानविषयक सामंजस्य
करार करण्यात आला. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील
यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. त्या प्रसंगी डॉ. प्रसाद बोलत होते.
ते म्हणाले, भारतीय पुष्पविज्ञान
संचालनालयाच्या माध्यमातून पुष्विज्ञानविषयक संशोधन, तंत्रज्ञान, जनजागृती व
प्रसार या अनुषंगाने व्यापक कार्य करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठासमवेत
झालेल्या सामंजस्य करारामुळे पुष्पविज्ञानविषयक संशोधन व विकासाला चालना तर
मिळेलच, शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये करिअर संधी म्हणूनही या
शिक्षणाचा प्रसार करता येईल.
कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले,
पुष्पविज्ञानातील शैक्षणिक व संशोधन संधींकडे अद्याप म्हणावे तितके गांभीर्याने पाहिले
जात नाही. तथापि, संशोधनापासून ते स्वतंत्र व्यवसाय संधींपर्यंत अनेक शक्यता यात
अंतर्भूत आहेत. त्या दृष्टीने या संदर्भातील काही विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम
हाती घेता येतील का, या दृष्टीनेही विद्यापीठ शक्यतांची पडताळणी करून पाहील. त्या
कामी संस्थेनेही आवश्यक तेथे विद्यापीठास मार्गदर्शन व सहकार्य करावे, अशी अपेक्षा
त्यांनी व्यक्त केली.
सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि डॉ. प्रसाद यांनी स्वाक्षरी केल्या.
यावेळी जैवतंत्रज्ञान अधिविभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती जाधव यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. कार्यक्रमास प्रा. व्ही.ए. बापट, वरिष्ठ संशोधक डॉ. प्रशांत
कवर, डॉ. सुषमा पाटील आणि महेश कांबळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment