Wednesday, 7 December 2022

विद्यापीठात ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेस उत्साही प्रारंभ

 

शिवाजी विद्यापीठस्तरीय 'आविष्कार २०२२-२३' संशोधन स्पर्धेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी, शिक्षक आदी.

शिवाजी विद्यापीठस्तरीय 'आविष्कार २०२२-२३' संशोधन स्पर्धेत सहभागी संशोधक आपल्या संशोधनासमवेत.

शिवाजी विद्यापीठस्तरीय 'आविष्कार २०२२-२३' संशोधन स्पर्धेत सहभागी स्पर्धक आपल्या संशोधनाविषयी उपस्थितांना माहिती देताना.


शिवाजी विद्यापीठस्तरीय 'आविष्कार २०२२-२३' संशोधन स्पर्धेत सहभागी स्पर्धक आपल्या संशोधनाविषयी उपस्थितांना माहिती देताना.

शिवाजी विद्यापीठस्तरीय 'आविष्कार २०२२-२३' संशोधन स्पर्धेत सहभागी स्पर्धक आपल्या संशोधनाविषयी उपस्थितांना माहिती देताना.


कोल्हापूर, दि. ७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठस्तरीय आविष्कार २०२२-२३ या दोन दिवसीय संशोधन स्पर्धेस आज सकाळी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात उत्साहात प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

गत वर्षी कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर आविष्कार संशोधन स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर यंदा पुन्हा ऑफलाईन स्वरुपात स्पर्धा होत असल्याने सहभागी संशोधकांचा उत्साह ओसंडून वाहात होता. आपल्या कल्पक संशोधनाची पोस्टर, लेख, पॉवरपॉईंट सादरीकरण तसेच मॉडेल स्वरुपात मांडणी करून त्याविषयी उपस्थितांना अवगत करण्यासाठीची उत्सुकता त्यांच्यामध्ये होती, त्याचप्रमाणे स्पर्धेचे काहीसे दडपणही जाणवत होते. कुलगुरू व प्र-कुलगुरूंसह उपस्थित मान्यवरांनी सर्व सहभागी संशोधकांच्या उपक्रमांची पाहणी केली. त्यांच्या संशोधनाविषयी जाणून घेतले. विविध वैज्ञानिक, वैद्यकीय समस्यांपासून ते अगदी सामाजिक समस्यांपर्यंतचा वेध घेऊन त्यावर आपापल्या परीने तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न संशोधकांनी केल्याचे दिसते, असे मत कुलगुरूंनी या प्रसंगी व्यक्त केले. मूलभूत संशोधनाच्या जोडीला आता एप्लीकेशन-बेस्ड संशोधनाची जाणीवही संशोधकांना होऊ लागल्याची बाब समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेमध्ये १. मानव्यविद्या, भाषा व ललितकला २. वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा ३. मूलभूत विज्ञान ४. कृषी व पशुपालन ५. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि ६. वैद्यकीय व औषधनिर्माण या विविध शाखांतर्गत एकूण ७० संशोधक सहभागी झाले असून पदवी व पदव्युत्तर गटातून ३६ आणि शिक्षक गटातून ३४ संशोधक सहभागी झाले आहेत.

दरम्यान, उद्घाटन प्रसंगी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस.एन. सपली, स्कूल ऑफ नॅनोसायन्स व तंत्रज्ञानचे प्रमुख तथा स्पर्धा समन्वयक डॉ. किरणकुमार शर्मा, अर्थशास्त्राचे डॉ. पी.एस. कांबळे यांच्यासह शिक्षक, संशोधक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment