विद्यापीठासाठी
अभिमानास्पद निवड:
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
कोल्हापूर, दि. १७ डिसेंबर:
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक प्रिया पाटील हिची महाराष्ट्र
राज्याच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) सदिच्छादूत पदावर नियुक्ती होणे, ही
बाब विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानास्पद स्वरुपाची आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांनी आज येथे काढले.
विद्यापीठाशी संलग्नित विवेकानंद महाविद्यालयात प्राणीशास्त्र विषयाची
विद्यार्थिनी व एनएसएस स्वयंसेवक प्रिया पाटील हिची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य
एनएसएसच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय काल, दि. १६
डिसेंबर २०२२ रोजी निर्गमित झाला. त्यानंतर आज प्रिया पाटील हिने कुलगुरू डॉ.
शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोविडच्या कालखंडात प्रिया हिने कोविडग्रस्त नागरिकांच्या
मृतदेहांचे शववाहिकेतून वहन आणि अंत्यसंस्कार करून ज्या पद्धतीने सामाजिक सेवेचे
व्रत निभावले, ते आसाधारण स्वरुपाचे आहे. आईवडिलांचे समर्थ पाठबळ आणि राष्ट्रीय
सेवा योजनेचे संस्कार या बळावरच ती हे काम करू शकली. एनएसएसच्या स्वयंसेवकांसाठी
तिचे कार्य प्रेरणादायी आहे. आता राज्याची सदिच्छादूत बनल्यानंतर तिच्या माध्यमातून
या सेवाभावाचा प्रसार युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात होईल. त्याचप्रमाणे शिवाजी
विद्यापीठाचा लौकिकही वृद्धिंगत होईल.
या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन
प्रिया पाटीलचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे
यांच्यासह विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, विवेकानंद
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार, कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील, डॉ.
एच.पी. पाटील आणि डॉ. आर.जी. कोरबू उपस्थित होते.
दरम्यान, दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या उच्च व तंत्र
शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार,
श्रीमती प्रिया पाटील यांची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विना-मानधन तत्त्वावर
एनएसएस सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिने केलेले कार्य युवकांना
प्रेरणादायी ठरण्यासाठी ही नियुक्ती आहे.
याअंतर्गत प्रिया पाटील हिची व्याख्याने आयोजित करणे, विद्यार्थी व युवकांशी
संवादाचे कार्यक्रम आयोजित करणे आणि त्या कार्यक्रमामध्ये शासनाच्या विविध योजना
तसेच राष्ट्रीय सेवा योजनेने हाती घेतलेले उपक्रम व उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी
प्रिया पाटील सहकार्य करतील. आयोजक विद्यापीठ/ संचालनालय यांनी अधिनस्थ महाविद्यालयांतील
विद्यार्थ्यांशी संवादाची, प्रचार व प्रसाराची आणि प्रत्यक्ष सामाजिक सुधार उपक्रम
आयोजित करण्याची जबाबदारी कार्यक्रम समन्वयक तथा संचालक, एनएसएस यांची असेल.
कार्यक्रमाचे नियोजन व आखणी करण्याची जबाबदारी कार्यक्रम समन्वयक तथा संचालक,
एनएसएस यांची राहील. राज्य संपर्क अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी, एनएसएस, उच्च
व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय कक्ष हे नियंत्रक म्हणून काम पाहतील, असेही यात म्हटले
आहे.
No comments:
Post a Comment