जागतिक शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल: अदिलैदिस बार्सनाज
कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: येथील शिवाजी विद्यापीठासमवेत क्युबा येथील विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्रालयाच्या रेशीम संशोधनविषयक झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे, असे प्रतिपादन क्युबाच्या राष्ट्रीय रेशीम प्रकल्पाच्या संचालिका श्रीमती अदिलैदिस रुईझ बार्सनाज यांनी आज येथे व्यक्त केले.
क्युबा सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्रालयाचे सेंटर फॉर रिसर्च इन प्रोटीन प्लँट्स अँड बोनॅचरल प्रोडक्ट्स आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या दरम्यान आज सकाळी रेशीम प्रकल्पविषयक सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.
श्रीमती बार्सनाज म्हणाल्या, यापूर्वी क्युबा सरकारसमवेत सन २०१३ ते २०१८ या कालावधीत शिवाजी विद्यापीठाचा करार होता. त्याअंतर्गत उभय संस्थांमध्येही रेशीमशेतीच्या अनुषंगाने अतिशय उत्तम संशोधनकार्य झाले. त्यातून येथील संशोधक डॉ. ए.डी. जाधव यांचा क्युबा सरकारने पुरस्कार देऊन गौरवही केला. नव्या सामंजस्य कराराअंतर्गतही अशाच स्वरुपाचे भरीव संशोधन व शाश्वत विकासाचे कार्य साकार होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शैक्षणिक व संशोधकीय आदान-प्रदानाबरोबरच रेशीम शेती क्षेत्रातील शाश्वत संशोधन व विकास या दृष्टीने उपयुक्त असे तंत्रज्ञान सदर सामंजस्य करारातून साकार व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
यावेळी सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी तर क्यबा सरकारच्या वतीने श्रीमती बार्सनाज यांनी स्वाक्षरी केली. यावेळी क्युबाचे संशोधन कार्लोस डेव्हीड रुझ मेसा, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख, आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाचे समन्वयक डॉ. अनिल घुले आदी उपस्थित होते.
असा आहे सामंजस्य करार...
सदरचा सामंजस्य करार सन २०२२ ते २०२७ असा पंचवार्षिक आहे. त्याअंतर्गत दोन्ही संस्थांकडून शैक्षणिक व संशोधकीय कार्यक्रम नियमितपणे राबविला जाईल. रेशीमशास्त्राअंतर्गत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे आदानप्रदान तसेच तुती, रेशीम कीटक, संगोपन तंत्रज्ञान, जैविक खते, मित्र कीड आणि रोग, मूल्यवर्धिक उत्पादने, रियाकलिंग ऑफ सेरीकल्चर वेस्ट इत्यादींच्या अनुषंगानेही संशोधनास चालना देण्यात येईल. तुती, रेशीम कीटक, वाणांचे आदानप्रदान यांसह दोन्ही देशांसाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या अनुषंगाने उभय देशांतील शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या भेटींचे आयोजन करण्यात येईल. दोन्ही संस्थांतील विद्यार्थीही शैक्षणिक व संशोधन प्रकल्पांवर एकत्रित काम करतील. शेतकऱ्यांनाही तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यात येईल. त्याचप्रमाणे दोन्ही देशांतील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेतील. विविध संशोधनांच्या अनुषंगाने रसायनशास्त्र, जैवतं६ज्ञान, जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि नॅनोतंत्रज्ञान आदी शाखांचेही सर्वसमावेशक धोरण ठरविण्यात सहकार्य घेण्यात येईल.
डॉ. ए.डी. जाधव यांना कुलगुरूंच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान
क्युबाचे तत्कालीन राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो यांनी शिवाजी विद्यापीठातील डॉ. ए.डी. जाधव यांची क्युबाच्या राष्ट्रीय रेशीम प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली. तेव्हापासून डॉ. जाधव गेली दहा वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून क्युबा सरकारने त्यांचा ‘इनोव्हेशन २०२१’ पुरस्काराने गौरव केला. हा पुरस्कार डॉ. जाधव यांच्या वतीने डॉ. बार्सनाज यांनी स्वीकारला होता. तो त्यांनी या प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान केला. डॉ. जाधव यांच्याप्रती आम्हाला प्रचंड आस्था व आपुलकी असल्याचे उद्गार त्यांनी या प्रसंगी काढले. तर, हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. जाधव यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment