Thursday, 29 December 2022

आशियाई देशांतील प्रश्नांकडे मानवतावादी भूमिकेतून पाहणे आवश्यक: जतीन देसाई

 


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई. मंचावर (डावीकडून) डॉ. सुखदेव उंदरे, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. प्रकाश पवार.


कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: आशियाई उपखंडातील विविध देशांमधील परस्परसंबंध तणावग्रस्त झाले आहेत. या देशांतील प्रश्नांकडे भारतासह जगाने मानवतावादी भूमिकेतून पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक व आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक जतीन देसाई यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागात या वर्षी नव्याने सुरु करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संबंध व सुरक्षा या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांतर्गत आशिया खंडातील आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयावर श्री. देसाई यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार प्रमुख उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, रशिया युक्रेन युद्धामुळे आशिया प्रत्यक्षपणे प्रभावित झाला आहे. आशियाई देशांच्या राजकीय तसेच आर्थिक सहसंबंधांवर याचा स्वाभाविक परिणाम दिसून येतो आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान, इराण, म्यानमार या देशांमध्येही अस्वस्थ वातावरण आहे. त्याचाही परिणाम या समस्त विभागावर होतो आहे. आशियातील आंतरराष्ट्रीय संबंध संतुलित राखण्यामध्ये भारताने नेहमीच प्रभावी भूमिका बजावली आहे. यापुढील काळातही या समस्यांकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

श्री. देसाई यांनी आपल्या मांडणीमध्ये आशिया खंडातील आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत विस्तृत चर्चा केली तसेच आशिया, दक्षिण आशिया, दक्षिण-पूर्व आशियामधील अनेक देशांच्या परस्परसंबंधांवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी भारताचे विविध देशांशी असलेले सामाजिक, राजकीय, व्यापारी, संघर्षपूर्ण तथा मैत्रीपूर्ण संबंध याविषयीही विस्तृत मांडणी केली. याशिवाय, जागतिक महासत्तांच्या अनुषंगाने अमेरिका, रशिया, चीन या देशांच्या भूमिकांवरही प्रकाशझोत टाकला.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, जागतिक स्तरावर घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या घटनेचा सूक्ष्मपणे अभ्यास केला तर त्याचा संबंध प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अर्थकारणाशी असल्याचे दिसते. चीनचे अफगाणिस्तानवरील प्रेम हे प्रामुख्याने अफगाणिस्तानात असलेल्या व संपुष्टात येत चाललेल्या लिथियमसारख्या दुर्मिळ खनिज संपत्तीमुळे आहे. त्यामुळे व्यापार, अर्थकारण याच्यातून सारे जग कळसूत्री बाहुलीसारखे चालविले जाते की काय, याचा राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे.

यावेळी डॉ. सुखदेव उंदरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. जयश्री कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. नेहा वाडेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment