'असमानता आणि दारिद्र्य' या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत ग्रंथाचे संपादक डॉ. जगन कराडे आणि डॉ. आर.बी. पाटील. |
'असमानता आणि दारिद्र्य' या ग्रंथाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात मनोगत व्यक्त करताना माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे. सोबत सहभागी समाजशास्त्रज्ञ. |
'असमानता आणि दारिद्र्य' या ग्रंथाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
कोल्हापूर, दि. १५
फेब्रुवारी: भांडवलशाहीच्या रेट्यात अधिकाधिक संपत्तीसंचयाच्या
हव्यासातून जगात गरीब-श्रीमंत अशी दरी वाढते आहे, असमानतेला खतपाणी घालते आहे, असे
प्रतिपादन भारती विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे यांनी आज येथे
केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने ‘असमानता आणि दारिद्र्य’
(Inequality and Poverty)
या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते.
डॉ. भोईटे म्हणाले, दारिद्र्य
आणि असमानता या अनुषंगाने प्राचीन काळापासून चर्चा होतच आली आहे. महाभारत असो की
कालिदासाचे मृच्छकटिक, प्राचीन वाङ्मयातही त्यांचे दाखले आढळतात. मानवी जगण्यासमोरची
ही दोन मोठी आव्हाने आणि अविभाज्य घटक आहेत. दारिद्र्याचे दशावतारही अनेक
स्वरुपाचे आढळतात. आपण एकावर उपाय शोधला की त्याचा नवा प्रकार सामोरा येतो. असे
निरंतर सुरू आहे. लोक गरीबीसह जगणे स्वीकारतात. त्यांच्याहून अधिक भौतिक स्थितीतील
लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात आपल्या गरीबीच्या जाणीवा निर्माण होतात. पूर्वी
‘धट्टीकट्टी गरीबी, लुळीपांगळी श्रीमंती’ या
ब्रीदाचा समाजाच्या राहणीमानावर वरचष्मा होता. आता भांडवलशाहीच्या रेट्यात मात्र
अधिकाधिक संपत्ती जमा करण्याचा हव्यास घातक ठरतो आहे. ही बाब सर्वांनाच साधत नाही
आणि समाजातील आर्थिक दरी अधिकाधिक रुंदावतेच आहे. हे खेदजनक आहे. मात्र, या
अनुषंगाने समाजशास्त्रज्ञांनी, अर्थशास्त्रज्ञांनी आपापल्या परीने उपाययोजना शोधत
राहणेही समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. डॉ. कराडे आणि डॉ. पाटील यांनी
सदर संपादित पुस्तकाच्या माध्यमातून त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकलेले आहे, असे
गौरवोद्गारही त्यांनी काढले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू
डॉ. शिर्के म्हणाले, जगातील दारिद्र्य आणि असमानता यांवर मात करण्याची अगर त्या
अनुषंगाने संशोधन करण्याची जबाबदारी ही केवळ काही ठराविक अभ्यासक्षेत्रांची अथवा
संशोधकांचीच आहे, असे नव्हे; तर, प्रत्येक समाजघटकाचे त्यासाठी काही उत्तरदायित्व
आहे, याची सर्वदूर जाणीव निर्माण होणे ही आजची खरी गरज आहे. जगातील सामाजिक-आर्थिक
असमानता दूर होऊन संपत्तीचे सर्व घटकांत समन्यायी वितरण होण्याच्या दृष्टीने
परिवर्तन होण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ.
जगन कराडे आणि डॉ. राजेंद्र पाटील यांनी संपादित केलेल्या ‘असमानता आणि दारिद्र्य’
या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर पुस्तकाच्या अनुषंगाने झालेल्या परिसंवादात राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मान्यवरांनी
सहभाग घेतला. यामध्ये डॉ. विद्युत जोशी (गुजरात), डॉ. आर. इंदिरा (कर्नाटक), डॉ.
आनंद कुमार (गोवा), डॉ. वेन्केटेश्वरलु (आंध्रप्रदेश), डॉ. एस. गुरुस्वामी (तमिळनाडू),
डॉ. अरविंदर अन्सारी (नवी दिल्ली), डॉ. बिस्वजीत घोष (पश्चिम बंगाल), डॉ. नागराजू
गुंडेमेडा (हैदराबाद) यांनी आपली मते नोंदविली. यावेळी नवी दिल्ली येथील रावत
प्रकाशनाच्या प्रणित रावत यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार
मानले.
No comments:
Post a Comment