Saturday, 12 March 2022

डॉ. किरण गुरव यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

 

डॉ. किरण गुरव यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करताना साहित्य अकादमीचे चेअरमन डॉ. चंद्रशेखर कंबार.

डॉ. किरण गुरव यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करताना साहित्य अकादमीचे चेअरमन डॉ. चंद्रशेखर कंबार. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे व साहित्य अकादमीचे व्हाईस चेअरमन माधव कौशिक.


कोल्हापूर, दि. १२ मार्च: माझ्या मनात लिहीणं हे सतत रुंजी घालत असतं. त्या अर्थानं मी सातत्यानं मनात लिहीणारा माणूस ठरतो. वाचक म्हणून आपण जे पेरून घेतो, तेच कालांतरानं उगवून येतं, अशी माझी लेखनामागची धारणा आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे साहित्यिक तथा शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉ. किरण गुरव यांनी काल (दि. ११) नवी दिल्ली येथे केले.

नवी दिल्ली येथील कमलानी सभागृहात श्री. गुरव यांना काल साहित्य अकादमीचे चेअरमन डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे व साहित्य अकादमीचे व्हाईस चेअरमन माधव कौशिक उपस्थित होते.

डॉ. गुरव यांनी या प्रसंगी आपल्या लेखन प्रवासाबद्दल उपस्थितांना अवगत केले. जयंत पवार आणि आसाराम लोमटे यांच्यानंतर मराठी कथेला तिसरा साहित्य अकादमी पुरस्कार आपल्या बाळूच्या अवस्थांतराची डायरी या कथासंग्रहाला दिल्याबद्दल डॉ. गुरव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, कथेचा आवाका माळरानातून वाहणाऱ्या एका ओढ्यासारखा असतो. त्या ओढ्याची म्हणून एक जैविक परिसंस्था असते. अगदीच समुद्राप्रमाणे महाकाय नसली तरी तिच्या दृष्टीनं परिपूर्ण आणि जिवंत असते. निसर्गात म्हणून तिचं एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान असते. तेच स्थान साहित्यविश्वात कथेचे आहे. प्रामाणिक लेखकाचा आत्मा साहित्यकृतीत कायम वास्तव्याला असतो. जागरुक वाचकाच्या ते लगेच लक्षात येते. त्यामुळे लेखकाने हा प्रामाणिकपणा जपणे खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, साहित्य अकादमीने आजादी का अमृतमहोत्सवअंतर्गत १० ते १५ मार्च या कालावधीत साहित्योत्सव आयोजित केला असून याअंतर्गत साहित्यविषयक विविध उपक्रम आयोजित केले आहेत. यातील देशभरातील साहित्य अकादमी विजेत्या २४ विविध भाषिक साहित्यिकांचा लेखक-संवाद हा उपक्रमही समाविष्ट आहे. यातही डॉ. किरण गुरव मराठी साहित्याचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment