शिवाजी विद्यापीठाचा भारतीय इतिहास संशोधन परिषदेसमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
भारतीय इतिहास संशोधन परिषदेसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना परिषदेचे सदस्य सचिव डॉ. उमेश कदम, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे
कोल्हापूर, दि. २
जानेवारी: भारतीय इतिहास संशोधन
परिषदेसमवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार झाल्यामुळे मराठ्यांचा स्थानिक
इतिहास राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याचा मार्ग खुला झाला आहे,
असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे (आयसीएचआर) सदस्य
सचिव डॉ. उमेश कदम यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाची नववर्षाची सुरवात या अभिनव सामंजस्य कराराच्या
कार्यक्रमाने आज झाली. या सामंजस्य करारावर डॉ. कदम यांच्यासह विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी
केल्या.
शिवाजी विद्यापीठ ही आपली मातृसंस्था असून या संस्थेसमवेत हा महत्त्वपूर्ण
करार करीत असताना अभिमान वाटत असल्याचे सांगून डॉ. कदम म्हणाले, मराठा इतिहास हा
भारताचा मूळ इतिहास आहे. हा इतिहास परकीयांनी आपल्याला सांगितला. तथापि, मोडी,
मराठीसह विविध स्थानिक भाषांमध्ये अद्यापही पुष्कळ इतिहास दडलेला आहे. या
करारांतर्गत या इतिहासाचे संशोधन करण्यात येणार आहे. त्यांचे डिजीटलायझेशन करून तो
सर्वांना उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे आजादी का अमृतमहोत्सवच्या
निमित्ताने येत्या फेब्रुवारीअखेरपर्यंत स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या अनुषंगाने तीन
व्याख्याने आयोजित करण्यात येतील. मराठा इतिहास आणि स्थानिक स्रोत-साधने या
अनुषंगानेही दहा व्याख्याने आयोजित करण्यात येतील. भारत ही लोकशाहीची जननी असे
म्हणत असताना केवळ इतिहासच नव्हे, तर सामाजिक शास्त्रे, विज्ञान व तंत्रज्ञान, भाषा,
अर्थशास्त्र इत्यादी विविध विद्याशाखांशी निगडित संशोधन प्रकल्पही हाती घेण्यात
येतील. काही महत्त्वाच्या मराठी ग्रंथांचा अनुवाद करून त्यांना
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यावयाचे असेल, तर तसे प्रस्ताव सादर करण्याचीही
संधी असेल. या उपक्रमांसाठी प्राथमिक टप्प्यावर १५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात
येईल, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, भारतीय इतिहास संशोधन परिषदेसमवेत होणारा
विद्यापीठाचा हा पहिला सामंजस्य करार आहे. मराठा इतिहास जागतिक स्तरावर नेण्याची
ही खूप महत्त्वाची संधी आहे. त्यासाठी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि मराठा
इतिहास संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून ऐतिहासिक साधने व दस्तावेज संस्थेला उपलब्ध
करून देण्यात येतील.
या कार्यक्रमामध्ये नवी दिल्ली आणि बेंगलोर येथील भारतीय इतिहास संशोधन
परिषदेचे सर्व सदस्य ऑनलाईन सहभागी झाले तर मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता
डॉ. महादेव देशमुख, डॉ. दत्ता मचाले आदी उपस्थित होते. या प्रसंगी इतिहास अधिविभागाचे
प्रमुख डॉ. अवनिश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नीलांबरी जगताप
यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment