Saturday, 31 December 2022

पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंतीमधून नवचैतन्याची अनुभूती: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 

शिव पावन प्रेरणा मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे व प्रतिमेचे पूजन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के



पावनखिंड येथे शिव पावन प्रेरणा मोहीम पोहोचली, त्याप्रसंगी अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत अधिकारी व सहभागी.

शिवाजी विद्यापीठातर्फे शिव पावन प्रेरणा मोहिमेच्या वाटेवरील वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.



कोल्हापूर, दि. ३१ डिसेंबर
: पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा मोहीम पदभ्रमंतीमधून विद्यार्थ्यांच्या मना नवचैतन्य जागृत होते, तसेच संकटाशी झुंजण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल (दि. ३०) पावनखिंड येथे केले.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पन्हाळा पावनखिंड शिव पावन प्रेरणा मोहीमेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ही मोहीम यापुढील काळातही आयोजित करण्यात येईल. या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी, स्वयंसेवकांपर्यंत शिवकालीन इतिहास पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील हे काल पांढरेपाणीपासून मोहिमेत सहभागी झाले आणि त्यांनी पावनखिंडीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसमवेत वाटचाल केली. पालखी पावनखिंडीस पोहोचल्यानंतर बाजीप्रभूंच्या स्मारकास मान्यवरांनी अभिवादन केले. यानंतर सचिन सूर्यवंशी आणि कोल्हापूरच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांनी शिवकालीन युद्धकलांचे प्रात्यक्षिक दाखवले. वैष्णवी माने हिने खड्या आवाजात शिवगर्जना केली.

मोहिमेकरपेवाडी येथील मुक्कामी शिवशाहीर श्रीरंगराव पांडुरंग पाटील आणि सहकाऱ्यांनी ऐतिहासिक पोवाडा सादरीकरण केले. काल, दुसऱ्या दिवशी सकाळी कळकेवाडी-रिंगेवाडी-माळवाडी येथून पांढरे पाणी येथे मोहीम आली. या गावांमधील छोट्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये आणि प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पांढरे पाणी येथून दुपारी लेझीम, ढोल, ताशा, धनगरी वाद्य यांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. याप्रसंगी कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह अधिष्टाता डॉ. महादेव देशमुख, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड आदी मान्यवर पायी चालत पालखी सोहळ्या सहभागी झाले. वाटेवरील गावातील महिलांनी पालखीचे दर्शन घेतले, तसेच मान्यवरांचे औक्षणही केले.

दरम्यान, सकाळच्या सत्रात राज्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशातकुमार वनांजे यांनी शिबिरास भेट दिली. यावेळी त्यांनी हा उपक्रम शिवाजी विद्यापीठापुरता मर्यादित न ठेवता राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत त्याची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन केले. यासाठी राज्य शासनही सर्वोतोपरी मदत करील, असेही त्यांनी सांगितले.

या मोहिमेत कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसह कर्मचारी, पत्रकार सहभागी झाले. या सर्वांचे अभय जायभाये यांनी आभार मानले. संग्राम मोरे, आनंदा घोडे विजय नागाकर यांच्यासह सांगली जिल्हा समन्वयक डॉ. पोपटराव माळी यांनी उपक्रमाचे यशस्वी संयोजन केले.

No comments:

Post a Comment