Thursday, 15 September 2022

राष्ट्र सशक्त आणि समर्थपणे उभे राहण्यामध्ये जनजाति समाजाचे मोठे योगदान - सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना केंगले-साबळे

 

कोल्हापूर, दि.15 सप्टेंबर -राष्ट्र सशक्त आणि समर्थपणे उभे राहण्यामध्ये जनजाति समाजाचे मोठे योगदान आहे.या समाजातील अनेक शुरवीर महापुरूषांनी देशासाठी प्राणांची आहुती दिलेली आहे.जनजाति समाज स्वातंत्र्य युध्दामध्ये सर्व शक्तीनिशी लढला होता, हा इतिहास आहे, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना केंगले-साबळे यांनी केले.

राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग, भारत सरकार आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने 'आजादी का अमृतमहोत्सव' कार्यक्रमाच्या अंतर्गत 'स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनुसूचित जमातीच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान' या विषयावर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित कार्यशाळेमध्ये त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते.

श्रीमती केंगले-साबळे बोलताना पुढे म्हणाल्या, अनादी काळापासून जनजातिचा समाज हा डोंगराळ भागात, दऱ्या खोऱ्यांमध्ये आणि घनदाट जंगलांमध्ये वास्तव्य करित आलेला आहे.आजही त्यांची म्हणावी तितकी प्रगती झालेली नाही.या समाजाचे आपल्या देशावर अतिव प्रेम आहे आणि देशाशी एकनिष्ठ आहे.स्वातंत्र्य लढयामध्ये प्रसंगी स्त्रियांनीही हातामध्ये शस्त्रे घेवून शुत्रूंवर आक्रमण केले होते.राणी तारामती, राणी दुर्गामाता त्याचबरोबर राणी लक्ष्मीबाई यांच्या सेनापती झलकारीबाई यांनी जिवावर उदार होवून लढा दिला होता.शिवाजी महाराज डोंगर दऱ्यांमध्ये गनीमिकाव्याने युध्द करीत असताना या समाजाची महाराजांना साथ लाभत होती.जनजाति समाज मुख्यत्वेकरून डोंगराळ प्रदेशांमध्ये राहत असल्याचे आढळते. त्यांच्या संस्कृती निसर्गाशी निगडित असतात.आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणार हा समाज आहे.एकेकाळी हा समाज अत्यंत प्रगत आर्थिकदृष्टया सक्षम होता.परंतु, भारतामध्ये इंग्रजांचे राज्य आल्यानंतर या समाजाचे इंग्रजांनी फार मोठया प्रमाणामध्ये शोषण केल्यामुळे आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती मोठया प्रमाणात ढासळली.  आदिवासी समाजाबद्दल द्वेष निर्माण होण्यासाठी इंग्रज त्यांना दरोडेखोर संबोधत होते.हे फार अन्यायकारक होते.बिरसा मुंडा आणि त्यांच्या क्रांतीकारक सहकाऱ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढयामध्ये दिलेले योगदान फार मोठे आहे.

            राष्ट्रीय संयोजक दिलीप पवार राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाची ओळख करून देताना म्हणाले,आदिवासी पाडयातील लोकांनी जंगलांचे संरक्षण केल्यामुळे आज विविध प्रकारच्या वनौषधी वनसंपदा मोठया प्रमाणात आबादीत राहण्यास मदत झालेली आहे.या समाजाच्या प्रगतीसाठी केंद्र राज्य सरकारे विविध योजना राबवत आहेत.आयोगाकडून या समाजास शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.डोंगराळ भागांमध्ये आज शिक्षणाची गंगा प्रवाहीत झालेली आहे.या समाजातील विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर झालेले आहेत.देशातील विविध राज्यांमध्ये विविध देशांमध्ये हा समाज पसरलेला आहे.

शामलाल कॉलेज, दिल्ली विद्यापीठ येथील प्रा.विवेकानंद नर्तम आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनुसूचित जमातीच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे योगदान समजून घेणे आवश्यक आहे.जनजाति समाज आणि जनजाति नायकांचे देशासाठी फार मोठे योगदान आहे.आपण सर्वजण एकाच परिवाराचे सदस्य आहोत.आपल्यामध्ये भेदाभेद असता कामा नये.परकीय आक्रमण होत असताना युध्दाच्या सुरूवातीस लढा देण्यासाठी पहिली फळी ही जनजाती नायकांची होती.गोंड राजा अतिशय पराक्रमी आणि प्रभावशाली राजा होता.हा समाज पराक्रमी आणि स्वाभामीनी आहे.

कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना म्हणाले, ज्या भागामध्ये अनुसूचित जनजातिचे विद्यार्थी आहेत त्या भागांमध्ये पोहचून त्यांना अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यास उद्रुक्त केले पाहिजे.सिमा भागातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत दिलेली आहे. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये भाग घेतलेला आहे.विविध वनौषधीच्या संवर्धनाची या समाजाकडे असलेल्या ज्ञानाची माहिती संकलीत करणे आवश्यक आहे. भारत सरकारने पारंपारिक ज्ञान प्रणालीचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये समावेश केलेला आहे.या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

याप्रसंगी जनजाति क्रांतीकारकांचा इतिहास दर्शविणारी चित्रफित दाखविण्यात आली.कार्यशाळेची सुरूवात भारत माता आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, दिपप्रज्वलन  करून झाली.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले.शैक्षणिक संयोजक डॉ.एस.पी.हंगिरगेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, प्रशासनिक संयोजकडॉ.प्रमोद पांडव, उपकुलसचिव विलास सोयम, डॉ.अवनिश पाटील, डॉ.अविनाश भाले यांचेसह विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी, ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.

-----

 


No comments:

Post a Comment