हनोई (व्हिएतनाम) येथील आंतरराष्ट्रीय प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या समारोप सत्रात प्रमाणपत्रासह शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. मेघा पानसरे यांच्यासह अन्य रशियन भाषा अध्यापक. |
कोल्हापूर, दि. १४
डिसेंबर: हनोई (व्हिएतनाम) येथे
आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रगत प्रशिक्षण परिषदेमध्ये शिवाजी
विद्यापीठाच्या रशियन भाषा शिक्षकांनी सहभाग घेतला आणि विविध देशांतील
भाषातज्ज्ञांशी शैक्षणिक व सांस्कृतिक सद्यस्थितीबाबत वैचारिक आदानप्रदान केले.
‘द रशियन फेडरल एजन्सी फॉर ह्युमॅनिटेरियन को-ऑपरेशन’ या रशियन संस्थेच्या पुढाकाराने आशियाई देशांमधील विविध विद्यापीठांत रशियन भाषा अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी एका प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “भाषिक वातावरणाच्या अभावात परदेशी भाषा म्हणून रशियन भाषा अध्यापन पद्धती” विकसित करण्याच्या दृष्टीने ४ ते ७ डिसेंबर २०२२ या कालावधीत हनोई (व्हिएतनाम) येथील ‘रशियन हाऊस’मध्ये हा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण अभ्यासक्रम घेण्यात आला. यात सहभाग घेण्यासाठी हनोई येथील ‘सेंटर फॉर द सपोर्ट ऑफ सोशल, कल्चरल अँड एज्युकेशनल प्रोजेक्ट्स’च्या वतीने शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा केंद्राच्या रशियन भाषा अध्यापकांना अधिकृतरित्या आमंत्रित करण्यात आले होते. विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. मेघा पानसरे, सहयोगी अध्यापक शीतल कुलकर्णी, प्रियांका माळकर व अभिषेक जोशी यांनी या प्रशिक्षण अभ्यासक्रमात सहभाग घेतला. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केले. या दौऱ्यात रशियासह विविध आशियाई देशांतील रशियन भाषातज्ज्ञांनी आपापल्या देशांतील सांस्कृतिक व शैक्षणिक सद्य परिस्थिती व अध्यापन अनुभव यावर सर्वच सहभागींचे परस्परांशी वैचारिक आदानप्रदान झाले. त्यातून एक आंतरराष्ट्रीय संवाद घडला. विदेशी भाषा विभागाच्या वतीने ‘रशियन हाऊस, हनोई’च्या ग्रंथालयास ‘सोविएत रशियन कथा’ व ‘शिवाजी कोण होता?’ ही पुस्तके भेट देण्यात आली. या उपक्रमात भारत, श्रीलंका, म्यानमार, लाओस, कंबोडिया, बांगलादेश, थायलंड आणि व्हिएतनाम इत्यादी आशियाई देशांतील रशियन भाषा अध्यापक सहभागी झाले.
No comments:
Post a Comment