शिवाजी विद्यापीठात महर्षी वि.रा. शिंदे यांच्या विशेष पोस्ट कव्हर अनावरण समारंभ प्रसंगी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व पोस्टमास्तर आर.के. जायभाये. सोबत डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, अर्जुन इंगळे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रा. जनार्दन वाघमारे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.
विद्यापीठात विशेष पोस्ट कव्हरचे प्रकाशन
कोल्हापूर,
दि. २ जानेवारी: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
यांनी आपल्या विचारकार्यातून समाजाला वैश्विक दृष्टी दिली, असे गौरवोद्गार नांदेडच्या स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. जनार्दन वाघमारे यांनी आज
येथे काढले.
भारतीय
पोस्ट विभाग आणि शिवाजी विद्यापीठाचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध़्यासन यांच्या
संयुक्त विद्यमने महर्षी शिंदे यांचे विशेष आवरण (कव्हर) आज विद्यापीठात प्रकाशित
करण्यात आले. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या
राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के होते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रमुख उपस्थित होते.
डॉ.
वाघमारे म्हणाले की, महर्षींसारख्या महान व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या कार्याची
समाजाने उपेक्षा केली. त्यांच्या कार्याची आज उजळणी करणे गरजेचे आहे. महर्षींनी सर्व
धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. या अभ्यासातून समाजाला धर्मचिकित्सेची गरज असल्याचे
मत त्यांनी प्रतिपादित केले.
गोवा विभागाचे (पणजी)चे पोस्टमास्तर जनरल आर. के. जायभाये यांनी आपल्या मनोगतामध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या महर्षी शिंदे यांच्या कार्याच्या गौरवार्थ भारतीय टपाल विभाग हे विशेष आवरण प्रकाशित करीत आहे. देशातील अनेक महनीय व्यक्ती, स्थळे, वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यासंदर्भात विशेष संदेश देण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी अशी आवरणे काढली असून जगभरातील संग्राहकांनी त्यांचा संग्रह केला आहे. यावेळी त्यांनी पोस्टाच्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली.
अध्यक्षीय
मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, महर्षी शिंदे यांच्या कार्याचा अभ्यास
होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे अध्यासन कार्यरत आहे. समाज परिवर्तनासाठी महर्षी
शिंदे यांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमंत
छत्रपती शाहू महाराज आणि श्री. जायभाये यांच्या हस्ते महर्षी शिंदे यांचे विशेष
आवरणाचा प्रकाशन समारंभ झाला. यावेळी मंचावर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील, पोस्ट विभागाचे अर्जुन इंगळे उपस्थित होते.
सुरवातीला महर्षी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
अध्यासन समन्वयक डॉ. रणधीर शिंदे स्वागत व प्रास्ताविक यांनी केले. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, साहित्यिक डॉ. राजन गवस, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. प्रकाश पवार, डॉ. अरुण शिंदे, सुरेश शिपुरकर, विविध अधिविभागातील प्राध्यापक, कोल्हापूर पोस्ट विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सुस्मिता खुटाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राजेश पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment