मुंबई विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडून कार्यभाराची सूत्रे स्वीकारताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. |
मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर फोर्ट संकुलातील दालनात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. |
मुंबई, दि. १० सप्टेंबर: कोल्हापूर येथील शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज (दि. १० सप्टेंबर २०२२) मुंबई
विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला. मावळते कुलगुरू डॉ.
सुहास पेडणेकर यांच्याकडून डॉ. दिगंबर शिर्के यांना कुलगुरूपदाची सूत्रे
स्वीकारली.
मुंबई
विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात
आलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी,
मुंबई विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य विद्यापीठ असून या विद्यापीठाची धुरा आपल्या
खांद्यावर सोपविल्याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी
यांचे आभार मानले. ते म्हणाले, मुंबई विद्यापीठाने ज्ञानदानाचा ऐतिहासिक वारसा आणि
समृद्ध परंपरा अविरतपणे जोपासली आहे. ही प्रक्रिया निरंतर ठेवण्यासाठी सर्वांचे
सहकार्य अपेक्षित असून त्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. नवीन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे, विविध प्राधिकरणांच्या निवडणुका, परीक्षा पद्धती आणि
कोविड-१९मुळे प्रभावित झालेले एकेडमिक कॅलेंडर पूर्वपदावर आणणे ही प्राथमिकता
असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी
मावळते प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव डॉ. शैलेंद्र देवळाणकर, वाणिज्य व
व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. अजय भामरे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजेश खरात, विज्ञान
व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा मजुमदार, वित्त व लेखा अधिकारी प्रा. (सीए.) प्रदीप कामथेकर यांच्यासह विविध
महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक, विभागप्रमुख,
शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment