विदुषी सुजाता गुरव यांच्या गायनाने रसिक तृप्त
![]() |
| (उपरोक्त सर्व फोटोंसाठी: शिवाजी विद्यापीठात वचन संगीत संध्या कार्यक्रमात गाताना ज्येष्ठ विदुषी सुजाता गुरव.) |
कोल्हापूर, दि. १८ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाचे शरण साहित्य अध्यासन आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवण्णा यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज (दि. १८) 'वचन संगीत संध्या' या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये धारवाड येथील किराणा घराण्याच्या ख्यातकीर्त शास्त्रीय गायिका विदुषी सौ. सुजाता गुरव यांचे गायन सादर झाले. या गायनाने मोठ्या संख्येने उपस्थित असणारे रसिक तृप्त झाले. विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अध्यासनाच्या समन्वयक डॉ. तृप्ती करेकट्टी म्हणाल्या, अनुभवजन्य ज्ञानपरंपरेतून बसवादी शरणांनी निर्माण केलेली वचने पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संगीत हे माध्यम अत्यंत प्रभावशाली ठरेल. कर्नाटकामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय, भजन, लोकगीत आदी प्रकारातून वचन गायन करण्याची एक समृद्ध परंपरा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये शास्त्रीय संगीतावर आधारित वचन गायनाचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. कोल्हापूर येथील जयपुर अत्रौलि घराण्याचे जेष्ठ गायक पं. विनोद डिग्रजकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर कलाकारांचा सत्कार देखील पं. डिग्रजकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमास दासोह (अर्थसहाय्य) करणारे बसव केंद्र, कोल्हापूरचे विश्वस्त श्री. राजशेखर तंबाके यांचा विशेष सन्मान पं. डिग्रजकर यांच्या हस्ते करण्यात आला.
विदुषी सौ. सुजाता गुरव यांनी मैफिलीची सुरुवात सायंकालीन राग 'मधुवंती' गायनाने केली. विलंबित एकतालामध्ये निबद्ध 'सावन की ऋत आये' बंदिशीनंतर त्रितालामधील 'गोविंद गुण गावो' हा छोटा ख्याल आणि द्रुत एकतालामधील तराना गायला. शुद्ध, नाजूक व दीर्घ आकार, मिंड व सूक्ष्म श्रुतींच्या वापरातून रागाचे भावपूर्ण सादरीकरण आणि चमत्कृतीपूर्ण आलाप व ताना या माध्यमातून किराणा घराण्याची गायनशैली रसिकांना अनुभवता आली. आरंभीच्या शास्त्रीय गायनानंतर महात्मा बसवण्णा यांच्या कन्नड व मराठी अनुवादित वचनांचे गायन केले. 'नुडीदरे मुत्तीन हार...', 'शेट्टी येंबेने...' ही दोन कन्नड वचने तर 'जिकडे पहावे तिकडे तूचि देवा...' आणि 'तव नामाचे अमृत...' ही दोन मराठी अनुवादित वचने गायली. त्यानंतर बसवोत्तर काळातील वचनकार येडीयूर सिद्धलिंग शिवयोगी यांचे 'आचार लिंगक्के गुरू लिंगवे प्राण' हे कन्नड वचन गायले. खास रसिकांच्या आग्रहास्तव 'अक्का केळव्वा...' हे अक्कमहादेवी यांचे कन्नड वचन गायले. या गाण्यातील लोकसंगीताच्या धाटणीचा ठेका आणि शास्त्रीय स्वरांचा साज यामुळे मैफिलीमध्ये रंगत आली. या वचन गायनासोबतच 'पांडुरंग नामी लागलासे ध्यास' हे मराठी भजन आणि 'युवतीमना दारूण रण...' हे नाट्यगीत गायले. अखेरीस राग भैरवी मधील 'जणितक्के तायागी हेत्तळू माये' या कन्नड बसव वचन गायनाने मैफिलीची सांगता झाली. शास्त्रीय, उपशास्त्रीय, वचन, भजन आणि नाट्यगीत यांच्या सुरेल सादरीकरणामुळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. यश आंबोळे यांनी कन्नड व मराठी वचनांचा सुबोध भावार्थ सांगत निवेदन केले. महेश देसाई यांची तबला साथ आणि स्वरूप दिवाण यांच्या संवादिनी साथ केली.संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी स्वप्निल सरवदे यांनी टाळ साथ तर चिन्मय कुलकर्णी आणि केतकी परांजपे यांनी तानपुरा साथ दिली.
यावेळी डॉ. भारती पाटील, डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. शिवानंद स्वामीजी, अधिसभा सदस्य ॲड. अभिषेक मिठारी, सीमा पाटील, ॲड. शिवकुमार दड्ड, सरला पाटील, जीवन बोडके, सुभाष महाजन, सुरेश जांबुरे, एस. आर. हिरेमठ, बाबुराव तारळी, डॉ. दिलीप माळी, सुजाता शेटे, श्रद्धा पद्माई, महेश महाजन, नंदकुमार डोईजड, डॉ. बी. आर. कोरे, डॉ. अप्पासो वाली, जालंदर गुरव, प्रा. उमाकांत आवटे, धोंडीराम भोगावकर, चंद्रशेखर बटकडली, बापू चौगुले, गायत्री पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीत व नाट्यशास्त्र आधीविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकुर-देसाई, सुरेखा आडके, ॲड. अंकिता त्रिभुवने, विलास आंबोळे, विजय पाटील, संध्या व्हनगुत्ते, महानंदा पाटील, शुभांगी चितारी, उमा आंबोळे, निकिता जोकारे आदींचे सहकार्य लाभले.
.jpeg)


No comments:
Post a Comment