| शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष सत्कार कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार-संपादक वासुदेव कुलकर्णी. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, भाग्यश्री कासोटे-पाटील, कृष्णात दिवटे आणि डॉ. आलोक जत्राटकर |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष सत्कार कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार-संपादक वासुदेव कुलकर्णी. |
| शिवाजी विद्यापीठात प्रकाशन क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल भाग्यश्री कासोटे-पाटील यांचा सत्कार करताना वासुदेव कुलकर्णी. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आलोक जत्राटकर, कृष्णा दिवटे |
कोल्हापूर, दि. ८ एप्रिल: जीवनात वाचनासारखा अन्य मोठा आनंद नाही. त्यामुळे
विद्यार्थ्यांनी वाचते व्हावे, ग्रंथांना गुरू करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व
संपादक वासुदेव कुलकर्णी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी
अधिविभागात आयोजित व्याख्यान आणि विशेष सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून
ते बोलत होते. यावेळी पुस्तकप्रेमी समूहाचे प्रवर्तक कृष्णा दिवटे प्रमुख उपस्थित होते.
श्री. कुलकर्णी म्हणाले की, आजच्या काळामध्ये माणुसकी शिकविणारे शिक्षण घ्यायला हवे.
त्याची नितांत गरज आहे. त्यासाठी माणसाने सतत शिकत
रहावे. शिकण्याची जिद्द मनात ठेवून विद्यार्थ्यांनी ग्रंथांना
गुरू केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या मातीशी जोडून राहिले
पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगून वाचनसंस्कृती टिकविण्याचे
काम आपणच केले पाहिजे.
या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या 'ब्लकॅ व्हाईट अन् ग्रे' आणि 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकांना अनुक्रमे महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा ईश्वरपूर) आणि मारोतराव नारायणे प्रतिष्ठान, वर्धा या महाराष्ट्रातील नामांकित साहित्य संस्थाचे पुरस्कार प्राप्त झाले. त्याबद्दल त्यांचा श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच, भाग्यश्री प्रकाशनाच्या संचालिका भाग्यश्री कासोटे-पाटील यांचा
प्रकाशन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. आलोक जत्राटकर म्हणाले, आजच्या काळातील प्रश्नांना विद्यार्थ्यांनी
स्वच्छ हेतूने आणि निर्भयतेने भिडले पाहिजे. सभोवतालच्या विविध गोष्टींचे सूक्ष्म आकलन
करून त्याविषयी आपण लिहीते राहिले पाहिजे. सतत वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे.
भाग्यश्री कासोटे-पाटील यांनी आपल्या प्रकाशन वाटचालीमधील अनुभव कथन केले आणि
विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या नव्या वाटा शोधून वाटचाल केली पाहिजे, असे सूचित केले. कृष्णा दिवटे यांनी आपल्या मनोगतामधून
वाचन संस्कृती चळवळीविषयी अनुभवकथन करताना आजच्या काळात वाचनाचे महत्त्व अधोरेखित
केले.
यावेळी मराठी अधिविभागातील एम.ए.भाग एकमधील मृण्मयी पांचाल, विमल मोरे, संशोधक विद्यार्थिनी गौरी कुंभार यांचा विशेष
प्राविण्याबद्दल सत्कार करण्यात आला.
अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्योती वराळे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुखदेव एकल
यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी,
संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment