Monday, 19 December 2022

फुले-आंबेडकरी विचारांतच समग्र समानतेची बीजे: डॉ. वंदना महाजन

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. दीपा श्रावस्ती यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. वंदना महाजन, डॉ. विलास शिंदे आणि डॉ. श्रावस्ती.

शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात बोलताना डॉ. वंदना महाजन. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. दीपा श्रावस्ती.


डॉ. दीपा श्रावस्ती यांच्या आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर, दि. १९ डिसेंबर: फुले-आंबेडकरी विचारांतच स्त्री-पुरूषादी समग्र समानतेची बीजे रुजलेली आहेत, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मराठी अधिविभाग प्रमुख तथा साहित्यिक डॉ. वंदना महाजन यांनी आज सायंकाळी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आज डॉ. दीपा श्रावस्ती लिखित आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया (विमेन इन डॉ. आंबेडकर्स मूव्हमेंट) या संशोधन ग्रंथाचा प्रकाशन समारंभ राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

Vandana Mahajan
डॉ. वंदना महाजन यांनी आपल्या भाषणात अगदी वेदकाळापासून स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा आणि योगदानाचा वेध घेतला. त्या म्हणाल्या, एकीकडे स्त्रीचे देवतेपासून ते आईपर्यंतचे स्वरुप समाज दाखवित होता, त्याचवेळी दुसरीकडे व्यवस्थेच्या विरोधातील स्त्रियांचे मात्र नकारात्मक चित्रण करीत होता. त्यामुळे महिलांचे सामाजिक स्थान हे सातत्याने पुरूषी आक्रमकपणापुढे आकुंचित झाले. समग्रापासून स्त्रियांचा धागा तुटला. हा खंडित झालेला धागा फुले-आंबेडकरी चळवळीने पुन्हा जोडण्याचे काम केले. धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांची सखोल चिकित्सा करून घटनेच्या माध्यमातून स्त्रियांना समग्र समानता प्रदान केली.

डॉ. महाजन पुढे म्हणाल्या, वासाहतिक कालखंडात सामाजिक-धार्मिक पुनरुत्थानाच्या चळवळी उदयास आल्या पण महात्मा फुले वगळता अन्य चळवळींची झेप ब्राह्मण स्त्रियांच्या उद्धारापलिकडे गेल्याचे दिसले नाही. आगरकरांचा काही अंशी अपवाद इथे होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही चळवळ अधिक जोमाने पुढे घेऊन जातात. त्याचप्रमाणे फुले यांचा स्त्रीशिक्षणाचा मुद्दाही ते तडीस नेतात. भारतीय समाजाच्या श्रेणीबद्ध उतरंडीमध्ये सर्वाधिक वंचितता दलित स्त्रियांच्या वाट्याला आली. वर्गशोषण, जातीशोषण आणि पुरूषसत्ताक शोषण अशा त्रिस्तरीय शोषणाच्या त्या बळी होत्या. लैंगिकतेच्या पातळीवरही स्त्री उपभोगवादाची बळी होती. बाबासाहेब या सर्व स्तरांवर स्त्रीमुक्तीचा हुंकार तीव्र करतात. अपमानातून मानवतावादाकडे स्त्रियांना घेऊन जाताना माणूस म्हणून नाकारलेले हक्क त्यांना प्रदान करतात. नवयानाची मांडणी करताना त्यामधील स्त्रियांचे समानतेचे स्थान अधोरेखित करताना बुद्धाशीही त्यांचे नाते नव्याने जोडतात.

डॉ. दीपा श्रावस्ती यांच्या संशोधनातून बाबासाहेबांच्या चळवळीमधी स्त्रियांचे योगदान प्रकर्षाने सामोरे येतेच, पण त्यातून विविध नवीन संशोधन प्रकल्पांचे सूचनही होते, असे कौतुकही डॉ. महाजन यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा अनेकांगांनी वेध घेत राहण्याची आवश्यकता आहे. हिंदू कोड बिल प्रकरणावरुन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन कोल्हापुरात प्रथमच आल्यानंतर सन १९५२मध्ये येथील विविध जातीधर्मांच्या नऊ महिला मंडळांनी त्यांना विशेष मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. स्त्रीमुक्तीची बीजे या देशात रोवणारा तो क्षण होता. डॉ. श्रावस्ती यांनी एक उत्तम संशोधनग्रंथ साकारला असून येथून पुढे या विषयाच्या अनुषंगाने संशोधनकार्य पुढे चालवावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. दीपा श्रावस्ती यांनी हा संशोधनग्रंथ म्हणजे आपल्या सर्व पूर्वमातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न असून वर्तमानातील महिलांना प्रेरित करण्यासाठी केलेली कृती असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प वाहून अभिवादन केले. कुलगुरू डॉ. शिर्के आणि डॉ. वंदना महाजन यांच्या हस्ते विमेन इन डॉ. आंबेडकर्स मूव्हमेंट या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. केंद्राचे संचालक तथा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. हरिष भालेराव, डॉ. गिरीष मोरे, डॉ. प्रभाकर निसर्गंध, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. योगेश साळी, डॉ. रविंद्र श्रावस्ती, प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. श्यामसुंदर मिरजकर, विलास सोयम आदी उपस्थित होते.

2 comments:

  1. अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एका महत्त्वाच्या पुस्तकाची निर्मिती व प्रकाशन विद्यापीठाने केले आहे. लेखिका डॉ. दीपा श्रावस्ती व संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे अभिनंदन🎉🎊

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. एका महत्त्वाच्या विषयावर संशोधन उपलब्ध झाले आहे. लेखिका डॉ दीपा श्रावस्ती व संचालक डॉ श्रीकृष्ण महाजन यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

    ReplyDelete