शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय पथसंचलन निवड शिबिराचे उद्घाटन
शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवड शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलताना भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवड शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलताना भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवड शिबिराच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. |
कोल्हापूर, दि. २८ सप्टेंबर: राष्ट्रीय सेवा योजनेचा सुसंस्कार आयुष्यभर जपण्यावर स्वयंसेवकांनी भर द्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात आज सकाळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीनदिवसीय राष्ट्रीय/ राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी
शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या
समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय
कार्यालय, पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण
विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई आणि राष्ट्रीय येवा योजना, शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय शिबिराच्या
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते, तर प्रभारी
कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय येवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ.
प्रशांतकुमार वनंजे प्रमुख उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता
जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रम झाला.
श्री. कार्तिकेयन म्हणाले, राज्यभरातील
विद्यापीठांमध्ये सध्या ३ लाख ५४ हजार राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आहेत. त्यामधून
मोजक्या ३८० स्वयंसेवकांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनाच्या
निवड शिबिरात सहभागाची संधी मिळालेली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी सर्वच सहभागी
स्वयंसेवकांनी शर्थीचे प्रयत्न करावेत. येथून आणंद येथील पश्चिम विभागीय
शिबिरासाठी आणि तेथून राष्ट्रीय संचलनासाठी निवड केली जाईल. आपल्यातील काही जणांना
ती संधी मिळणार असली तरी शिबिरार्थींनी आपल्या भावी जीवनातही राष्ट्रीय सेवा
योजनेचे संस्कार जपण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शिबिराच्या
नेटक्या आयोजनासाठी शिवाजी विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल विद्यापीठाचे आणि
राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.
डॉ. प्रशांतकुमार वनंजे |
राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे म्हणाले,
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या
निर्देशानुसार राज्यातील राष्ट्रीय येवा योजनेच्या स्वयंसेवकांची संख्या साडेतीन
लाखांवरुन पाच लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्या दृष्टीने प्रत्येक
महाविद्यालयात एनएसएसचे युनिट सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले,
राष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव अंगी बाणवल्यामुळेच जल व हरित संवर्धनाच्या
कामी सातत्यपूर्ण योगदान देऊ शकलो. त्यामुळे उपस्थित स्वयंसेवकांनीही प्रत्येक
उपक्रमात कृतीशीपणे सहभागी व्हावे आणि उत्तम प्रदर्शन करावे. एनएसएसचे संस्कार
कधीही विसरू नका, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचा येथे आलेला प्रत्येक स्वयंसेवक हा आपापल्या
विद्यापीठाचा सदिच्छादूत आहे. त्यांनी हे सदिच्छेचे व मानवतेचे मूल्य आपल्यासोबत
सदैव बाळगले पाहिजे. कोविड-१९च्या कालखंडात शिवाजी विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना
समुपदेशनासह विविध प्रकारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदतीमधून प्रभावी भूमिका बजावली
आहे. महापूर काळातही नागरिकांच्या बचावकार्यासह मदत व पुनर्वसन कामी स्थानिक जिल्हा
प्रशासनास एनएसएस स्वयंसेवकांनी तत्परतेने सहकार्य केले. ही सामाजिक बांधिलकी
आयुष्यभर जपावी. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पथसंचलनात महाराष्ट्राचा टक्का वाढावा,
यासाठी संचलनासाठी विद्यापीठांच्या स्तरावर सातत्याने शिबिरांचे आयोजन करण्याची
आवश्यकता आहे. शिवाजी विद्यापीठ स्वयंसेवकांच्या सरावासाठी आपले सिंथेटिक ट्रॅकही
उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मंचावर क्षेत्रीय कार्यालयाचे युवा अधिकारी
अजय शिंदे, उन्नत भारत अभियानाचे संचालक डॉ. टी.आर. पाटील, विद्यापीठाचे क्रीडा
संचालक डॉ. शरद बनसोडे, महाराष्ट्र शासनाचे मंगेश खैरनार, रमेश देवकर, श्री.
कारखानीस, कॅप्टन प्रशांत पाटील, कॅप्टन राहुल मगदूम उपस्थित होते. कार्यक्रमाचे
स्वागत व प्रास्ताविक विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये यांनी
केले. संदीप पाटील व डॉ. स्नेहल राजहंस यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. उमाजी
पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास राज्यभरातील २९ विद्यापीठांचे २८० एनएसएस
स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी व संघ व्यवस्थापक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment