Thursday 29 December 2022

छत्रपतींचा आदर्श घेऊन माती, माणसं वाचा; संस्कृती जाणून घ्या: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा मोहिमेस प्रारंभ

पन्हाळा येथे वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.

पन्हाळा येथे वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यासमोर फ्लॅग-ऑफ करून शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेस प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

पन्हाळा येथे शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेमध्ये सहभागी झालेले कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत प्राचार्य एस.आर. पाटील, डॉ. महादेश देशमुख, डॉ. पी.टी. गायकवाड, अभय जायभाये आदी.

पन्हाळा येथे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

पन्हाळा येथे शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेमध्ये सहभागी झालेले कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि मान्यवर.

पन्हाळा येथे शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेमध्ये सहभागी झालेले कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि मान्यवर.


कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: जी माती आणि माणसं वाचून छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतिहास घडविला, तो आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनीही आपली संस्कृती जाणून घ्यावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल पन्हाळा येथे केले.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चिखली (ता. शिराळा, जि. सांगली) यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा मोहीमेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिव पावन प्रेरणा मोहीम ही विद्यार्थ्यांत नवी ऊर्जा निर्माण होण्यासाठी आयोजित केलेली आहे. महाराष्ट्राचा देदिप्यमान इतिहास असणारी पावनखिंड विद्यार्थ्यांसाठी नित्य प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात-पात धर्म न मानता सर्व घटकांना आपलेसे केले. गोरगरीब जनतेचा विश्वास संपादन केला. या विश्वासाला तडा जाणार नाही, असे आचरण राखले. इतरांना त्याची शिकवण दिली. यामधूनच महाराष्ट्राची उभारणी झाली. विद्यार्थ्यांनी पन्हाळा ते विशाळगड पायी वाटचाल करीत असताना पावनखिंड पाहावी. येथील माती, माणसं वाचावीत. आपली संस्कृती जाणून घ्यावी, असे आवाहन केले.

प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांनी या मार्गावरील विविध वाड्या-वस्त्यांवरील सामाजिक जीवनाची बाजू जाणून घ्यावी, असे आवाहन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी इतिहासातील व्यक्तींमधील पर्यावरणविषयक जाणिवांविषयी विवेचन केले. यावेळी देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पन्हाळा येथील संजीवन नॉलेज सिटीचे चेअरमन पी. आर. भोसले यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव एन.आर. भोसले,  विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी.टी. गायकवाड, प्राचार्य डॉ. जैन, उपप्राचार्य सपाटे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये यांनी आभार मानले.

पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा मोहीम शिवाजी विद्यापीठामार्फत गेल्या पाच वर्षापासून आयोजित करण्यात येते. यंदाच्या मोहिमेत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे १५० स्वयंसेवक आणि शिक्षक व कर्मचारी सहभागी आहेत. मोहिमेचे संयोजन डॉ. पी. आर. माळी, संग्राम मोरे, आर. आर. पाटील, विजय नागाळकर, आनंदा घोडे, सुरेखा आडके आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी केले.

दरम्य़ान, आज सकाळी मोहिमे पन्हाळा येथील शिवा काशिद यांच्या पुतळ्यास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार वाहून सुरुवात करण्यात आली. यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यासही हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळीही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सहभागींना शुभेच्छा दिल्या आणि कुलगुरूंसह सर्वच मान्यवर मसाई पठारापर्यंत मोहिमेत सहभागी झाले.

No comments:

Post a Comment