अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणाची खरेदी करणार
शिवाजी विद्यापीठाचे सैफ सेंटर येथे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्तुती उपक्रमांतर्गत आलेले शास्त्रज्ञ व सहभागींसमवेत डॉ. राजेंद्र सोनकवडे (संग्रहित छायाचित्र.) |
शिवाजी विद्यापीठाच्या सैफ सेंटरमधील अत्याधुनिक शास्त्रीय विश्लेषण उपकरणे |
कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या ‘सोफिस्टीकेटेड एनालिटिकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी’ (SAIF) अर्थात ‘सैफ’ सेंटरला भारत सरकारच्या
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून अत्याधुनिक शास्त्रीय उपकरण खरेदीसाठी एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र सोनकवडे
यांनी ही माहिती दिली.
डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (डी.एस.टी.) सन २०१३ मध्ये शिवाजी विद्यापीठाला ‘सैफ’ केंद्र मंजूर केले. त्यावेळी विद्यापीठास ५ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. चार उपकरणेही मंजूर झाली. सध्या हे केंद्र
पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रासाठी विश्लेषणाचे
काम कार्यक्षमतेने करीत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये नवी दिल्ली येथे ‘सैफ’ केंद्राच्या
समितीसमोर विद्यापीठातर्फे प्रभावी सादरीकरण
करण्यात आले. परिणामी डी.एस.टी.ने विद्यापीठाच्या सैफ केंद्राला अत्याधुनिक उपकरणाच्या खरेदीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
विद्यापीठाला सैफ केंद्राच्या मंजुरीनंतर प्रथमच इतका मोठा निधी मंजूर झाला आहे. सन २०१३-१४ मध्ये कोट्टायम, शिवपूर, पाटणा, धारवाड आणि कोल्हापूर अशी देशभरात चार सैफ केंद्रे मंजूर झाली होती. शिवाजी विद्यापीठातील सैफ
केंद्र त्याची सेवा व विश्लेषणाची
विश्वासार्हता यामुळे खूपच लोकप्रिय बनले. वापरकर्ते विविध नमुन्यांच्या विश्लेषणासाठी या केंद्राला पसंती देतात. त्याचप्रमाणे विविध वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांनादेखील या केंद्राचे आकर्षण वाटते. हे केंद्र
अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी आणि
येथील क्षमतावर्धनासाठी सातत्याने सहकार्य व मार्गदर्शन करणारे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील यांच्यासह व्यवस्थापन
परिषदेचेही डॉ. सोनकवडे यांनी आभार मानले आहेत.
कुलगुरू डॉ. शिर्के
यांनीही डॉ. सोनकवडे यांच्यासह संपूर्ण सैफ,
डी.एस.टी., सी.एफ.सी. येथील कार्यरत
सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment