Monday 21 March 2022

सजग मतदार निर्मितीत विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची: श्रीकांत देशपांडे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे. सोबत (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.

श्री. श्रीकांत देशपांडे



कोल्हापूर, दि. २१ मार्च: सजग मतदार निर्माण करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी अभ्यासक्रम निर्मितीसह विविध उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे व्यक्त केली.

श्री. देशपांडे यांनी आज शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन गत-बैठकीचा आढावा घेण्यासह निवडणूक प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने कोणते उपक्रम राबविता येतील, या दृष्टीने चाचपणी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, कोल्हापूरचे उप-जिल्हा निडणूक अधिकारी भगवान कांबळे, पन्हाळा प्रांताधिकारी तथा श्री. देशपांडे यांचे संपर्क अधिकारी अमित माळी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले, सर्वसाधारणपणे विद्यार्थीदशेपासूनच निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी, या उद्देशाने विद्यापीठीय व्यवस्थेकडून निवडणूक आयोगाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. हा अभ्यासक्रम मोजका सैद्धांतिक आणि अधिकाधिक कृतीशील उपक्रमांवर भर देणारा असावा, याचीही दक्षता घेण्यात यावी. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र साधनस्रोतांचा वापर करावा. समूह कृतीगट स्थापनेतून संवाद वृद्धिंगत करण्यावरही त्याचा भर असावा. हा अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे देशभरातील विद्यापीठांतही हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी राज्य आयोगामार्फत प्रयत्न करण्यात येतील.

निवडणूक प्रक्रिया तसेच मतदार जागृतीच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाने राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल कौतुकोद्गार काढून श्री. देशपांडे म्हणाले, विद्यापीठाने यापुढील कालखंडात अधिक कृतीशील भूमिका घेऊन स्थानिक चौकशी समित्यांच्या माध्यमातून संलग्नित महाविद्यालयांतूनही इलेक्टोरल लिटरसी क्लब तथा डेमॉक्रसी क्लब स्थापन करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या समावेशन अभ्यासक्रमांतही निवडणूक प्रक्रियाविषयक माहिती अंतर्भूत करावी. शिवाजी विद्यापीठाने निडणूक प्रक्रिया, लोकशाही तथा मतदार जागृतीच्या अनुषंगाने विविध परिसंवाद व वेबिनार घेतले, ही स्तुत्य बाब आहे. नजीकच्या कालखंडात राज्य निवडणूक आयोग आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर संयुक्तिक विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी आयोग सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. राज्यात शक्य असेल तेथे जिल्हास्तरीय इलेक्शन म्युझियम स्थापन करण्याचाही आपण गांभीर्यपूर्वक विचार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी श्री. देशपांडे यांना शिवाजी विद्यापीठ निवडणूक प्रक्रिया व मतदार जागृतीच्या अनुषंगाने राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. आर.व्ही. गुरव यांनी लोकशाही दिन, मतदार दिवस या अनुषंगाने विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेले परिसंवाद व विविध स्पर्धा यांची माहिती दिली.

No comments:

Post a Comment