Sunday, 6 February 2022

लता मंगेशकर यांचे निधन:

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा स्वर निमाला: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के



कोल्हापूर, दि. ६ फेब्रुवारी: गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे विसाव्या शतकावर आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा स्वर कायमचा निमाला आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, लता मंगेशकर यांचे कोल्हापूरशी आणि शिवाजी विद्यापीठाशी स्नेहाचे नाते होते. २१ नोव्हेंबर १९७८ रोजी शिवाजी विद्यापीठाने त्यांना सर्वोच्च डी.लिट. ही मानद पदवी तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.एस. भणगे यांच्या हस्ते प्रदान करून त्यांच्या कार्याचा कृतज्ञ गौरव केला होता. लता मंगेशकर यांच्या स्वरांनी गत शतकभरात भारतातीलच नव्हे, तर जगभरातल्या संगीतरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. येथून पुढेही पिढ्यान् पिढ्यांवर त्यांच्या आवाजाची मोहिनी कायम राहणार आहे. संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची संपूर्ण कारकीर्द म्हणजे एक कार्यशाळाच होती. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या क्षेत्रात स्वयंप्रज्ञेने तळपणारी गानसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


No comments:

Post a Comment